अपेंडीक्स म्हणजे काय ?
अपेंडीक्स हा शब्द टॉन्सिल प्रमाणेच आपल्या परिचयाचा झालेला असतो आणि ऑपरेशन करून काढून संदर्भात तो येतो, त्यामुळे वरील प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. अपेंडीक्स हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. मोठ्या आतड्याचा बारीक शेपटी सारखा वा करंगळी प्रमाणे दिसणारा हा भाग मोठ्या आतड्याशी लहान आतडे जिथे जुळते त्याजवळ असतो. तसे पाहता मानवामध्ये हा अवयव निरुपयोगीच. काही तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण करण्यास याचा उपयोग होतो. जिवाणूंना अटकाव करण्याच्या याच्या कार्यामुळे यास पोटातील टॉन्सिल असेही म्हणतात. गायी-म्हशी सारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांमध्ये अपेंडीक्स बरेच मोठे असते व सेल्यूलोज पचन त्यात होते.
अपेंडीक्सच्या आतील पोकळीत अन्नकण अडकल्याने, पोटातील जंतांमुळे (बंद झाल्यास) त्यात जंतुसंसर्ग होऊन अपेंडीक्सला सूज येते. त्यास अपेंडीसायटीस असे म्हणतात. यात पोटात बेंबी खालील उजव्या भागात दुखते. ही वेदना तीव्र असते. सामान्यपणे उलटी सुद्धा होऊ शकते. पोटाचा तो भाग ताठर व दुखरा होतो. त्या व्यक्तीस बराच तापही असतो. त्यामुळे या व्याधीचे निदान झाल्यावर ते काढून टाकणे श्रेयस्कर ठरते. कारण असा त्रास रुग्णास वारंवार होऊ शकतो व त्याचा परिणाम म्हणून गंभीर गुंतागुंती होऊ शकतात. परंतु पोट दुखत असल्यास अपेंडीसायटीस असेल, असा गैरसमज करून घेणे योग्य नाही.
पोटात दुखण्याची बरीच कारणे आहेत. पोटातील जंत, आमांश अशी कारणे आपल्याकडे बहुतांशी आढळतात. आजकाल अपेंडिक्स काढण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. विनोदाने अपेंडिक्स शल्यचिकित्सक यांची रोजीरोटी म्हटले जाते. वैद्यकीय क्षेत्रातही धंदेवाईकपणा वाढत चालल्याने रुग्णाने असे ऑपरेशन करून घेण्यापूर्वी २-३ तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अनावश्यक शस्त्रक्रिया टळू शकेल.