ते दिवस वेगळे होते.!
ऐंशीच्या दशकात देशात आणि जास्त करून महाराष्ट्रात शरद जोशी साहेबांची शेतकरी संघटना जोरात होती.स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात औद्योगिकरणावर जास्त जोर दिला गेला. वैज्ञानिक प्रगतीही होत गेली. शेतीविषयक सुधारणाही भरपूर झाल्या. बहात्तरच्या दुष्काळात तर जवळ जवळ सगळ्यांनाच रोजगार हमीच्या कामावर जावे लागले असेल.कुपनवर मिळणारी रेशन दुकानावरची ‘ मिलो ‘ ज्वारीही काहींना आठवत असेल. त्या ज्वारीच्या भाकरी खातांना आपण एखाद्या जनावरासारखा चारा खात आहोत असे वाटायचे. तोंडात चोथा जमा व्हायचा. हायब्रीड बीयाणे आली.देशात हरीत क्रांती झाली. शेती सुधारली. देशातील लोकांची खाण्या पिण्याची ददात मिटली.पण शेतकरी सुधारला नाही. शेतकरी राजा आहे. तो जगाचा पोशिंदा आहे. असे म्हणून त्याला मोठेपणा देत राहिले.शेतात कष्ट करण्यासाठी तो फक्त जगला पाहिजे एवढ्यापुरते शेतकऱ्याकडे पाहिले जायचे. शेतकऱ्यांची एकजूट होत नाही हे सर्व जण जाणून होते. निवडणुकीतही शेतकरी ग्रुहीत धरला जायचा. त्याला फारसे महत्त्व राजकीय पक्ष देत नव्हते. हे चित्र खऱ्या अर्थाने कुणी बदलवले असेल तर ते शेतकरी संघटनेचे संस्थापक माननीय शरद जोशी साहेबांनी.
जोशी साहेब हे उच्च शिक्षित होते. युनो सारख्या संस्थेत ते गलेलठ्ठ पगारावर नोकरीला होते. नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी ते भारतात आले तेंव्हा त्यांना पंचेचाळीस हजार रुपये पगार होता असे आम्ही ऐकून होतो . तेव्हा मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो होतो आणि मला पगार एक हजार रूपयेही नव्हता. जोशी साहेब अर्थशास्त्राचे जाणकार होते. आंबेठाणच्या आपल्या शेतात त्यांनी अगोदर वर्षभर शेती करून पाहीली. सर्व खर्चाच्या नोंदी केल्या. शेतात राबणाऱ्या लहाना पासून ते म्हाताऱ्या माणसाच्या कामाचे मूल्य काढले. त्यांच्या लक्षात आले की शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचेही मोल मिळत नाही. नफा तर दूरची गोष्ट आहे. अंगार मळा मधे त्यांनी हे लिहून ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी ‘शेतकरी संघटना ‘ स्थापन केली. या संघटने मार्फत त्यांनी शेतकऱ्यांमधे जाग्रुती निर्माण केली. त्यांनी सरकारी धोरणे तपासून पाहीली. त्यांच्या लक्षात आले की सरकारी धोरणे शेतकरी हिताची नाहीत. अडाणी, कष्टकरी शेतकऱ्यांना अंधारात ठेवले जात आहे हे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांमधील स्वाभिमान जाग्रुत करण्याचे काम जोशी साहेबांनी केले.
गावोगावी जावून त्यांनी शेतकऱ्यांच्या सभा घेतल्या. आपल्या अभ्यासपुर्ण आणि अमोघ वक्तृत्वाने लोकांची मने जिंकायला सुरुवात केली. शेतकरी त्यांच्या विचारांमुळे त्यांच्या कडे आकर्षित होत गेले. सर्वात आधी त्यांना साथ दिली ती नाशिक जिल्ह्याने.कधी पायी यात्रा तर कधी मोटारसायकल यात्रा काढून त्यांनी जिल्हा पिंजून काढला. शेतकऱ्यांबरोबर एखाद्या झाडाच्या सावलीत बसून फडक्यात बांधलेली चटणी भाकर खाल्ली. एवढा मोठा माणूस ,एवढी मोठी नोकरी सोडून आपल्या कल्याणासाठी उन्हातान्हात हिंडतो, चटणी भाकर खातो,महाराष्ट्रच काय पण दिल्ली सरकारलाही खडसावून जाब विचारतो या गोष्टी शेतकऱ्यांसाठी नवीन होत्या. त्यांचे विचार ऐकण्यासाठी गावोगावी लोक गर्दी करू लागले.त्यांना स्टेजची गरज पडायची नाही. गाडीच्या टपावर उभे राहून ते भाषण द्यायचे.लोक त्यांचे भाषण रेकॉर्ड करून घ्यायचे. कँसेटवरून त्यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग जिकडे तिकडे ऐकायला येवू लागले. पेपर मधून त्यांची भाषणे व माहिती पुर्ण लेख छापून येत असत. शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती, अनुदान जाहीर केले जायचे. शेतकऱ्यांविषयी आपल्याला किती कळवळा आहे, काळजी आहे हे दाखवले जात होते. पण जोशी साहेबांनी सांगितले की आम्हाला भिक नको. शेतकऱ्याला त्याच्या मालाचा पुरेपूर मोबदला मिळाला पाहिजे. त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळायला हवे.” भीक नको, हवेत घामाचे दाम.” ही त्यांची घोषणा शेतकऱ्यांमधे चैतन्य निर्माण करून गेली. त्यांनी केलेले ‘रस्ता रोको’आंदोलन शेतकऱ्यांनी अभूतपूर्व रित्या यशस्वी करून दाखविले. या आंदोलनाचे पडसाद साऱ्या देशभर उमटले.रेल्वे ,एसटी ,ट्रक सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली. बरेच दिवस लोकं जागेवरच अडकून पडले. सरकारला शेतकऱ्यांशी वाटाघाटी करणे भाग पडले.
जोशी साहेबांच्या एकेका शब्दासाठी लोक रस्त्यावर उतरून पोलीसांच्या लाठीचे वार पाठीवर झेलू लागले. माधवराव खंडेराव मोरे यांची मुलुख मैदानी तोफ जोशी साहेबांबरोबर धडाडू लागली. नरेंद्र आहीरे,प्रल्हाद पाटील कराड,अनील गोटे असे अनेक दिग्गज त्यांना येवून मिळाले.खेरवाडी,चांदवड, सटाणा येथील आंदोलने गाजली.
चांदवडला शेतीत काम करणाऱ्या कष्टकरी महिलांचे अधीवेशन संघटनेने आयोजित केले होते. अनेक राज्यातून आदिवासी, शेतमजूर महिला या सभेला उपस्थित होत्या. तो ऐतिहासिक मेळावा पाहण्यासाठी धुळ्याहून माझा मित्र ओ.एम.पाटील सर अगोदर माझ्या कडे निमोणला आला. तेथून ट्रँक्टरने आम्ही चांदवडला गेलो.अतिशय भव्य असा मेळावा आम्हाला पहायला मिळाला. नवापूर भागातील आदिवासी महीलांची जोशपूर्ण भाषणे ऐकली. अनेक महत्त्वाचे ठराव शेतकरी संघटनेने त्या अधीवेशनात केले. काही दिवस चांदवड हे महिलांनी व शेतकरी कार्यकर्त्यांनी गजबजून गेले होते. शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला शेतकरी अभीमानाने छातीवर मिरवत असे.ओंकार बापू ,मी आणि आमच्या सारखे अनेक शरद जोशी साहेबांचे फँन होते.
आर्थिक स्तरावर हिंदूस्थानची मांडणी त्यांनी दोन भागात केली.’इंडिया’ या’ आणि ‘भारत’.भारतात गरीब, कष्टकरी, शेतकरी राहतात आणि त्यांचे शोषण करीत श्रीमंतीत लोळनारे इंडियात राहतात असे ते म्हणत.राजकारणी लोकांवर टिका करताना ते म्हणत,’ गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले.’भरपूर दूधाचे उत्पादन करणारा शेतकरी सर्व दूध डेअरीला घालतो आणि बादली धूवून त्या पाण्याचा चहा पितो.गावठी तूप, लोणी त्याला परवडत नाही. आणि जो कधी शेतात राबला नाही, ज्याने कधी शेती पाहली नाही तो मात्र मलयीदार दुधाचा चहा पितो.तुप लोणी इंडियाच्या वाट्याला. इकडे शेती तोट्यात चालते म्हणून शेतकरी आत्महत्या करतात पण शेती वर आधारित खते,रसायने, बीयाणे यांचा व्ययसाय करणारे गब्बर होतात.वर्ष भर शेतात राबून शेतकऱ्याला जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त पैसे दलाल, व्यापारी एकाच दिवसात त्याच शेतकऱ्याच्या उत्पादनावर मिळवतात.जोशी साहेबांनी ही विषमता दाखवून दिली. शेतकऱ्यांचे शोषण थांबले पाहिजे असे ते म्हणत.उत्पादक शेतकरी उपाशी आणि व्यापारी, दलाल, नोकरदार तुपाशी अशी त्यांनी मांडणी केली. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे सरकारला खोडून काढता आले नाहीत. शरद जोशी आपल्यासाठी मसीहा आहे असे शेतकऱ्यांना वाटू लागले. शरद जोशी जोपर्यंत राजकारणात आले नव्हते तोपर्यंत शेतकरी त्यांना देव मानत होते.” मी तुमच्या कडे मते मागायला येणार नाही. मी मते मागायला आलो तर मला जोड्याने मारा” असे ते म्हणत. या वाक्याचा लोकांवर खुप परिणाम होत असे.जोपर्यंत एखादी संघटना सेवाभावी पद्धतीने काम करीत असते, नि:स्वार्थपणे काम करीत असते तोपर्यंत ती इतरांच्या आदरास प्राप्त होत असते.
● हे वाचा – ग्रामीण जीवनाचा सार म्हणजे : भूक छळते तेव्हा…
शेतकरी संघटना निवडणूका लढवीत नव्हती.पण संघटनेचा दबाव सगळेच जाणून होते. पुलोद सरकार पडल्यानंतर झालेल्या निवडणुकीत शेतकरी संघटनेने माननीय शरद पवार साहेबांना पाठींबा दिला. तेंव्हा नाशिक जिल्ह्यातील शरद पवार साहेबांचे चौदाचे चौदा आमदार निवडून आले होते. ही किमया शेतकरी संघटनेची होती.पुढे संघटनेच्या डोक्यातही सत्तेची हवा जायला लागली. संघटनेतील काही नेते निवडणूक लढविण्याची मागणी करू लागले. जोपर्यंत आपले प्रतीनीधी विधानसभेत व संसदेत जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असे काहींचे म्हणने पडले.शेतकरी संघटनेची दखल देशपातळीवर सुद्धा घेतली जात होती. महेंद्रसिंग टिकैत सारखे किसान नेते शरद जोशींना भेटण्यासाठी आंबेठाणला त्यांच्या अंगार मळ्यात येत होते.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे आंदोलन डोक्यावर घेतले होते.कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या त्यांहून बिकट होत्या. त्यांचा आवाज कायम दबलेलाच राहिला. शेतकरी संघटनेचे कार्य केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर सांगली कोल्हापूर सह महाराष्ट्रात पसरले होते. अनेक धडाडीचे नेते संघटनेला बळ देत होते. शेतकरी जागृत होत होता.
31 आक्टोबर 1984 ला मालेगाव जवळील टेहरे येथे शरद जोशी साहेबांची प्रचंड मोठी जाहीर सभा झाली. त्या दिवशी बुधवार होता. मी तो दिवस आयुष्यात कधीच विसरणार नाही.त्या सभेला हजर राहण्यासाठी मी व माझे मित्र डॉ. इनामदार निमोणवरून मोटारसायकलवर टेहरेला गेलो होतो. डॉक्टरकडे एक गुंठाही जमीन नव्हती.मी ही शेतकरी नव्हतो तर एक शिक्षक होतो. पण आम्ही शेतकरी संघटनेच्या कार्याने भारावलेले होतो. आमच्या सारखे असे खुप जण होते. एखाद्या पोथीचे पारायण होते तसे जोशी साहेबांच्या पुस्तकांचे काही गावांत वाचन होत होते. तो जमाना कँसेट आणि टेपरेकॉर्डरचा होता. जोशी साहेबांच्या व इतर संघटनेतील नेत्यांची भाषणे गावोगावी लोक ऐकत होते. माझा मित्र ओंकार पाटील जो धुळ्याला शिक्षक होता त्याने त्याच दिवसात झालेल्या त्याच्या मुलाचे नाव शरद ठेवले. पुढेही त्याला शेतीचेच शिक्षण दिले.तो आपल्या परीसरातील जोशी साहेबांची एकही सभा टाळत नसे.मोठ्या प्रयत्नाने त्याने व त्यांच्या मित्रांनी जोशी साहेबांची सभा आमचे गाव चौगाव येथे घडवून आणली होती. एक दिवस तरी जोशी साहेबांना आपल्या गावाला, चौगावला आणायचेच हे बापूचे स्वप्न होते आणि ते त्याने पुर्ण केले.शेती शास्रात पदवीधर शरदचे ‘शरद अग्रो’ हे दुकान कुसुंब्याला आहे. आजही ओंकार बापू शेतीत आणि शेतकरी संघटनेत सक्रीय आहे.संघटनेच्या कार्याने भारावलेली ती आमची पीढी होती.
टेहेरेच्या सभेला लाखोनी जनसमुदाय लोटला होता. त्याकाळी एवढ्या गाड्या नव्हत्या तरी मालेगाव पर्यंत गाड्यांची रीघ लागली होती. आधीच्या एका आंदोलनात टेहऱ्याचा शेतकरी शहीद झाला होता. त्यांचे स्मारक तेथे व्हावे म्हणून ती सभा तेथे घेतली होती. जोशी साहेब काय बोलतात यांकडे आमचे लक्ष लागून राहिले होते. आणि देशाला हादरवून सोडणारी बातमी त्या सभेत समजली ती म्हणजे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींची हत्या त्यांचाच सुरक्षा रक्षक बियंतसिंगने केली होती.पंजाब मधील खलीस्तान चळवळ, भिंद्रनवाला ,आपरेशन ब्लु स्टार या सगळी पार्श्वभूमीवर ही हत्या झाली होती. नेत्यांनी सभा आटोपती घेतली. संध्याकाळ झाल्याने आम्हीही निमोणकडे परतलो. इंदिरा गांधींच्या हत्येने संतप्त झालेल्या लोकांनी देशात दंगली घडवून आणायला सुरुवात केली होती.विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात होते.
शेतकरी संघटनेतील काही नेत्यांना सत्तेची खुर्ची खुणावत होती. तर काही शेतकरी नेते संघटनेपासून दूरावत चालले होते. शरद जोशींनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. मते मागायला आलो तर जोड्याने मारा म्हणणारे मते मागू लागले. भीक नको, हवेत घामाचे दाम म्हणणारे मतांची भीक मागू लागले. राजकारणाच्या चिखलात उतरल्याने जोशी साहेबांवरही चिखल उडू लागला.त्यांच्या पक्षाचे काही आमदार विधानसभेत पोहोचले पण म्हणावे असे यश त्यांना मिळाले नाही. संघटनेत फुट पडली. काहींनी वेगळ्या नावाने शेतकरी संघटना काढल्या. जोशी साहेबांच्या ज्ञानाचा फायदा देशाला व्हावा म्हणून त्यांना राज्य सभेत खासदार म्हणून घेतले. पण आता त्यांचा पुर्वीचा करीष्मा राहीला नव्हता.
90 साली निमोणहून माझी बदली मनेगावला झाली. मी सिन्नरला राहात होतो.95/96 च्या आसपासची घटना असावी. एका प्रचार सभेसाठी शरद जोशी साहेब सिन्नरला येताहेत असे समजले.नगरपालिकेच्या दवाखान्यासमोरील रस्त्यावर त्यांची सभा होणार होती. मी व आर.पी.शिंदे सर तिकडे गेलो.स्टेज तयार होत आले होते. दोन चार माणसे स्टेजवर काम करीत होती.शिवाजी चौकात झुंजार आव्हाडांची सभा चालू होती. झुंजार आव्हाडांचे नुसते नाव ऐकूणच ते काय मजेशीर बोलतात ते ऐकण्यासाठी सगळे सिन्नर तिकडे लोटले होते. एवढ्यात नगरपालीका जवळील स्टेजसमोरील मोकळ्या जागेत एक कार येवून थांबली. मी व शिंदे सर कुतूहल म्हणून गाडीकडे गेलो. पाहतो तर काय आश्चर्य! गाडीत चक्क शरद जोशी साहेब बसले होते. ड्रायव्हर आणि साहेब, फक्त दोघेजण. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता पण ते खरे होते. जीन पँट आणि टी शर्ट परीधान केलेले जोशी साहेब बिसलीरीचे पाणी पीत होते. मी जवळ गेलो. त्यांना म्हणालो.”साहेब, हे काय? कुठे लाखोंच्या सभा आणि कुठे हे रिकामे मैदान ?चांदवड,टेहरेच्या सभा मी पाहिल्या आहेत.” साहेब म्हणाले, ” ते दिवसच वेगळे होते .” साहेबांना सांगितले की थोड्या वेळाने झुंजार साहेबांची सभा संपेल. आणि त्यानंतरच लोकं इकडे येतील.
पिंजरा सिनेमातील मास्तरचे गाणे मला आठवले.जोशी साहेबांनी राजकारणात पडायला नको होते असेच सामान्य माणसाला वाटत होते.बाहेर राहूनच राजकारणावर दबाव टाकून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या असे सर्व सामान्य माणसाला वाटायचे. जोशी साहेबांची सभा झाली पण पहिल्या सारखा जोश नव्हता.आजच्या अशा परिस्थितीत साहेबांना पाहताना मनाला क्लेश होत होते. काही असो पण ,जोशी साहेबांविषयी आजही मनात तेवढाच आदर आहे जो पुर्वी होता. शेती, शेतकरी, शेतकरी संघटना आणि शरद जोशी हे नाते अतुट होते, अतुटच राहील.
-मोरे जी.बी.सर
सिन्नर ( चौगावकर).