‘भूक छळते तेव्हा’ कवितासंग्रहास वसंतरावजी नाईक प्रेरणा पुरस्कार जाहिर
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : कष्टकरी विस्थापित मजुरांचा संघर्ष आपल्या लेखणीच्या माध्यमातून व्यक्त करणारे निघोज येथील ग्रामिण कवी संदीप राठोड लिखित ‘भूक छळते तेव्हा’ कवितासंग्रहास महानायक श्री. वसंतरावजी नाईक प्रेरणा पुरस्कार जाहिर झालेला आहे.
देवणी, जि. लातूर येथे रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी महानायक श्री वसंतरावजी नाईक विचार मंचने बंजारा समाज एकता मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पंचेचाळीसव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित बंजारा समाज एकता मेळाव्याचे अध्यक्ष महंत श्री शेखर महाराज असून श्री सत्यपाल महाराज, पंडीतराव धुमाळ, महेश जाधव, सोमनाथ वाडकर, किरण कोळपे, माणिक डोके, तानाजी चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कवी संदीप राठोड यांना महानायक श्री. वसंतरावजी नाईक प्रेरणा पुरस्कार प्रदाण करण्यात येणार आहे.
याआधी ‘भूक छळते तेव्हा’ कवितासंग्रहास नऊ राज्यस्तरिय व एक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे. संदीप राठोड यांना महानायक श्री वसंतरावजी नाईक प्रेरणा पुरस्कार जाहिर होताच त्यांचे पारनेर साहित्य साधना परिवाराकडून तसेच विविध स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.