अशा थोर लेखकांचे करायचे काय ..?
गतवर्षीच्या भर उन्हाळ्यातली गोष्ट.’आवरसावर’ या माझ्या आठव्या काव्यसंग्रहाचे नुकतेच नागपूरला प्रकाशन झाले होते.मग मान्यवर लेखक-कवींना संग्रह भेट द्यायला म्हणून काहींच्या घरी गेलो. काही जवळच्या लेखकांना घरी बोलावून भेट दिले.
झाले काय, असाच एक दिवस एका प्रख्यात लेखकाकडे गेलो.ओळख-भेट नव्हती. आत गेलो.सुदैवानं दार उघडंच होतं. बेल दिल्यावर बाई बाहेर आल्या. कामवाली असावी.म्हणाली,आहेत साहेब. छानसं स्मित देत बोलली.लगेच साहेबही बाहेर आले. जेवण सुरू होतं त्यांचं.म्हणाले, काय आहे? पुस्तक द्यायचे होते सर,मी म्हणालो.सरांना राग आला. अरे माझं जेवण सुरू आहे.मला जेवणात डिस्टर्ब करू नका. मी म्हटले,सर नंतर येऊ का ? नाही, नंतर मला प्रोग्राम आहे.मग थांबू का सर थोडा. मी विनवणी केली.अरे मला वाटलं, माझा भाजीवाला पार्सल घेऊन आला असेल भाजीचं, म्हणून मी ताटावरून उठून आलो. मला जेवणात त्रास देऊ नका.द्या, काय द्यायचे? सर पुन्हा रागात.मी त्यांच्या हातात संग्रह ठेवला.
पण माझ्यासाठी ही घटना हृदय पिळवटून टाकणारी होती! मला त्यांनी न नाव,न गाव विचारले. अनोळखी होतो म्हणून काय झालं?मला त्याक्षणी माझा गाव आठवला.गावाकडे घरांची दारं सताड उघडी असायची.जेवताना सुद्धा. अनोळखी माणसांनाही या जेवायला,म्हणायचे लोक. भिकारी आला तरी काही तरी द्यायचे. कुत्रा आला तर कोरभर भाकरी टाकायचे ताटातली.
या प्रथा,या संस्कारांत वाढलेले आम्ही गावातले शेतकरी. ते दिवस आठवले की आजही मन प्रसन्न होते.. कृतज्ञतेने भरून येते! मी सरांना संग्रह दिला खरा,पण लगेच माझा स्वाभिमान जागा झाला.वाटलं,माझं पुस्तक एवढं क्षुद्र आहे?
या पुस्तकाला वर्षभरात प्रतिष्ठेचे१० राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले.आणि अशा रुक्ष माणसाला हे पुस्तक भेट द्यायचं? खरं तर या माणसाच्या पायांवर मस्तक टेकवायला आलो होतो .मात्र मी मस्तक टेकवावे, असे पाय तिथं होतेच कुठे?जगाच्या लेखी हा महान लेखक. पण असे मोठेपण ज्याचे त्याला लखलाभ असो!
मी सरांना पुस्तक परत मागितले.त्यांनी दिले. तसाच परत फिरलो नि मागे परतून न पाहता झपाझप पावलं टाकत घरी परतलो. घरी आलो तेव्हा तहानलो होतो.माठातलं थंडगार पाणी प्यालो.. तृप्त तृप्त झालो! त्याआधी या माणसाला कधी भेटलो नव्हतो.नंतरही भेटलो नाही.काही माणसं लेखक म्हणून मोठे असतात, पण माणूस म्हणून किती खुजे असतात!मला तर त्या घरातली ती बाई कितीतरी मोठी वाटली त्या दिवशी.माणसाच्या अंतरीचे माणुसकीचे झरे आटत चालले आहेत,हा तर सरांच्या भाषणाचा विषय नसेल त्यादिवशीचा? -घरी निवांत बसलो आणि राष्ट्रसंतांचं गाणं गुणगुणत राहिलो,
राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या…
प्रश्न उरतो,अशा थोर लेखकांचे करायचे काय?काय करायचे?
– बबन सराडकर
अमरावती