सावित्री फातिमा वेध भविष्याचा अभियान
‘वेध भविष्याचा’ विद्यार्थी आणि करिअर मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी) : स्पर्धेच्या युगात करिअर निवडताना भविष्यकालीन संधीचा विचार करुन क्षेत्र निवडावे. नव तंत्रज्ञानामुळे नेहमींच्या पाऊलवाटांशिवाय करिअरचे नवीन मार्ग चोखंदळावे, असे प्रतिपादन करिअर व्याख्याते प्रा. विजय नवले यांनी केले.
चांदुरबाजार तालुक्यातील श्री बालमुकुंद राठी विद्यालय, शिरसगाव कसबा येथे आयोजित ‘वेध भविष्याचा’ करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. नवले बोलत होते. ‘सावित्री फातिमा वेध भविष्याचा’ अभियानांतर्गत आमदार तथा दिव्यांग कल्याण विभाग, ‘दिव्यांगांच्या दारी अभियाना’ चे राज्य अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील विद्यार्थी तसेच पालकांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता.
करिअर निवडताना आवड, क्षमता, पात्रता यांचा प्रामुख्याने विचार व्हावा. विविध क्षेत्रांची माहिती घेऊन त्यावर विद्यार्थी आणि पालक यांनी सकारात्मक चर्चा करुन करिअरची निवड करावी. दहावी बारावीतील यशानंतर थांबू नका. तसेच जर सध्या गुणांच्या बाबतीत अपयश आले असले तरी यापुढे सातत्याने प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळेल. करिअरच्या वाटचालीत बुद्धिमत्ता जेवढी महत्त्वाची त्याहीपेक्षा कौशल्ये आणि इच्छाशक्ती जास्त महत्त्वाची आहे. यापुढील काळातील संधींसाठी संशोधन, उद्योजकता हे क्षेत्रही विचारात घ्यावे, असे श्री. नवले म्हणाले.
आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वेध भविष्याचा हा विदयार्थ्यांना दिशा देणारा कार्यक्रम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.श्री बालमुकुंद राठी विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमासाठी शिरसगाव कसबा, ब्राम्हणवाडा थडी, कारंजा बहिरम व कुऱ्हा या केंद्रातील वर्ग सहावी ते बारावी इयत्तेतील विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी श्री. वसुले, केंद्र प्रमुख श्री. कुऱ्हाडे, राहुल मोहोड यांनी परिश्रम घेतले.
याच कार्यक्रमाच्या धर्तीवर संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा भक्तीधाम, चांदुरबाजार येथेही विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे प्रा. नवले यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र इंगोले, शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, गट शिक्षणाधिकारी वखार अहमद, चांदुर बाजार तसेच शिराजगाव बंड चे सरपंच यावेळी उपस्थित होते.