वसवली लंकापुरी तू, केवढा कैफात आला – गझलकार तुकाराम ढीकले
मुंबई (प्रतिनिधी) :रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी तुपसाखरे लॉन्स , मुंबई नाका, नाशिक येथे गझल मंथन संस्थेच्या वतीने नाशिक, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यातील गझलकारांचे एक दिवसीय गझल संमेलन पार पडले. गझलमंथन साहित्य संस्थेच्या नाशिक विभागीय अध्यक्षा मृणाल गिते यांच्या प्रयत्नातून एकुण सहा मुशायऱ्यात हे संमेलन घेण्यात आले होते. मा अरुण दादा सोनावणे, मा. श्याम खामकर, मा संजय गोरडे, मा संतोष कांबळे, मा हिरालाल बागुल, मा राजेश्वर शेळके असे प्रत्येकी मुशायरासाठी अध्यक्ष म्हणून निवडले होते. तर डॉ शिवाजी काळे अहमदनगर हे संमेलनाचे अध्यक्ष, उद्घाटक म्हणून डॉ आशिष मुजुमदार होते तर प्रमुख अतिथी गझलकार जयवंत वानखेडे आणि उर्मिलाताई बांदिवडेकर ह्या प्रमुख उपस्थितीत होत्या. या एक दिवसीय गझल संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, तर खान्देश विभाग प्रमुख काशिनाथ गवळी, उपविभाग प्रमुख अॅड मुकुंदराव जाधव, सचिव बाळासाहेब गिरी, सहसचिव यशश्री रहाळकर, कोषाध्यक्ष अतुल देशपांडे उपाध्यक्षा संध्या भोजने, सचिव नंदकुमार ठोंबरे, संयोजक गोरख पालवे व नितीन गडवे, सदस्य अलका कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, स्मिता बनकर डॉ. अंजना भंडारी, डॉ. मधुचंद्र भुसारे आदींनी परिश्रम घेतले.
या गझलमंथन संस्थेच्या पहिल्यावहिल्या संमेलनात चौथ्या मुशायऱ्यातील सहभागी नाशिकचे कवी तथा गझलकार तुकाराम सी ढीकले यांची एक गझल ऐकण्यात आली. या गझलेतील काही शेर खूप आवडले.. त्यातील खालील दोन शेराचा अर्थ उलगडण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला आहे..
*वसवली लंकापुरी तू, केवढा कैफात आला*
*तुज कुणी ‘रावण’ म्हणाया, लागला तर काय झाले?*
*ठेवला विश्वास ज्यावर, तोच करतो घात तर मग*
*अस्तनितला तो निखारा, खांडला तर काय झाले*
संसारात सुख मिळविण्यासाठी लाखो अडथळे पार करून जावे लागते.. सुख म्हणजे अलाउद्दीनचा जादुई दिवा.. हा दिवा मिळवणे म्हणजे सातासमुद्र पार करून आणण्यासारखे दिव्य काम आहे.. “सुखाची परिभाषा अत्यंत सोपी आहे, सुख मिळविणे म्हणजे काय तर रात्री जेवण केल्यानंतर अंथरूणावर पडल्या पडल्या पाच मिनिटांत झोप लागणे” यालाच सुख म्हणतात.. आजचा दिवस जसा आनंदात गेला तसा उद्याचा जावा असा विचार करून आपल्या पाठीशी असलेल्या अज्ञात शक्तीला धन्यवाद देवून झोपी जाणे म्हणजे सुख.
मात्र हल्ली या सुखाच्या परिभाषेला जो तो लालची, हव्यासापोटी बदलण्याची परिसीमा गाठत आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे पैसा यायला हवा, आपण जगापेक्षा श्रीमंत व्हायलाच हवे.. निदान आपल्या पाहुण्यांच्या यादीत, नातेवाईकांच्या यादीत, भाऊबंदकीत तरी श्रीमंती दाखवता यावी यासाठी प्रयत्न करत असतोच.. कधी कधी हा प्रयत्न ईतका पराकोटीला जातो की , पैशाच्या हव्यासापोटी पाठच्या भावाला, जन्मदात्या आईबापाला देखील यमसदनी पाठवण्याचा घाट घातला जातो. काहींना तर ईतका हव्यास असतो की ईतरांवर त्याचा काय परिणाम होईल, अथवा आपल्या मुलाबाळांना त्याचा काय परिणाम भोगावा लागेल याची देखील तमा नसते. अशा नालायक औलादांनी गोरगरिबांची संपत्ती, त्यांचे कष्ट, त्यांची ईभ्रत सारं काही हडप करून माया जमवलेली असते.
आपण समाजात पाहतोय , काही घटक असे आहेत की त्यांना एक वेळचे अन्न मिळत नाही, काबाडकष्ट करूनही त्यांची भुक भागवली जात नाही.. त्यांनां योग्य मेहनताना मिळत नाही.. जो मिळतो त्यातही काही हपापलेले दलाल ठेकेदार आतल्या आत कमिशन काढून गरिबांच्या घामाचे दाम हडप करतात. गरिबांच्या मुंड्या पिरगळून काही धनदांडगे आजही समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहेत.
ज्याप्रमाणे त्रेतायुगात रावणाने आपले राज्य सोन्याचे बनवले होते, संपुर्ण लंकानगरी सोन्याची वसवली होती त्याला आपल्या सत्ता-संपत्तीचा, आपल्या ताकदीचा गर्व झाला होता. रावणाने म्हणे देवाकडून अमरत्वाचा वर मागून घेतला होता. त्यामुळे त्याला त्याचा गर्व झाला होता. आजही असे अनेक रावण आपल्या आजूबाजूला आपणांस दिसून येतात.. सत्ता, संपत्ती आणि ताकदीचा कैफ अनेकांना झालेला आपणांस दिसून येतो.. हा कैफ ईतका असतो की ते इतरांचा विचार करतच नाहीत. अशा रावणरूपी अहंकारीना त्याच्या वृत्तीची कुणी जाणिव करून दिली पाहिजे. जर तू ईतकं सारं लबाडीने, गरिबांच्या मानगुटीवर पाय देऊन कमावलं आहे, जणू काही तू रावणच (लाक्षणिक अर्थाने) झाला तर मग कोणी रावण म्हणून तुला तुझ्या अशा लबाड कर्तुत्वाची जाणीव करुन दिली तर कुठे बिघडले ?.. रावण शीलवान होता, तुझ्यात तो गुण आहे का? रावणाने विष्णू भक्ती करून अमरत्वाचा वर घेतला होता, तू तसे काही केले आहे का? तुझ्याकडे फक्त पैशाचा गर्व आहे अशा अहंकारी, कैफात मत्त झालेल्यांना उपरोधिक टोला देत गझलकार म्हणतात की-
वसवली लंकापुरी तू, केवढा कैफात आला
तुज कुणी ‘रावण’ म्हणाया, लागला तर काय झाले?
समाजात हल्ली कुणावर विश्वास ठेवावा असा कोणी राहिला नाही… जो तो आपापल्या विचाराने इतरांना कुचेष्टेने, असूया मनात ठेवून पाहत असतो. पण कधी कधी आपल्या माणसावर विश्वास ठेवावा लागतो.. असे म्हणतात की जग हे विश्वासावर चालत असते आणि म्हणूनच जगातील अनेक व्यवहार विश्वासाने चालत आलेले आहेत. पण हल्ली कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही हा यक्षप्रश्न माणसाच्या डोक्यात घुमत आहे. श्वासागणिक माणसं आपला शब्द पाळताना दिसत नाही. पापणी लवायच्या आत माणसं बदलून जातात. स्वतःच्या मुलावर विश्वास ठेवायला देखील काही लोकांना भीती वाटत आहे इतका स्वार्थीपणाचा कळस झाला आहे. ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकावा तोच विश्वासघात करतो आहे. पैशासाठी , सत्तेसाठी, अधिकारासाठी काही निर्दयी माणसं दुसऱ्याचा विचार देखील करत नाहीत. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यावर विश्वास ठेवून लहान मुली, महिलांना सांभाळ करण्यासाठी कुणाच्या स्वाधीन केले जाते तोच त्या मुलीची, महिलेची अब्रू लुटतो आणि प्रसंगी जीवही घेतो काहीना घरात आश्रय दिला तर तोच घरातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी देतो किंवा घरातील मौल्यवान वस्तू घेऊन फरार होतो. अशा अनेक घटना सांगता येतील ज्यामुळे कुणावर विश्वास ठेवावा? असा समस्त मानवाला प्रश्न पडलेला आहे म्हणून अशा अस्तनितला निखारा म्हणजेच अशा नराधमांना ओळखून ठेचून काढले तर कुठे बिघडले ? “अस्तनितला निखारा” या शब्द प्रयोगातून लाक्षणिक अर्थाने जनमानसातील प्रंचड संताप व्यक्त करताना गझलकार म्हणतात की-
*ठेवला विश्वास ज्यावर, तोच करतो घात तर मग*
*अस्तनितला तो निखारा, खांडला तर काय झाले*
वरील प्रमाणे हे दोनही शेर अप्रतिम आणि दमदार वाटले.. गझलकाराचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक आहे. समाजातील बेबंदशाही, हुकुमशाही, सत्ता संपत्तीचा गर्व, अशा समाजघातक गोष्टीमुळे समाजमनात प्रचंड उदासीनता आणि चीड आहे हे अधोरेखित करणारे वरील दोन्ही शेर समाजाला वास्तवाची जाणीव करून देणारे आहेत.
गझलकार तुकाराम ढिकले यांना पुढील लेखणीसाठी हार्दिक शुभेच्छा
प्रशांत वाघ (पसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० *(तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)*