अतुल बेडेकर यांचे अकाली निधन
अतुल बेडेकर यांच्या अकाली निधनाने मराठी खाद्यपदार्थ उद्योग सातासमुद्रापार पोहोचवणारा धडाडीचा उद्योजक हरपला : सुधीर मुनगंटीवार
मुंबई, : .व्ही पी. बेडेकर अँड सन्स या आघाडीच्या लोणची मसाले उद्योगाचे संचालक श्री अतुलजी बेडेकर यांचे अकाली निधन अतिशय धक्कादायक आहे. मराठी पारंपीरिक खाद्यपदार्थ सातासमुद्रापार पोहोचवणारा पुढच्या पिढीतील एक धडाडीचा उद्योजक आपण अकाली गमावला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
पारंपारिक लोणची, मसाले व चटण्या बनविण्याच्या उद्योगात त्यांनी स्वतःचा छाप उमटवला होता. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला बेडेकर मसाले हा ब्रँड खऱ्या अर्थाने ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यात स्व. श्री अतुलजींचा मोलाचा वाटा होता. “बेडेकर” हा ब्रँड त्यांनी सातासमुद्रापार पोहोचवलाच, त्याचबरोबर फ्रोजन फूडच्या नव्या क्षेत्रात प्रवेश करत उकडीचे मोदक, मसालेभात, बटाटेवडा यासारखे पारंपारिक अस्सल मराठी पदार्थ फ्रोजन स्वरूपात त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळेच हे पारंपारिक मराठी पदार्थ पंचतारांकित हॉटेल्स, एअर इंडियाची विमाने यातही उपलब्ध होऊ शकत आहेत, ही त्यांची कौतुकास्पद कामगिरी आहे.
‘स्वयंसेवक उद्योजक’ असलेले श्री. अतुलजी रा. स्व. संघाच्या गिरगाव नगराचे संघचालक होते. जनता सहकारी बँक पुणे या आघाडीच्या बँकेचे संचालकही होते. इतरही अनेक सामाजिक संस्थांमधे मोठ्या प्रमाणात ते सक्रीय सहभागी होते.
ईश्वर त्यांना सद्गती देवो, मी बेडेकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, या धक्क्यातून लवकर सावरण्याचे बळ ईश्वर त्यांना देवो. स्व. श्री अतुलजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असे ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.