पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!
“मला पडलेला प्रश्न , जे लोक स्वतःला सुशिक्षित समजतात कुत्रे वागवतात आणि सकाळी फिरायला निघतात आणि कोणाच्या घरासमोर , कोणाच्या दुकानासमोर ते कुत्र घाण करते, है योग्य आहे का , जर कुत्र वागवायची आवड आहे तर ते कुत्र्याला घाण सुद्धा स्वतःच्या घरातच करायला शिकवा, माझा हा विचार चुकीचा की बरोबर……”
समाजात संवेदनाशील लोक अजुनही आहेत. स्वतः बद्दलच्या इतकीच काळजी त्यांना समाजघटकाबद्दल असते. त्यांचे निरीक्षण अतिषय सूक्ष्म असते. समाजविघातक काही दिसले की काळजीपोटी ते उव्देगाने व्यक्त होत असतात. व्यक्त होण्याची भाषा वरदर्शनी मवाळ वाटत असली तरी एखाद्या किळस येणाऱ्या कृतीचा प्रचंड संताप आल्यावर ही ते संयमीत व्यक्त होत असतात. वरील पोस्ट कुणबी समाज बांधव, श्री. रविंद्र फाटे यांची आहे. त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. माहितीतल्या व्यक्तिंना ते चांगले ठाऊक आहेत. व अनोळखी व्यक्तीने त्यांचा परिचय करून घ्यावा असा हा माणूस आहे!
कोणी काय करावे? हा ज्याचा त्याचा खाजगी विषय असला तरी आपल्या एकंदरीत वागण्यातून, वर्तनातून इतरांना त्रास होणार नाही किमान एवढे भान ठेवणे आवश्यक आहे. विवेक गहाण ठेवल्यासारखे वावरल्याने लोकांच्या मनातून उतरण्यासाठी एवढे कारण पुरेसे असते. भौगोलिक आकार अन् लोकसंखेची घनता यामध्ये अकोला जिल्हा राज्याच्या १४ व्या क्रमांकावर आहे. साक्षरांची संख्या ९२% टक्क्यावर आहे. असे एक आकडेवारी सांगते.
या पोस्टवर आपली संतप्त प्रतिक्रिया देताना श्री. राजेश सोनोने यांनी, अकोला च्या जठारपेठेस ‘अतिषय सुसंस्कृत आणि सुशिक्षित’ लोकांची वस्ती संबोधली आहे. आणि ते शंभर टक्के खरे आहे. ते म्हणतात, “जठारपेठ भागात बिर्ला राम मंदिर परिसरात जेष्ठ नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात आणि कुत्रे पाळणारे शौकीन लोक त्यांना संडास करण्याकरिता त्या परिसरात घेऊन येतात.” अक्षरशः या परिसराला कुत्र्यांच्या ‘हागणदारीचे’ स्वरूप आले आहे. म्हणून या चिंतेच्या बाबीची दखल एका जागरूक नागरिकांला घ्यावी लागली आहे. यावरून एकंदर परिस्थितीचे गांभिर्य लक्षात येते.
स्वतः सुशिक्षित आणि शहाणे म्हणवून घेणारांची ही कृती निश्चितच निषेधार्ह आहे! किमान अशा अमानवी कृतीचे समर्थन होऊच शकत नाही. म्हातारे आईवडील वृद्धाश्रमात आणि पाळलेले जातीवंत कुत्रे, गालीच्यावर! अशा प्रकारची संस्कृती हल्ली रुजायला लागली आहे. कालांतराने तिची पाळेमुळे खोलवर घट्ट रुजतीलही तोवर म्हाताऱ्या आईवडीलांची काय ससेहोलपट होईल हे त्या पांडुरंगालाच माहीत. बरं, हे पोसलेले जातीवंत खर्चिक कुत्रे मालकाच्या अंगावर भुंकण्यात तरबेज असल्यामुळे, भुंकून धन्यता माणून घेतात. प्रसंगी चोर आलाच तर शेपूट घालून सोफ्याखाली गुरंगुरं करत बसतात. गावठी कुत्र्याप्रमाणे ते आक्रमक होऊन चोरांना पिटाळून लावत नाहीत. उलट, मालकाला समजावून सांगतात, ‘जीव गेल्यापेक्षा अख्खे घर धुवून नेलेले कधी ही परवडते!’
फटाक्यांचे दुष्परिणाम सर्वांना माहीती आहेतच. आम्हाला सदैव शत्रू समजतो, त्या देशातून आयात केलेले फटाकडे आम्ही दिवाळी व सणासुदीला वाजवून आनंद साजरा करतो. क्षणिक आनंद मिळविण्याच्या हव्यासापोटी लाखो रुपायाचे चलन हस्तांतरीत करून प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण करतो. ना कोणाला खंत ना खेद! ओरड करणारे ओरडून थकले की सारा धुराळा खाली बसतो. ज्या गोष्टीपासून काहीच फायदा नाही उलट, नुकसानच आहे. हे माहीत असुनही आमचा त्या बाजुचा कल कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. दिसणार ही कसे म्हणा, तसे असते तर दारूच्या दुकानावर एवढी झुंबळ दिसलीच नसती. आणि गल्लोगल्ली दुधाची बादली घेऊन जीवाच्या आकांताने बोंबलणारा दुधविक्या दिसला नसता. दूध घ्या…. दूध!
‘टाळायला हजार बाता असती इथे या!
निरर्थक भांडणास वेळ आहे कोणाला?’
आम्ही दहा दिवस गणपतीला आणि दहा दिवस देवी ला एकत्र येतो. संघटित होत नाही. कारण, संघटनाचा शाप आम्हाला दिला आहे की काय? असा प्रश्न हल्ली फार सतावत आहे. आणि असा शाप देणारा सापडला तर त्याचे काय करायचे? याचे नियोजन आम्ही अजुनही केले नाही. आमच्या चोराच्या उलट्या बोंबा कायम ठरलेल्या. कधी म्हणायचे की तुम्ही आमच्यापेक्षा ‘हलके’ अहात तर कधी म्हणतात, ‘तुम्ही अन् आम्ही’ एकच आहोत. किती पंचाईत? माझ्यासारख्या सामान्य बुद्धी असलेल्या माणसाचा प्रचंड गोंधळ होतो. नेमके काय समजायचे? शहाणे लोक यालाच ‘कनफ्यूज’ असे बोलतात. तेव्हा, माझी तर खूप तारांबळ उडते. आकोला च्या भाषेत सांगायचे झाल्यास, ‘लाय शेंबूळ एक होते!’ कुत्र्याच्या शी सारखा सर्वत्र दुर्गंध पसरला आहे की काय अशी शंका यायला लागते.
ह्या सगळ्या बाबी कुत्र्याच्या ‘शी’सारख्या किळसवाण्या वाटतात. शी मानवाची असो वा प्राण्याची ती किसळवाणीच असते. म्हणूनच, बहुधा कोणाच्या खुट्याला बैल नाही आणि घराला उभे सारवण! असो. तर कुत्र्याची शी आरोग्य पूरक नाहीच. तेव्हा श्वान पालकांनी, त्यांच्या शी ची विल्हेवाट नीट लावावी. कुत्र्याच्या रतीबाची खमंग चर्चा प्रसंगी स्पर्धा दिसून पडत आहे, तसे ‘शी’ त्याबाबतीत सतर्क राहिले तर, लोकांना कोणाच्या तोंडात शी कोंबायची गरज वाटणार नाही.
अकोला, येथील जठारपेठेसारखा सुसंस्कृत आणि संभ्रात परिसराला असली घाण निश्चितच भूषणावह नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे स्थानिक नागरिकांचे नैतिक कर्तव्य आहे. आंदोलनाची भाषा ऐकून आपण प्रवृत्त होतो, उपषणासही बसतो. चांगली गोष्ट आहे. आपले हक्क, मागण्या मागत असताना विधायक मार्गाने त्या मागितल्याच पाहिजे. भावना किती प्रखर असल्या तरी कुत्र्याच्या ‘शी’ सारखे अपशब्द वापरण्यात अर्थ नाही. किंबहुना, संभ्रांतपणाचे ते लक्षण नाही. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, पर्यावरणाचे संतुलन बिघडणार नाही एवढी रास्त अपेक्षा आपण श्वान पाळणाऱ्या बांधवांकडून करू शकतो. आणि ही सामान्य अपेक्षा अवाजवी नाही असे भाबड्या मनाला वाटते!
“आमचा चिंकी, फार शिस्तीत आहे. अकारण कोणाच्या अंगावर भुंकत नाही. निगाच तशी राखली जाते. कुत्रा, वागविणे सोप्पे नाहीच!” हो, राज्या- बंद कर तुझी बिनकामी वटवट. एवढा दर्जेदार आहार खायला देतो. प्रसंगी स्वतः ची परवड करून घेतो. असा मोठेपणा सांगत असताना घरातच एखादा संडास का बांधत नाहीस, त्या तुझ्या प्रिय डॉगीसाठी, तुझ्या त्या जीवलग ‘चिंकू’ साठी? प्रशस्त बंगला आहे, भरपूर जागा आहे. बँक बलेन्सला तोटा नाही. मग हे बरं दिसते का? झोपेतून उठला की बरमुडा घालून रस्त्यावर फिरतो, त्या ‘चिंकू’ सोबत. कुठेही शी करतो तो. आणि तू त्याच्या शिस्तीचे पवाडे घसा सुकेपर्यंत गातो. बरं नाही वाटतं हे. तू म्हणतो ते पटते मला, ‘लोकांच्या तोंडावर हात ठेवता येत नाही!’ हो, खरेच आहे हे. तसे नसते तर लोक तुझ्याबद्दल असे काही बोललेच नसते. “याला माणसे टाळतात म्हणून हा, कुत्रा घेऊन फिरतो!” आणि हे सगळे टाळायचे असेल तर, जाताजाता एक नामी उपाय सांगतो. आपल्या आवडत्या कुत्र्याची ‘शी’ काढायचा कंटाळा येत असेल तर सिव्हिल लाईन मध्ये ‘आधार, फॉर ॲनिमल’ नावाची एक संस्था आहे. विदुषी, काजल राऊत या भगिनी च्या संस्थेस भेट द्या. मुके व विशेषतः आजारी व जख्मी प्राण्यांची निगा कशी राखल्या जाते ते जाऊन पहा. मग, त्या तुलनेत आपली समस्या गंभीर नाही, हे लक्षात येते. सुखी समाधानी जगण्याचे संदर्भ तपासून पाहिले की, आश्वासक दिलासा खात्रीने मिळाल्याखेरीज राहत नाही.
‘नेणे सुणे चोर पाहुणा मागता ।
देखून भलता भुंकतसे ।।
शिकविलें कांही न चलती तया ।
बोलियले वांयां बोल जाती ।।
— संत तुकाराम
( श्री. रविंद्र फाटे सरांचे, एका पोस्टमुळे हा लेख साकारता आला. अर्थात, या लेखाचे श्रेय त्यांचे!)
——————————
-सुरेश नागले
नवी-मुंबई