संस्काराचे व्यासपीठ – आठवणीतील आजी
आजकाल विस्कळीत होत चाललेल्या एकत्र कुटुंबातील नात्यांचा गारवा हळूहळू कमी होत चालला आहे. नाती स्वकेंद्रित होत चालली आहेत. कुटुंब म्हणजे आई,वडील व मुले एवढीच संकल्पना आकार घेऊ लागली आहे.जागतिकीकरण व यांत्रिकीकरण याचे परिणाम नात्यांच्या बाबतीत संकुचित होत चालले आहेत. बदललेल्या जीवनाचा परिणाम सकारात्मक त्याप्रमाणे नकारात्मक परिणाम देखील होत आहेत.
एकोणीसाव्या शतकातील जीवनमान, संस्कृती व नातेसंबंध हे विसाव्या शतकापेक्षा जास्त समृध्द होती.आजकाल प्रसंगानुरूप नात्यांचा गोडवा खुजा होत चालला आहे. अशा सामाजिक परिस्थितीत लेखक चंद्रकांत भोसले यांची ‘ आठवणीतील आजी’ ही बाल कादंबरी म्हणजे वाळवंटातील ओॲसिसच म्हणावे लागेल. आजी आणि नातू यांच्यातील सहज सुंदर भावविश्व या संग्रहात साकारलेले आहे. आजी आणि नातू हे संबंध म्हणजे दुधावरच्या सायीसारखे गोड असतात. नातवात जीव असलेली आजी नातवातच आपले विश्व शोधत असते.
कादंबरीतील काळ हा जवळपास पन्नास वर्षांपूर्वीचा असेल. त्या काळात आजच्यासारखे आधुनिकीकरणाचे वारे म्हणावे तसे नव्हते. खेड्यापाड्यात,शेतवस्तीत तर प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या म्हणजे सुख, समृद्धी, समाधान असा ढोबळ सामाजिक समज. अशा वातावरणात शेतवस्तीवर बालपण व्यतीत झालेल्या भावशाची ही कथा. भावशाचं तो आणि त्याची आजी जायआय हेच त्याच विश्व. सोबतीला दावणीला बांधलेल्या शेळ्या, कुत्रा चिम्या व दोनचार मित्र. आजी म्हणजे भावशाचं सर्वस्वच.
ही कादंबरी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. लेखकाचे प्रासंगिक वर्णन अफाट आहे. वाचतांना आपणही अलगदपणे त्या शेतीमातीशी एकरूप होऊन जातो.कादंबरीत शेतवस्तीचे वर्णन असल्यामुळे अनेक ग्रामीण शब्दांचा उल्लेख आहे. एवढेच काय तर भावशाच्या मित्रांची नावे पण तशीच आहेत.आंब्या,मध्या,राम्या,सायब्या अशी. त्यांच्या मैत्रीतील स्नेह,गोडवा,आपलेपणा आजकाल दुर्लभच. यातील काही शब्द प्रकार नगरी ग्रामीण भागाची जाणीव करून देतात .रानटी डान्स, शिवनापाणी खेळ, सुरपारंब्या, बोरीच्या झाडावरील भुत, नलग्याचं शेत, वाईट वक्टया शिव्या, बकानाच झाड, शेरण्यांचे वेल, गारगार ऊस, बोर हुलवणे असे शब्दप्रयोग वातावरण निर्मितीसाठी छान वाटतात. काही वापरलेली विशेषणे सुध्दा लक्ष वेधून घेतात. जसे भदाडे शब्द, टिंगाले टिंगाले मोड, ढवळेफॅक दात, वेडपट फांद्या. यामध्ये वेडपट या विशेषणचा खूपच वापर केलेला आहे. वेडपट पाय, वेडपट फांद्या, वेडपट डोळे, वेडपट शेळ्या,वे डपट रघ्या,वे डपटासारखं रान अशा प्रकारे अनेक वेळेला हे विशेषण वापरलेले आहे. या कादंबरीतील सदाचारी जीवन आपल्याला निरागस जगण्याची प्रेरणा देते. सृष्टीशी एकरूप व एकनिष्ठ होऊन जगण्याचा संदेश देते. जायआय मधील दोष, दुर्गुण असोत किंवा दुःख,संकटे निर्मुलन करणारी आंतरिक शक्ती आपली पण आंतरिक शक्ती जागृत व कृतिशील करते. या कादंबरीतील प्रेमाचा ओलावा, निस्वार्थी मित्र प्रेम व सामाजिक सलोखा समजून घेण्यासाठी अंतर्मुख होऊन देह मंदिराच्या आत गाभा-यात जावे लागते. विशेष म्हणजे या कादंबरीमध्ये भावशाच्या आई वडिलांचा कुठेही उल्लेख नाही. एखाद ठिकाणी त्याच्या वडिलांचा उल्लेख आढळतो. पण भावशा व वडील यांचे संभाषण मात्र आढळत नाही. असे वाटते भावशाचे संपूर्ण बालपण आजीच्याच सान्निध्यात झाले.
लेखकाची आजी म्हणजेच जायआय तशी तोंडाची फटकळच.सतत शिव्या देणारी पण तेवढीच मायाळू सुद्धा. जीवाला जीव देणारी. अडलेल्या बायांची सुटका करणे यासाठी खास ओळखली जाणारी. म्हणूनच गावात तिचा आदर. जायआय दिसायला काळी ठीक्कर जशी डांबरात उडी मारून आलेली, काळ्या ढेकळासारखी दिसायची. म्हातारी असली तरी अजूनही कमरेत वाकलेली नव्हती. तिचे डोळे उन्हाने चमकणा-या पाण्यासारखे होते. उन्हातानात अनवाणी चालणारे पाय कधीच पोळत नसत. चप्पल असली तरी फार कमी वापरायची. शेतातल्या कामानं ती रापलेली होती. किडकिडीत असली तरी तिच्यात भलतीच ताकद होती. कमरेवर हात ठेवून बोलायला लागली की गावातील सगळेच थरथर कापायचे. तरीही सगळा गाव तिचा आदर करायचा.पोरांना मात्र ती जिवापाड जीव लावायची. भावशासोबत सर्वच मित्रांना खिसे भरून खारीक खोबरे खाऊ म्हणून देणारी आजी, पोरांसाठी टोपलभर बाजरीच्या भाकरी थापणारी आजी,पोरांना पपई व इतर फळांचा खाऊ देणारी आजी, आपला नातू व परके असा कधीच भेदभाव न करणारी आजी दिलदारच. आजी सर्वांची आई व्हायला पहायची.
मुले पोहायला गेली की आजी अगदी हजर. मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी काठावर उन्हात गरम खडकावर बसून रहायची. मुलांना सुरपारंब्या खेळण्यासाठी राऊतवाडीच्या वडाच्या झाडाकडे स्वतः घेऊन जायची. मुलांकडे जातीने लक्ष द्यायची. एकदा मुले गाग-याच्या बोरीची ब़ोरे खाण्यासाठी गेली. तिथे भूत आहे असे लोकं म्हणत.पण मुलेच ती. बोर हुलवत बोरे खाऊ लागली व खिसे भरू लागली…. तेवढ्यात एक उंच दाढी-मिशावाली बाई त्यांच्याकडे येतांना दिसली. तशी मुले घाबरली. पळू लागली. पण आजी मात्र वेळूची काठी घेऊन त्या बाईला मारायला आली. घराच्या मेडीइतक्या उंच भदाड्या त्या बाईसमोर आजी अगदी पिल्लू दिसत होती.पण चिम्या आणि आजीने तिला लोळवल व पिटाळून लावले.नंतर कळाले गावात पोरं पकडणारी टोळी आली आहे ते. असाच अजून एक प्रसंग लेखक वर्णन करतो. साधुबाबाचे घरी येणे, जेवायला मागणे मग शेवटी दादागिरी करून मुलाला पळवून न्यायचा प्रयत्न करणे. पण आजी मोठ्या धिराची. ती साधुबाबाला पण पिटाळून लावते. ती स्वतः निस्वार्थी होती. एकदा तिला सापडलेली सोन्याची अंगठी तिला अस्वस्थ करते.ती अंगठी ज्याची हरवली त्यालाच शिव्या देत सुटते.
रोजच्याच उदाहरणांमधून आजी सद्सद्विवेक बुध्दीने सुसंगत जीवनाचा विकासात्मक अर्थ समजून सांगत होती.त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मकता फुलवत होती.जीवन सर्वांग सुंदर करण्यासाठी,आनंद लुटण्यासाठी,जीवनाची गुणवत्ता, श्रीमंती, समृद्धी वाढवण्यासाठी त्यांच्या मन, बुध्दी, मेंदू वरती सद्विचार ,आचार,सद्भाव यांची पेरणी करत होती.ती मुलांना निसर्गाशी दोस्ती करायला शिकवत होती.प्राण्यांवर प्रेम करायला शिकवत होती.आपल्या नव-याच्या देशभक्तीच्या व प्रामाणिकपणाच्या गोष्टी हजारदा सांगुन त्यांच्यामध्ये देशप्रेम रूजऊ पहात होती.
मुलांनापण आजीचा लळा लागला होता म्हणूनच तर आजीचे प्राणपाखरु देहमंदिराला सोडून उडून गेले तरी आजी आपल्याजवळच आहे, ती आपले रक्षण करतेय ही भावना मुलांमध्ये होती. स्मशानात आजीच्या मातीजवळ बसून मुले ढसाढसा रडली. तिथल्या वेड्या बाभळी तोडून जागा निर्मळ केली. बालमनाने तेथेच मुगाच्या शेंगा ठेवून खाऊ घातल्या. तिथेच अवतीभवती खेळू लागले.आजकाल हा जिव्हाळा, नात्यातील ओलावा हातातून निसटून गेल्यासारखा जाणवतो. आजीआजोबा नावाचे संस्कारांचे ज्ञानपीठ आपणच आपल्या मुलांपासून जाणूनबुजून दूर ठेवतोय.त्याचे दुष्परिणाम समाज व्यवस्थेवर व कुटुंब व्यवस्थेवरही होतांना दिसताहेत. ज्या घरांमध्ये ही ज्ञानपीठे कार्यान्वित आहेत; त्या घरांमध्ये संस्कृती, संस्कार व सुसंस्कृतता अबाधित आहे. प्रत्येक मुलाने वाचावी आणि पालकांनी आपल्या मुलांना वाचून दाखवावी अशी ही कादंबरी आहे. लेखक चंद्रकांत भोसले यांचे हे वेगळ्या वाटेने जाणारे लिखाण असेच बहरत राहिल या सदिच्छा.!
पुस्तक : आठवणीतील आजी
लेखक : चंद्रकांत भोसले
प्रकाशन : ब्लू रोज पब्लिकेशन, नवी दिल्ली
किंमत : २००
मागणीसाठी संपर्क : पुढील लिंकवरून आपल्याला पुस्तक मिळेल.
Please find the links attached below:
https://blueroseone.com/store/product/aathvanitali-aaji
https://www.flipkart.com/aathvanita…/p/itm384e5f816b2c3…
🔴 – माधुरी चौधरी वाघुळदे
संभाजीनगर
९४२१८६०८७