साहित्याचा खरा आनंद सन्मानपत्रात की आशयात.!
साहित्य ही बाब प्रत्येक वेळी सहज निर्माण होत नाही. त्यासाठी आपल्या मनातील भावना, वैचारिक पातळी, योगायोग या गोष्टींना फार महत्त्व आहे. आपण एखाद्या गोष्टीला जसे जाणून बुजून घडवून आणू शकत नाही. तसेच, चांगल्या साहित्याची निर्मिती केवळ खेचून ताणून निर्माण होऊ शकत नाही.
एखादी कविता आपण लिहित असताना त्या कवितेमध्ये आशय गर्भता, हळुवारपणा, सहजता, चंचलता येण्यासाठी अनुभव, शब्दरचना, शब्दसंपदा, अलंकार यांची सुयोग्य निवड कवितेला मोकळे रान मिळवून देते. पण तरीही हा विचार अचानकपणे समोर आल्यावर तीच रचना अगदी साध्या भाषेत गोड वाटू लागते. साहित्य लिहिण्याची एक नैसर्गिक उर्मी असते. तुम्ही कुणाला घाबरवून, भीती दाखवून साहित्य निर्मिती करू शकत नाही. तसे साहित्य निर्माण होईल पण, ते साहित्य मनाला स्पर्श करणार नाही. त्या साहित्यामध्ये जिवंतपणा नसेल. जसे आपण म्हणतो मूर्ती घडवली पण, त्या मूर्तीत आत्मा नाही. याचा अर्थ त्या मूर्तीत एक जैविक चैतन्य हवे ते मात्र दिसून येणार नाही.
साहित्याच्या उर्मिला प्रेरणेची गरज असते. कवीला त्याच्या कवितेला दिलेली दाद, गझलकाराला त्याच्या गझलेला दिलेली दाद, लेखकाला त्याच्या लेखणीला दिलेली दाद त्याच्या जीवनात प्रेरणा म्हणून काम करू लागते. ही प्रेरणा त्याच्या उर्मिला सतत काहीतरी नवीन करण्यासाठी, नवीन लिहिण्यासाठी प्रवृत्त करते. ही उर्मीच मग लेखणीतून उतरत असते. साहित्य लिहिल्यानंतर त्या साहित्यात आपण आपला जीव ओतल्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आपल्या साहित्याला सुजाण वाचक वर्गाने पसंती दिली पाहिजे.
सन्मानपत्र ही जरी लहान बाब वाटत असली तरी तुमच्या साहित्यिक कार्याची एक मोठी पोचपावती आहे. प्रत्येक वेळी आपण आपल्या साहित्यकृतीसाठी पुरस्कार, सन्मान चिन्ह याची अपेक्षा धरली तर साहित्य पुढे जाणार नाही. या साहित्याला जो मान आहे तो केवळ पुरस्कारासाठी किंवा पैशासाठी नाही तर खरा साहित्याचा मान स्वानंदात आहे. शाळेतील पहिल्या इयत्तेतील पाऊल जरी आपल्या जीवनाची दिशा ठरवणारे नसले तरी ते पाऊलच जर झालं नसतं तर तुम्ही पुढे पदवी घेतली नसती. पहिल्या इयत्तेचा पाया तुमची शैक्षणिक इमारत पक्की बांधण्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच हे सन्मानपत्र भले एक कागदाचा तुकडा आहे पण, त्याचे मोल अनमोल आहे. सगळ्याच गोष्टी जर पैशात मोजता आल्या असत्या तर आज कोणीच लेखन केले नसते.
साहित्याची कायमस्वरूपी ओळख देण्यासाठी पुस्तके लिहिली जातात. कवितासंग्रह, कथासंग्रह, ग्रंथ लिहिले जातात. लेखकाला आपली पदरमोड करावी लागते. तरीसुद्धा लेखक केवळ आपल्या लेखणीचा मान महत्त्वाचा मानत असतो. पुरस्कार, सन्मानपत्र ही बाब त्याच्या दृष्टीकोणातून गौण आहे. त्याने लिहिलेले साहित्य समाजासाठी, राज्यासाठी, देशासाठी किती महत्त्वाचे आहे याचा विचार साहित्यात केला गेला असेल तर ते साहित्य जगभर पसरते.
खूप फाफड पसारा करून लिहिलं पण त्या लेखणीतून जर फक्त शब्दाला शब्द जोडून काम सुरू असेल तर मात्र ती लेखणी हवे तेवढे यश देऊ शकत नाही. साहित्यातून जर जनजागृती घडून आली, समाजप्रबोधन घडून आले तर मात्र त्या लेखणीचा मान वाढतो. काही वाचक असे आहेत की ते लिहित नाहीत. पण, एखाद्या साहित्यकृतीचा योग्य दर्जा ओळखून योग्य ठिकाणी त्या लेखकाचा गौरव करतात. त्या लेखकाची प्रशंसा करतात. त्या लेखकाचे नाव पुढे येण्यासाठी प्रयत्न करतात. या वाचकांमध्ये सुद्धा एक अप्रत्यक्ष लेखक लपलेला आहे. तो लिहित नसला तरी त्याचे परीक्षणाचे काम सुरू आहे.
सन्मानपत्र साहित्याला परीक्षकाच्या रूपात एक चांगला वाचक वर्ग मिळवून देत असतो. परीक्षकांनी परीक्षण केल्याने लेखनातील त्रुटी व नावीन्यपूर्णता याला योग्य न्याय दिला जातो. प्रथम क्रमांकाचे सन्मानपत्र मिळणे हा देखील गौरवच आहे. आज विविध साहित्य निर्माण होत आहे. त्यातून एखाद्या साहित्यिकाला प्रथम येण्याचा मान मिळतो. प्राप्त सन्मानपत्र पुढे त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणादायी शस्त्र म्हणून सहाय्यक ठरत असते. त्यातून आशय गर्भ साहित्याची निर्मिती होते. त्यामुळे नक्कीच आपल्याला असे म्हणता येईल सन्मानपत्र ही महत्त्वाचे आहे आणि साहित्याला असलेली आशय गर्भताही तितकीच महत्त्वाची आहे.
डॉ. सौ. शुभांगी गणेश गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा – ठाणे
sggadegaonkar@gmail.com