ग्रामीण शेतीतून कौटुंबिक एकीचा संदेश देणारी कलाकृती – “आम्ही रानातली फुले”
आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या देशांत जवळपास ६० टक्के महिला शेती उत्पनात अग्रेसर राहिलेल्या आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्री पुरुष समुदायिक पद्धतीने शेती करतांना दिसून येतात. शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायातही पशुधनाची देखील काळजी घेऊन शेतीचे आर्थिक व्यवस्थापन करणे या सर्व कामात महिलांचा सक्रीय सहभाग असतो. शेतीमध्ये महिला पेरणी, लागवड, निंदणी, खुरपणी, सोंगणी, कापणी, खुडणी, वेचणी यांसारखी कुशल- अकुशल व कष्टाची कामे करतात. या महिलांना मजुरी देखील पुरुषांपेक्षा कमी मिळते आणि त्यात नियमित काम देखील मिळत नाही. कोरडवाहू शेतीत केवळ ५०-६० दिवस तर बागायती क्षेत्रात हेच काम ९० ते १०० दिवस काम मिळते. काही ठिकाणी पती पत्नी दोघेही सोबतच शेतात राबत असतात.
शेतीच्या बिकट परिस्थितीचे दर्शन करणारी एक कलाकृती नुकतीच पाहण्यात आली, या कलाकृतीचे मुखपृष्ठ पाहून वरील परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दर्शन झाले. असे हे चित्र दाखवणारी विद्या सरपाते यांची काव्यकलाकृती म्हणजे “आम्ही रानातली फुले” या मुखपृष्ठावरील काही संदर्भ माणसाला विचार करायला लावणारे दिसून आले. यावर एक पुरुष आणि एक महिला शेतीची कामे करतांना दाखवले आहेत. एकाच्या हातात आसूड दाखवला आहे तर स्रीच्या हातात शेतीत बी पेरणीचे मोघड(एका नळीचे चाडे) पेरणी करतांना दाखवले आहे, पाठीमागे सुंदर असे फुल बहरलेले दिसत आहे तर उंच चबुतऱ्यावर काही माणसांच्या प्रतिमा शेतीकाम करणाऱ्या जोडीकडे बघत असल्याचे दिसत आहे
“आम्ही रानातली फुले” या कलाकृतीकडे पाहत असतांना या भागातील भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचे दर्शन होते, आर्थिक उलाढाल कमी असल्याने बरेच कुटुंब रोजंदारी करणारे दिसून येतात, सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याने मजूर कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती असल्याने मजूर येत नाहीत, कामाच्या प्रमाणात उत्पन्न नसल्याने जास्त मजुरी देणे परवडत नाही म्हणून रोजंदारीचा दर कमी मिळतो त्यात महिला कमी दरात कामाला उपलब्ध होतात. मात्र पती पत्नी दोघेही जर शेतात राबले तर शेतीत बाहेरून मजूर घ्यावे लागत नाही परिणामी मजुरीचा खर्च वाचतो आणि पतीपत्नीची एकमेकाला साथ लाभते हा संदेश देणारे चित्र या मुखपृष्ठावर रेखाटले आहे आणि याचे प्रतिक म्हणून या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर पती सोबत पत्नी शेती करतांना दाखवली आहे हा अर्थ मला यातून भावला.
“आम्ही रानातली फुले” या कलाकृतीचे बारकाईने निरीक्षण केले असता काही सामाजिक संदर्भ यातून दिले आहेत. सन १८८३ साली क्रांतीसूर्य, शेतकऱ्यांचे कैवारी जोतिबा फुले यांनी “शेतकऱ्याचा आसूड” हा महान ग्रंथ लिहून भारतीय कुणबी, शेतकरी, कष्टकरी समुदायाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. हातात लेखानीचा आसूड घेऊन समाजातील प्रस्थापित व्यवस्थेला आपल्या लेखनीतून फटके मारून समाज जनजागृती केली. हा तळागाळातील समाज एकवटला आणि अन्यायाविरुद्ध दंड थोपटून क्रांतिसूर्य ज्योतीबांच्या मागे खंबीर उभा राहिला. हातात आसूड घेतल्याशिवाय ही व्यवस्था बदलणार नाही.. हे क्रांतीचे प्रतिक आहे, समाजव्यवस्थेवर आसूड ओढण्याचे हेच संदर्भ घेत कवयित्री विद्या सरपाते यांनी एका प्रातिनिधिक शेतकरी पुरुषाच्या हातात आसूड देवून हेच तर दाखवले नसेल ? आता शेती वाचवली पाहिजे, शेतकरी वाचवला पाहिजे.. शेतीमालाला हमी भाव नाही, शेतकरी आत्महत्त्या करत आहे, शेतकरी दिवसेंदिवस पिचला जात आहे, शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे या अन्यायाविरुद्ध आता आसूड घेतला पाहिजे. हा शेतकऱ्याचा आसूड आहे हे तर सूचित करायचे नाही ना ? असा अर्थ मला येथे अभिप्रेत होत आहे.
“आम्ही रानातली फुले” या मुखपृष्ठावर एका महिलेच्या हातात शेतीत बी पेरणीचे मोघड(एका नळीचे चाडे) पेरणी करतांना दाखवले आहे.. या कृतीकडे बघतांना स्रीविषयक प्रगत भावना व्यक्त होतांना दिसत आहे. एका नळीच्या मोघडाने पेरणी करणे म्हणजे स्री आता एकटी शेतीकाम करण्यास सक्षम आहे. ती आता प्रगल्भ आणि प्रगत झाली आहे. सोबत जर आसूड घेऊन जोडीदार असेल तर एकीला बळ मिळते आणि दोघं मिळून हे काम सहज पेलवू शकतात हा कौटुंबिक एकीचा संदेश यातून दिला गेला असावा असे मला वाटते. दोघांनी जर कष्ट केले तर या कष्टाचे फळ म्हणून त्यांनी फुलवलेली शेती पाठीमागे हिरवीगार झाली आहे. म्हणजेच त्यांचा परिवार सुखी होऊ शकतो त्याचेच प्रतिक म्हणून पाठीमागे सुंदर असे फुल बहरलेले दिसत आहे असा अर्थ मला यातून जाणवला आहे.
“आम्ही रानातली फुले” या कलाकृतीच्या परिस पब्लिकेशन पुणे, यांनी प्रकाशित केलेल्या मुखपृष्ठचित्रकार नंदू वानखेडे यांनी अतिशय कल्पकतेने या मुखपृष्ठाला आपल्या कुंचल्याने रंगवून साहित्य कलाकृतीच्या वैभवात भर घातली आहे. अतिशय अर्थपूर्ण असलेल्या या मुखपृष्ठावर एका उंच चबुतऱ्यावर काही माणसांच्या प्रतिमा शेतीकाम करणाऱ्या जोडीकडे बघत असल्याचे दिसत आहे.. अतिशय गर्भित अर्थाने या कृतीकडे बघता येईल. सध्या शेती हा असा व्यवसाय आहे की यात राबणारे हात जरी कमी असले तरी खाणारे तोंडे जास्त आहेत. पण जर दोघांनी फक्त प्रामाणिक कष्ट केले तर पूर्ण परिवार सुखाच्या माडीत समाधानाने राहू शकतो, आणि कुटुंबातील जोडीदाराची साथ खंबीर पाहिजे तरच परिवार उंचावर जाऊ शकतो असा अर्थ मला इथे जाणवला आहे
आज ग्रामीण शेतीकडे बघितले तर शेतात जास्त करून महिलाच राबताना दिसतात, आणि अगदी पुरातन काळापासून म्हणजेच सिंधू संस्कृतीपासून आजवर शेतीत महिलांचेच योगदान जास्त राहिले आहे हे नाकारता येणार नाही. बुलढाणा जिल्ह्यातील गुंजखेड, लोणार सारख्या ग्रामीण भागात राहून शेतीमातीच्या कविता निर्मिती करून कवयित्री विद्या सरपाते यांच्या “आम्ही रानातली फुले” कलाकृतीमुळे शेतीत राबणाऱ्या महिलांना नवचेतना मिळेल, नवी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. कवयित्री विद्या सरपाते यांना पुढील कलाकृती निर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा ..!
मुखपृष्ठ परिक्षण –
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क -७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
काव्यकलाकृतीचे नाव – “आम्ही रानातली फुले”
कवयित्री – विद्या सरपाते, बुलढाणा
प्रकाशन – परिस प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठचित्रकार – नंदू वानखडे