Vasanrao Naik : ‘शेतकऱ्यांचे कैवारी वसंतराव नाईक’

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ,कायदेतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते.त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रदीर्घ कारकीर्द लाभली. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या आड वळणावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावात बंजारा समाजातील शेतकरी कुटुंबात फुलसिंग व होनुबाई नाईक यांच्या पोटी १ जुलै १९१३ रोजी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला.

    महानायक वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी “वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत.” या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या योजना राबवल्या. नाईक यांना ‘शेतकऱ्यांचा जाणता राजा’, ‘हरितयोद्धा’ म्हणूनही संबोधतात.काहींनी त्यांचे ‘आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत’ या शब्दात वर्णन केले आहे.

    वसंतराव नाईक यांनी तत्कालीन मध्यप्रांतात येणाऱ्या आणि आताची महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील नील सिटी हायस्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.नंतर कायद्याची पदवी प्राप्त केली. सुरूवातीला अमरावती येथे डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचे धडे गिरवले.बंजारा समाजातील पहिले वकील म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

    पुसद,अमरावती आणि नागपूरला वकीली करत हळूहळू त्यांचा जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली.गरजू व गरीब लोकांना त्यांनी वकीली करतांना मदत केली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (दिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्यप्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३) या पदावर त्यांनी सलग १२ वर्षे काम केले.

    प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे विशेष लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. राज्यात त्यांच्याच काळात अकोला,राहुरी,परभणी आणि दापोली या चार कृषी विद्यापिठाची स्थापना झाली. राज्यात औदयोगिकरणाचे जाळे विणले. विदयुत व औष्णिक केंद्राची उभारणी केली. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नाईक साहेब लोकसभेवर निवडून आले.

    राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य राज्य समजलं जातं. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईकांचं मोठं योगदान आहे. त्यांना राज्याच्या हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं. राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होईल, राज्य अन्नधान्याच्या बाबतीत कसं स्वयंपूर्ण होईल यावर वसंतराव नाईकांनी विशेष लक्ष दिलं.

    वसंतराव नाईकांच्या काळात राज्यात कृषी विद्यापीठं आणि कृषीशी संबंधित विविध संस्थांची निर्मिती झाली. राज्यात १९७२ साली ज्यावेळी दुष्काळाचं संकट आलं होतं त्यावेळी त्यांनी अनेक उपाययोजना राबवल्या. त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणं उपलब्ध करून दिली, जलसंधारणाची कामं वाढवली आणि शेतीला शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला. नंतरच्या काळात त्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याचं दिसून आलं. त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्राच्या बाबतीत देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जातं.

● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

    १ ते ७ जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

    * महाराष्ट्रात कृषी दिनाचे महत्व

    महाराष्ट्राच्या इतिहासासाठी या दिवसाचे खूप महत्व आहे. वसंतराव नाईक यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी केलेल्या मोलाच्या सेवांना मान्यता देते. या निमित्ताने संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी काही उपक्रम आयोजित केले जातात. हा दिवस महत्त्वाचा आहे कारण कृषी दिनाच्या उत्सवात विविध योजना, कार्यशाळा आणि व्याख्यानांचा समावेश आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या दुर्दशाबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि शेतकर्‍यांना कृषी क्षेत्रासमोरील समस्यांवर उपाय शोधण्यात मदत होईल.

    आधुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या सुविख्यात कृषी तज्ज्ञ व हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती “कृषी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी व शेतीवर निस्सीम भक्ती असणारे वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे कि, “मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर जरी बसून असलो तरीदेखील माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असते. हा ‘वसंतविचार’ लक्षात घेता शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व शेतकऱ्याना आत्मबळ देण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत एकनाथ पवार यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रूजवली. कृषीप्रधान देशात पहिल्यांदाच ‘थेट बांधावर’ वसंतराव नाईक यांचे कृषीमंत्र , शेतकरी कृतज्ञतेचा संदेश व आत्मबळ देणारी ही अभिनव मोहीम नावारूपास आली. आज कृषी दिन हा कार्यालयाबरोबरच थेट बांधापर्यंत सर्वत्र साजरा होतो.

    ‘शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला.

    वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै हा दिवस राज्यात कृषिदिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यास कायमस्वरुपी शासन मान्यता देण्यात आली आहे.वसंतराव नाईकांचे कृषी क्षेत्रातील मोलाचे कार्य लक्षात घेऊन नोव्हेंबर २०१२ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात 2013 मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नाव बदलून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असे केले.

    –अनिल कुरकुटे,
    जिल्हा माहिती कार्यालय,
    वाशिम
    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    – बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

Leave a comment