“लाख कोटी भाव नको, धोरणात यावी शेती. महासत्ता देशा हवी, भाकरीची खरी नीती.”- कवी अशोक गायकवाड
(*जीव रानात गहाण* काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाचे परीक्षण)
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पाराळा एक छोटेसे खेडेगाव.. गेली अनेक दशके या गावाला एसटी माहित नव्हती, अत्यंत दुर्गम भाग, फक्त बैलगाडीचा रस्ता.. या रस्त्यावर डोंगराचे लाल, गारगोटीचे मोठाले दगड पडलेले… सायकल चालवतांना देखील दहावेळा दगडावर चाक आपटून पडणार अशी परिस्थिती… पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य… रानात चिटपाखरू देखील दिसणार नाही असा कडक दुष्काळी डोंगराळ भाग.. तसाही मराठवाड्यात समाविष्ठ असणारा हा तालुका वर्षानुवर्ष कोरडवाहू, दुष्काळग्रस्त समजला जात आहे. अशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन, शेती मातीत राबून परिस्थितीवर मात करून एक मुलगा पुढे जातो… जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घेतो आणि प्राथमिक शाळेचा शिक्षक होतो… पुढे हाच शिक्षक याच मातीचे गाणे लिहतो… या मातीवर कविता करतो .. आणि ग्रामीण भागातील नवतरुणांना, लहान मुलांना कवितेबरोबरच वाचनाची, शिक्षणाची गोडी लावतो अशाच एका जिद्दी कवीच्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ पाहिले आणि त्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर जरा विचार केला असता त्यातून खूप काही सामाजिक अर्थ मला त्यातून भावले. कोणतीही कलाकृती वाचण्याआधी त्या कलाकृतीचे मुखपृष्ठ आधी वाचले पाहिजे, कारण मुखपृष्ठ हा त्या साहित्य कलाकृतीचा आरसा असतो. साहित्यिकाच्या जीवनशैलीचा, तो ज्या समाजात राहतो, वावरतो त्या समाजाचे प्रतिबिंब त्यातून प्रतिबिंबित होत असते. साहित्यिक आपल्या साहित्य कलेतून आपल्या अनुभवांना, परिस्थितीला व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत असतो.
कवी अशोक गायकवाड हे अशाच ग्रामीण भागातून आलेले, त्यांची दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच १४ नोव्हेंबर २०२३ रोजी “जीव रानात गहाण” या काव्यसंग्रहाची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून अनुदान मिळालेली पहिली आवृत्ती प्रकाशित झाली …. या काव्यसंग्रहाची थीम शेतकरी आणि शेतीवर आधारित आहे. कष्टकरी, श्रमजीवी, शेतकऱ्याची व्यथा या संग्रहातून माडली आहे..
“जीव रानात गहाण” ही कलाकृती पाहिली आणि या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर थोडासा प्रकाश टाकावा म्हणून कलाकृतीचे निरीक्षण केले. कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एक महिला डोक्यावर टोपली घेऊन चालली आहे, तिच्या पाठीमागे विळा दाखवला आहे, यासोबतच काट्याच्या टोकासारखे धारदार आणि अणकुचीदार कापलेले धसकट दाखवले आहे. या धसकटाच्या मुळ्या जमिनीत जणू हाताचा पंजा मनगटापासून तुटलेला आणि रक्त सांडलेल्या काळ्या मातीत रुतलेल्या बोटासारख्या दिसत आहेत. पाठीमागे गडद रंगछटा दाखवल्या आहेत. तर कलाकृतीचे शीर्षक पांढऱ्या रंगात वेगळ्या ढंगात दाखवले आहे. असे अतिशय अर्थपूर्ण आणि ग्रामीण जीवनाशी नाळ जोडणारे मुखपृष्ठ सजवले आहे. या मुखपृष्ठावरील संदर्भाचा आपण कवीच्या , समाजाच्या भावजीवनाशी काय अर्थ लागतो याचा आपण आढावा घेणार आहोत.
भारत देश हा शेतीप्रधान देश असून या शेतीचा उगम सिंधू नदीच्या खोऱ्यातून सुरुवात झाली असे इतिहास संशोधक सांगतात. प्राचीन काळी शिकार करून उपजीविका केली जात होती. त्याकाळात महिलांनी शेती करायची आणि पुरुषांनी शिकार करायची..त्यामुळे स्रीला शेतीव्यवसायाचा कणा संबोधले जाते. आपल्या देशात आजही शेतीव्यवसायातून जवळपास ७० ते ८० टक्के महिलांना रोजगार मिळतो त्यातील जवळपास ४० टक्के महिला शेतमजूर आहेत तर स्वतः शेतकरी असणाऱ्या ४० टक्के महिला आहेत. शेतीची सर्व कामे जवळपास महिलाच करतात. ग्रामीण भागात हल्ली पुरुषांच्या बरोबरीने महिला शेतीच्या सर्व कामात आपल्याला दिसून येतात. त्यामुळेच शेतीची हिरकणी ओळखली जाणारी ही स्री आधुनिक पेहरावात अथवा सुंदरतेने नटवून न दाखवता अत्यंत साध्या पेहरावात, दररोज उन्हाने भाजून निघाल्याने शरीर काळवंडलेले आणि शारीरिक प्रकृतीही हडकुळी दाखवली आहे हे ग्रामीण भागातील कष्टकरी, श्रमजीवी स्रीचे प्रतिक आहे म्हणून या मुखपृष्ठावर अग्रस्थानी स्रीची प्रतिमा घेतली असावी इतका गहन अर्थ यातून मला जाणवला. या स्रीच्या डोक्यावर पाटी दाखवली आहे याचा अर्थ असा की, स्रीला सतत कष्टाचा भार वाहून न्यावा लागतो.. हा भार आपल्या डोक्यावर सतत ती घेऊन नेत असते त्याचे प्रतिक म्हणून ही पाटी दाखवली असावी.
या मुखपृष्ठावर एक चकाकणारा विळा दाखवला आहे… ग्रामीण भागात शेतीच्या कामाला स्रीच्या हातात नेहमी विळा असतो, शेतीची निंदणी, खुरपणी, कापणी, गवत काडी कचरा गोळा करणे यासाठी शेतकरी स्रीच्या हातात नेहमी विळा असतो.. हाच विळा कष्टकरी समाजाचे प्रतिनिधित्व करतो. अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठीदेखील विळा हे प्रतिक दाखवले जाते तेच आज शेतीच्या बाबतीत होत आहे. शेतीला हमी भाव नाही, कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने हातात आलेले पिक वाया जाते, कोणत्याच यंत्रणेकडून लवकर भरपाई मिळत नाही, त्यासाठी झगडावे लागते, त्यातच शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यास हातात काही उरत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्त्या करीत आहे. हा एक प्रकारे शेतकऱ्यावर होणारा अन्यायच आहे या अन्यायाविरुध्द लढण्यासाठी प्रतिकात्म्क म्हणून हा संघर्षाचा विळा दाखवला आहे असे मला जाणवले.
शेतकऱ्याच्या कष्टाचे मोल हल्ली कुणालाच कळत नाही. शेतकरी जणू हात असून हात कापून टाकल्यासारखा हतबल झाला आहे. त्याच्या हातात जग पोसायची शक्ती असून या व्यवस्थेमुळे तो मेटाकुटीला आला आहे, कर्जबाजारीपणामुळे त्याचे हात तुटल्यासारखे झाले आहे. शाश्वत अशा कोणत्याच स्तरावर त्याला मदत मिळत नाही त्यामुळे शेतकरी पुरता तुटल्यासारखा झाला आहे त्याचेच प्रतिक म्हणून मुखपृष्ठावरील कापलेले धसकटाचे चित्र मानवी हात मनगटापासून तुटलेला दाखवला आहे असे वाटते… शेतकरी इतका तुटला, इतका हवालदिल झाला, आत्महत्त्या करायला तयार झाला, अगदी हात तुटून पडला तरी रक्ताळलेल्या हाताने आपल्या काळ्या आईला, या शेतीला, या मातीला वाचवू पहात आहे.. कारण मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलासाठी काळ्यामातीला कवडीमोल किमतीत विकले जात आहे, शेतीच्या जागेवर औद्योगिक कारखाने होत आहेत , मोठमोठ्या इमारती, मॉल होत आहेत तसेच झपाट्याने शहरे ग्रामीण भागात घुसत आहेत हे शहरांचे अतिक्रमण रोखण्यासाठी जणू हात तुटले तरी या काळ्या मातीला सोडणार नाही म्हणून या *मुखपृष्ठावरील धसकटाच्या मुळ्या लाल रक्ताच्या रंगात मातीला हाताच्या बोटांनी पकडून ठेवल्यासारख्या दाखवल्या गेल्या आहेत*. इतका गहन अर्थ मला यातून जाणवला आहे. म्हणून कवी अशोक गायकवाड यांनी त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे की – “मोल कापल्या हाताचे, नाही कळणार तुला. नाही ममता काळीज, तुझ्या नंग्या संस्कृतीला” अशा शब्दात खडेबोल या व्यवस्थेला कवित्तेतून सुनावले आहे. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठचित्रकार मा अरविंदजी शेलार यांना हजारदा सलाम करतो की, शेतकऱ्याच्या भावभावनांचा, त्यांच्या जीवनाचा अचूक संदर्भ इतका कल्पकतेने आणि विचारपूर्वक या मुखपृष्ठावर रेखाटला आहे. खऱ्या अर्थाने कलाकृतीच्या वैभवात भर टाकणारे मुखपृष्ठ साकारले आहे.
कवी अशोक गायकवाड यांच्या कलाकृतीचे मुखपृष्ठ पाहिले आहे मला दिवंगत कवी पद्मश्री ना.धों महानोर यांची कविता आठवली
‘ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे,
आणि या मातीतूनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे
शेतीवर प्रचंड प्रेम करणारे, साधी राहणी.. उच्च विचार.. असणारे कवी महानोर आज आपल्यात हयात नाहीत पण त्यांनी शेतीमातीला बोलते केले, झाड वेलींना हसायला लावले, दगडधोंड्यांना फुलवले.. विदर्भातील पळसखेडच्या रानाचे नंदनवन केले आणि त्यांचाच वारसा जपायला अनेक कवी लिहिते झाले. त्यांचा हा शेतीमातीचा वारसा घेऊन कवी अशोक गायकवाड यांचा “जीव रानात गहाण” कवितासंग्रह मराठवाड्याच्या मातीची, तिथल्या समाजजीवनाची जाणीव करून देतो. कवी गायकवाड यांच्यावर ग्रामीण शेतकरी जीवनाचा प्रभाव आहे आणि म्हणून मुखपृष्ठात गडद रंगाच्या छटा दाखवल्या आहेत या गडद रंगाच्या छटा शेतकऱ्यांचे दुःख, वेदना, कष्टाचे प्रतिक म्हणून रेखाटल्या आहेत. कवी अशोक गायकवाड यांना ती जाणीव आहे आणि म्हणूनच त्यांच्या “जीव रानात गहाण” या शीर्षकाला रेखाटतांना वेदनेने हळहळ व्हावी अशा प्रकारे शब्दाचा ढाचा वेदनामय दाखवला असावा असे वाटते. या शीर्षकाचा अर्थ असा की, शेतकरी शेतात दिवस रात्र राबतो, या मातीचा सूगंध, रानातली धूळ अंगावर चढवून घेत असतो, त्याला मातीशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. वेळप्रसंगी शेतातच राहणे आणि आपलं सारं आयुष्य जणू या शेतीला गहाण ठेवले आहे या अर्थाने या शीर्षकाचा अर्थ मला भावला आहे.
कवी अशोक गायकवाड यांच्या “जीव रानात गहाण” या कलाकृतीला मुखपृष्ठचित्रकार मा अरविंदजी शेलार यांनी अतिशय कल्पकतेने सजवले आहे तर शिवानी प्रिंटर्स यांनी मुद्रित केले असून पुण्याचे “परिस पब्लिकेशन” यांनी प्रकाशित करून वाचकांच्या स्वागताला ही काव्यकलाकृती सादर केली आहे. कवी, मुखपृष्ठचित्रकार आणि प्रकाशक यांना पुढील कलाकृतीसाठी शुभेच्छा…!
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५०००
(तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)