टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिकचा वापर करा.!
टोमॅटो हा आपल्या रोजच्या स्वयंपाकात लागणारा अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. टोमॅटो शिवाय कोणताही पदार्थ बनवणे म्हणजे अपुरेच आहे. डाळ, भाजी, आमटी असे कोणतेही पदार्थ बनवायचे म्हटलं की टोमॅटो हा त्यातील एक महत्वाचा घटक मानला जातो.
टोमॅटो घातल्याने पदार्थांना आंबट गोड अशी चव येते. स्वयंपाक घरामधील कुठलीही भाजी किंवा रेसिपी करायचे असेल तर टोमॅटोची गरज भासतेच. त्यामुळे टॉमॅटोला स्वयंपाक घरातील बादशहा असे म्हटले जाते. टोमॅटो मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असतात. त्यामुळे टोमॅटो आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. आपल्या किचन मध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो कायम उपलब्ध असतातच. तसे कांदा, बटाटा, टोमॅटो वर्षाचे बाराही महिने बाजारात विकत मिळतात. सध्याचा दिवसात टोमॅटोचा विचार केला तर टोमॅटोचे दर हे गगनाला भिडलेले आहेत.
सामान्य माणसाला सध्याच्या काळात टोमॅटो खाणे परवडत नाही. बाजारात कुठल्याही ठेल्यावर टोमॅटोचे दर विचारले तर ते आपल्या अवाक्या बाहेरचे असतात. त्यामुळे टोमॅटोचे दर खाली उतरेपर्यंत आपण टोमॅटो खाणे बंद करतो. परंतु कधी बाजारांत टोमॅटोची आवक जास्त झाल्यावर त्याचा दर पडून टोमॅटो अतिशय स्वस्त किमतीत उपलब्ध होतात. अशावेळी गृहिणी जास्तीचे टोमॅटो विकत घेऊन ते फ्रिज मध्ये स्टोअर करून ठेवतात. परंतु हे जास्तीचे टोमॅटो खरेदी केल्यानंतर काही कालांतराने फ्रिज मध्ये ठेवून खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी कमी दरांत विकत घेतलेले टोमॅटो दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करु.
आंबट गोड व चविष्ट टोमॅटो सलॅड म्हणून खाता येतो, दह्याबरोबर कोशिंबीरीत टाकता येते, अनेक भाज्यात, खिचडीत, सुजीत, उपम्यात वापरता येतो. घरात भाजी उपलब्ध नसेल तर झटपट टोमॅटोची चटणी बनवून काम होऊ शकते. परंतु टोमॅटो महाग असल्यामुळे सध्या तरी काही लोक टोमॅटोची खरेदी करत नाहीत किंवा एकदाच टोमॅटो विकत घेऊन ते काटकसर करून वापरले जातात. अशावेळी हे महाग टोमॅटो विकत घेऊन ते दीर्घकाळ स्टोअर करून खराब होऊ नये यासाठी एक सोपी ट्रिक.
* सर्वप्रथम बाजारातून विकत आणलेले टोमॅटो स्वच्छ पाण्याखाली व्यवस्थित धुवून घ्यावेत.
* टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या नंतर, सुती कापडाने पुसून घ्यावेत.
* त्यानंतर काही काळासाठी टोमॅटो हवेवर उघडे ठेवून व्यवस्थित वाळवून घ्यावेत. (टोमॅटोवर पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्यावी).
* आता एक मेणबत्ती पेटवून घ्यावी. टोमॅटो वाळल्या नंतर त्याच्या वरच्या भागाजवळ असलेल्या देठाजवळ या मेणबत्तीचे वितळलेले मेण ओतून टोमॅटो सील करून घ्यावेत.
* आता हे सील केलेले टोमॅटो फ्रिज मध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवावे.
* जेव्हा कधी आपण हे टोमॅटो वापरायला काढाल तेव्हा त्याच्या देठाजवळ असलेला मेणाचा भाग काढून मगच ते वापरायला घ्यावेत.
अशा प्रकारे आपण महागडे टोमॅटो या सोप्या ट्रिकचा वापर करून दीर्घकाळ टिकवून हवे तेव्हा वापरु शकतो.
संकलन : मिलिंद पंडित,
कल्याण
(सौजन्य : दैनिक लोकमत)