मधमाशी चावल्यावर काय होतं?
डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्ती पासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते.
तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुई सारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्या बरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो.
असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायू पर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं, हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते.
विषा बरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या ओढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात अशावेळी मग एका ऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते, काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते.
तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिन बरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाय योजना केली जाते उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्या जवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.
संकलन : दिपक तरवडे,
नाशिक
(डाॅ.बाळ फोंडके यांच्या काय? या पुस्तकातुन)