“एका शिंप्याच्या जीवनाची अन् एक धागा सुख दुःखाचा जोडणारी कादंबरी म्हणजेच उसवण कादंबरी”
चार लोखंडाच्या पत्र्याच्या टपरीत एक चाक अविरत फिरत आहे, हे चाक उसवलेल्या समाज व्यवस्थेला जोडता येईल, ते आपल्या शब्दांच्या धाग्याने परिवर्तनाच्या काळात टिकून आहे, समानतेचा धागा जोडू पाहणारी टेलर जीवनाच्या वेदना मांडणारी कादंबरी म्हणजे तुळजापूर येथील युवा लेखक देविदास सौदागर लिखित युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त उसवण कादंबरी.
कापड शिवणाऱ्या टेलरचे आयुष्य काय असते तर फाटलेल्या आयुष्याला ठिगळं लावणं आणि ठिगळं लावत आयुष्य जगणं, हेच वास्तव जीवन कादंबरीत लेखकाने शब्द रूप केलेलं आहे लेखक स्वतः एक टेलर आहे त्यामुळे त्या जीवनातील कष्ट, वेदना या सर्व त्यांनी स्वतःहा अनुभवलेल्या आहेत, विठू हे एक पात्र आहे, टेलरचे जीवन जगण्याचे वास्तव म्हणजे ही कादंबरी आहे, फुलांची जशी माळ एका धाग्यात गुंफतात तशी संपूर्ण कादंबरी ही एका धाग्यात गुंफलेली आहे.
रेडीमेड कपड्यांच्या जमान्यात कापड शिवायची कमी होत गेली अन टेलर व्यावसायिकांचा रोजी रोटीचा मोठा प्रश्न आ वासून उभा राहिला, ह्या वयात ते दुसरा कामधंदाही करू शकत नाही, आता तर स्वतःचा उदरनिर्वाहही करू शकत नाही, मान्य आहे काळानुसार बदललं पाहिजे पण वय झाल्यावर काही प्रकारचे शिक्षण तर घेऊ शकत नाही, पण अचानक धंदाही बदलू शकत नाही, तेव्हा मात्र प्रचंड हाल होतात जगणं मुश्किल होऊन जाते मग प्रश्न पडतो जगावे की मरावे? पण मुलाबाळासाठी जगावचं लागतं या कादंबरीत विठूही तसंच आपल्या मुलांसाठी जगतोय , कादंबरीत वृक्षांचे महत्त्व देखील अधोरेखित केलेले आहे पिंपळाच्या झाडाखाली बुद्धांना ज्ञान मिळत होते तिथेच ते ध्यानाला बसले होते, यातून पर्यावरणाविषयी असलेली आस्था लेखकाने येथे मांडलेली आहे.
जी सुई धागा जोडण्याचे काम करते, कापड शिवते फाटलेल्या आयुष्याला जोडते, ती सुईच बोलू लागली तर…. हे विठूच्या मुलीच्या निबंधातून सुईच्या खऱ्या खुऱ्या वेदना समजतात. गावात छोटी दुकान असतात त्यावर ते काबाड कष्ट करून आपली उपजीविका करत असतात, पण त्याच गावात जेव्हा जत्रा, सण, उत्सव येतात तेव्हा गाव आनंद साजरा करते पण ह्या टेलर सारख्या छोट्या दुकानदारांना मात्र त्यावेळी त्रास सहन करावा लागतो, गावातील तरणीबांड पोरं अव्वाच्या सव्वा वर्गणी मागतात तेव्हा ते छोटे टपरीवाले ती वर्गणी देऊ शकत नाही मग त्यांना दमदाटीही केली जाते हाणामारी करतात यात टेलरचे आयुष्य पात्यात जसे दाणे भरडले जातात तसं भरडले जाते एक तर धंदा नाही त्यात वर्गणी द्यायची आणि हीच टवाळ पोरं त्याच वर्गणीतून जेव्हा दारू पिऊन मिरवणुकीत नाचतात तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं, कष्टाच्या पैशातून दुकानदारांचे आयुष्य उध्वस्त करायचं आणि इकडे मौज मस्ती करायची हा कुठला आला आहे नवीन जगण्याचा मार्ग?
जसं वर्गणीत पैसे जातात तसे गावातील पुढारी सरपंच यांच्याकडून शिलाईचे पैसे देखील कधी भेटत नाही, नुसतीच हमाली करायची, आपलाच धागा वापरून त्यांचे कापडं शिवायची आणि आपला संसार कायमचाच फाटका ठेवायचा, त्या संसाराला टाके घालण्याचा अतोनात प्रयत्न करायचा, खरंतर तो धागाच टेलरचा काळजाला, आयुष्याला बळ देत असतो, विठूचा खरा धागा होता तो म्हणजे त्याची मुलगी नंदा तिने दिलेल्या पत्रातून विठूला बळ मिळत होते नंदा त्या पत्रातून विठूचे टेलर जीवनाचे सुखदुःख मांडत होती, या कादंबरीत नंदाचे सर्व पत्र व निबंध हे प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेणारे आहेत, आसवांना वाट मोकळी करून देणारे आहेत.
“वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नाही” असं मत असणाऱ्या लेखकाने अतिशय तळमळीने या वेदना मांडल्या आहेत, ज्या व्यवस्थेने गरिबांना त्रास होतो त्यांना जगणं मुश्किल होतं त्या व्यवस्थेलाच आग लावली पाहिजे अशी चीड लेखकाच्या मनात निर्माण होते आहे. लेखक लिहितात,
अन्यायाची मांडणी करणारी
सगळीच सामग्री जाळून टाकली पाहिजे
उरलेल्या मजकुरावर राख उमटेपर्यंत…..
आपणच डोळ्यात तेल घालून
पेटवली पाहिजे ही आग…….
तत्त्वशीलपणा ठेवून गरिबीत जगून कष्ट करून देखील वीतभर पोटाला पोटभर अन्न मिळत नसेल तर त्या व्यवस्थेला जाब विचारलाच पाहिजे, या व्यवस्थेविरुद्ध लढलंच पाहिजे, हे या कादंबरीत अनेक उदाहरण देऊन सांगितले आहे.
“येडी माणसं येडी कधीच नसतात” तर ती शहाणी असतात, पण समाज त्यांना वेडा ठरवतो कारण ती माणसं या व्यवस्थेला प्रश्न विचारतात चुकीच्या गोष्टी घडल्या की जाब विचारतात, जाब विचारणार्यांना एक तर शांत करतात किंवा थेट येड ठरवतात पण समाज काही सुधारायला तयार नाही श्रीमंत लोक गरिबांचे लोचके तोडूनच मोठे होतात म्हणूनच तर श्रीमंत आणि गरीब या दोन दऱ्या पडलेल्या आहेत त्या कधीच भरून येत नाही दोन दऱ्या सपाट होत नाही तोपर्यंत त्याचा पठार कधीच तयार होत नाही, धंदा नसल्याकारणाने विठू टेलर गरीब होत जातो अखेर त्याला दुकानाचे भाडेही भरणे शक्य होत नाही त्याला टेलर दुकान बंद करावे लागते कारण लगीन सराईतही आता रेडिमेड कपडेच लोक घेत आहेत.
टेलरच्या धंद्यात तर वेदनेलाही फुंकर मारण्याचा अजिबात अधिकार नसतो. एक प्रसंग या कादंबरीत आहे त्यात नव्या कापडावर विठूचे रक्त सांडले जाते त्याच्या हातात सुई घुसली जाते, तेव्हा दुःख वेदनेचे कमी अन् कापड भरून देण्याचे जास्त होते, त्यामुळे टेलर व्यवसायात वेदनेला नेहमीच फुंकर घालावी लागते, स्वतःच्या वेदना गुंडाळून ठेवाव्या लागतात. कंबर व पाठदुखीचा भयंकर त्रास होतो मानपाठ एक होऊन जाते. त्या वेदना तो कुणालाच सांगू शकत नाही कारण धंदा तर त्याला करायचा असतो.
ज्या शिलाई मशीन वर आयुष्य शिवल गेलं, रोवलं गेलं त्याच मशीनवरून विठुचे आयुष्य आता उसवू लागलं होतं, कापड कापल्यानंतर उरलेल्या चिद्यांच जीवन जगण्याचं साधन बनू लागले, जो धागा सर्व कापडांना एकत्र करतो तसाच एखादा धागा पाहिजे की जो या समाज मनाला एकत्र करेल, म्हणजे एक धागा सुखदुःखाचा आहे तो उसवता उसवता जोडला जाईल. धागा तोच असतो पण धागा पतंगाला जोडला तर पतंग आभाळात उडते ,धागा भोवऱ्याला गुंडाळला गेला तर एका पायावर जमिनीवर भोवरा फिरतो, तसेच तो धागा वडाला गुंडाळला तर नवरा-बायकोच्या नात्यांना बळकटी देतो मनगटावर बांधला तर बहिण भावाच्या नात्याला बळकटी देतो, तोच धागा सोन्याच्या मण्यात शिरला तर सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र तयार होतंय, आणि हा धागा सुईत शिरला तर असंख्य चिंध्यांना असंख्य कापडांना एकत्र करत तो सुखदुःखाचा धागा तयार होतो आणि अनेक उसवलेल्या चिंध्या, कापड शिवण्याचा, समाजमन जोडण्याचा, प्रयत्न करतो आणि हाच प्रयत्न लेखक देविदास सौदागर यांनी ह्या कादंबरीत केला आहे.
चित्रकार कौस्तुभ घाणेकर यांनी उत्कृष्ट असे मुखपृष्ठ कादंबरीचे रेखाटलेले आहे, देशमुख आणि कंपनी पुणे यांनी सुरेख प्रकाशन केले आहे, फाटक्या तुटक्या गोष्टी जोडणाऱ्या हातांना ही कादंबरी समर्पित केलीआहे, अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या लागणाऱ्या मूलभूत गोष्टी, त्यातील लागणारे वस्त्र आहे जे टेलर शिवतो त्या शिंप्याच्या आयुष्याची कथा म्हणजे ही कादंबरी उसवण होय. सर्वांनी वाचावी अशीच आहे, लेखकास पुढील लेखनास खूप खूप वृक्षमय शुभेच्छा.!
– वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर.
(दोडी बू ll)
एक धागा सुख दुःखाचा जोडणारी कादंबरी ‘उसवण’