असे विचार येतात कुठून ?
हिंदूंचे सण जवळ आले की हे फुरोगामी,फेक्युलर, ब्रिगेडी याना अवदसा आठवते,आपल्या सण, उत्सवात आडकाठी कशी आणता येईल याचे नियोजन सुरू असते.आता हेच बघा ना,इतरवेळी लग्न,निवडणुका अश्या सोहळ्यात फोडले जाणारे फटाके याना दिसत नाहीत,वातावरण तेव्हा शुद्ध असते आणि हिंदूंचे सण आले की अचानक प्रदूषण कसे वाढते ? गाझा पट्टीत लाखो बॉम्ब,रॉकेट पडूनही तिथली हवा खराब नाही झाली अन थोडेसे फटाके फोडल्याने इथे पृथ्वी घोक्यात येते.
हो यार …एकदम बरोबर आहे,सगळी बंधने इथे केवळ हिंदूंनाच घातली जातात, “त्यांना” सगळी खुली सूट आहे.असे मत कोणत्याही भोळसट हिंदूंचे चटकन होऊ शकते.कारण हे विषय मांडलेच तश्या भाषेत जातात. आपण ओबीसी,मराठा मेंदूला फार त्रास देण्याच्या भानगडीत पडत नसतो म्हणून हे विचार तात्काळ आपल्याला पटतात,नव्हे थेट भेज्यात घुसतात.कुणीतरी हे अजब विचार,अजेंडा सेट करतो आणि त्यात फसायला आम्ही तयार असतो.कुणाच्या तरी विचार,अजेंड्याचा फुकट प्रचार करायला आम्ही सगळे उतावीळ असतो.मेंदूवरील झाकण कधीतरी उघडले,तेव्हा पासून ते लावायला विसरलेल्या बहुजनांची संख्या कोटीत मोजता येऊ शकते,यात चूक अजेंडा सेट करणाऱ्यांची नव्हे आपली असते.
माझे मित्र संजय मुळे हे मुळात बहुजन विचारांचे आहेत मात्र त्यांच्या फेसबुक भिंतीवर एक मेसेज दिसला ‘ गाझा मध्ये लाखो बॉम्ब,रॉकेट पडूनही तिथली हवा शुद्ध आहे अन दिवाळीत आपण चारदोन फटाके फोडले तर हवा खराब होते. हा मेसेज वाचून मला धक्का बसला.कुत्सित लोकांच्या कारवायांना आपण बहुजन,प्रगत विचारांचे लोकही कसे बळी पडतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.मुळात आपला जीव वाचवणे मुश्किल असलेल्या अन युद्धाचा सर्वत्र माहोल असलेल्या गाझा पट्टीत कुणी हवेचा दर्जा तपासला असेल ? हा प्रश्न निर्माण होऊ नये असे आपण कशाच्या तरी खाली दबले जातो.
समजा क्षणभर हे मान्य केले की हिंदूंच्या सण, उत्सवात मुस्लिम विघ्न आणत आहेत.त्यांना त्याचा फायदा काय ? फटाके फोडू नका असे ते म्हणतील ? सर्वाधिक फटाका कारखाने त्यांचेच असताना स्वतःच्या पोटावर कोण पाय देण्याचे उलट धंदे करेल ? हिंदूंच्या सण, उत्सवांना लागणारी सामुग्रीचे निर्माते अन पुरवठादार मुस्लिम आहेत. फटाके, रांगोळी, रंग, दिवे, जरी, अत्तर, भेटवस्तू, मेहंदी अश्या असंख्य उत्पादनांची विक्री ते स्वतःहून का रोखतील ? याचा विचार करायला हवा.मग मुस्लिम हे नसतील करत तर पुरोगामी करीत असतील असे ज्यांना वाटते त्यांनी यात त्यांचा फायदा काय ? हे दाखवून द्यावे.
मुळात सध्या सुरू असलेली हवा आणि ध्वनी प्रदूषण चर्चा वायफळ नाही,त्यामागे भयंकर वस्तुस्थिती दडली आहे.राज्यातील अनेक शहरातील हवा आणि ध्वनी प्रदूषण कोणत्या स्तरावर गेले आहे याची आकडेमोड कुण्या मुस्लिम, ख्रिश्चन किंवा रिकामटेकड्या पुरोगामी माणसाने नव्हे तर भाजपा सरकार मधील अधिकारी,कर्मचारी यांनी केली आहे.पर्यवरण क्षेत्रात काम करणारी मंडळी काही पुरोगामी किंवा मुस्लिम नाही,ज्यांना समाजाची चिंता आहे अशी ही मंडळी आहे.त्यांच्या हेतुवर संशय घेत आपले कुजलेले विचार अन कुत्सित अजेंडे राबविण्याचे हे धंदे कुणाचे आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
गणपती,दुर्गादेवी यांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्याना ,उंचीला ,पाणी प्रदूषणाला थेट न्यायालय बंदी घालते त्यामागे काहीतरी देश,समाज हिताचा विचार असतो हे या आंधळ्या लोकांनी समजून घ्यायला हवे पण समजत नाही हे आपले दुखणे आहे .आधीच आपण शुद्ध हवा,ऑक्सिजनच्या शोधात असतो,अशावेळी कोणत्याही गल्लीत शिरलो तर कुणीतरी ” चिंतातुर “जंतू कचरा जाळीत असतो ,हिवाळ्यात तर हे प्रमाण खूप वाढते, गल्लीतल्या अनाम काकांना आपण परिसर स्वच्छ ठेवल्याचे समाधान मिळत असेल परंतु लोकांचा शुद्ध हवा घेण्याचा पहाटेचा अधिकार त्यांनी हिरावून घेतला असतो हे त्यांना कळत नाही. कचरा जाळणे किंवा फटाक्यातून निघणारा धूर थेट फुफ्फुसावर हल्ला करताना हिंदू,मुस्लिम,पुरोगामी, प्रतिगामी बघत नाही,तो सारखा न्याय करतो हे समजून घेण्याची गरज आहे.
गुगलवर नको ते सर्च करून बघता ना,मग धूर,प्रदूषण याचे दुष्परिणाम अन होणाऱ्या व्याधींची यादी का बघता येत नाही ? एकदा बघा,वाचा मग तुम्हाला कळेल की अजूनही आपल्या देशात खूप क्षेत्र आहेत की ज्यांना आपल्या घाणेरड्या विचार,अजेंडा या पासून दूर ठेवण्याची गरज आहे.सुधरा बे…
-पुरुषोत्तम आवारे पाटील
निर्भय बनो -9892162248