उत्कट संवेदनांचा नितांत सुंदर अविष्कार : पडसावल्या
नांदगाव सारख्या काहीशा दूरस्थ गावात राहून कवितेचं बोट गच्च धरून ज्यांची कविता सुंदर पद्धतीने विस्तारते आहे, त्या कवयित्री प्रतिभा सुरेश खैरनार यांचा पडसावल्या हा दुसरा काव्यसंग्रह नुकताच मी वाचला.तू मृगजळ जणू हा पहिला काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहे. बाभूळ फुलं या कथासंग्रहानेही त्यांचं साहित्यातील नाव ठळकपणे परिचित झालेलं आहे. असं म्हणता येईल.
आपल्या दोन हातांचे अंगठे एकमेकात अडकवून बाकी दोन्ही हातांची चारी बोटं फैलावत त्यातून तयार झालेला सृजनपक्षी ! आणि त्या अनुषंगाने कळत नकळत पडणारी आपल्या विचारांची पडसावली हे या संग्रहाचं वेगळं असं मुखपृष्ठ शिव डोईजोडे यांचं आहे.चित्रकाव्य रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात हे मुखपृष्ठ यशस्वी होताना दिसतं. पुण्याच्या ज्ञानसूर्य प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केलेला आहे.
सुप्रसिद्ध कवी, समीक्षक पी विठ्ठल यांची आश्वासक पाठराखण या संग्रहाला लाभली आहे .नातेसंबंधांच्या अदृश्य तळाचा शोध घेण्याची आस्थापूर्ण दृष्टी या कवितेत सामावलेली आहे ! असं महत्वपूर्ण मत कवी पी विठ्ठल यांनी यात नोंदवून ठेवलेलं आहे .मानवी अस्तित्व आणि मानसिक अनुभवांना ही कविता स्वतःशी जोडून घेते. हे त्यांचं निरीक्षण या कवितेकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देते.
कवयित्री प्रतिभा सुरेश खैरनार यांचे अनुभव हे दररोजच्या जगण्यातील खरेखरे अनुभव आहेत .ते वेगवेगळ्या पातळीवरचे आणि मनोज्ञ आहेत .कमालीचे हळवे किंवा भावनिक आहेत.
‘बाप’ या कवितेत त्या लिहितात
बाप बाप म्हणोनिया
काय बापावर लिहू
बाप अथांग सागर
कसे ओंजळीत घेऊ
पडसावल्या संग्रहात ‘वयाची दुपार’ नावाची एक कविता आहे. ही कविता म्हणजे स्वतः कवयित्रीचं एक आत्मचिंतन असू शकेल. परंतु मध्यम वयामध्ये येणारी प्रगल्भता, ती उलघाल, ती भावावस्था कवयित्रीने फार अचूकतेने या कवितेतून मांडलेली आहे. या कवितेचा शेवट वाचकाला अस्वस्थ करणारा आहे.
सायंकाळची चाहूल
जरी मनाला दिलासा
उतरत्या दिवसाचा
तिला नाही भरवसा
स्त्रियांचं जगणं, त्यांची एकूणच काळजी, त्यांचा अंगभूत समजूतदारपणा आणि वास्तव ! या सीमेवर ही कविता मनात छान रेंगाळत राहते. स्रियांचे अंतर्मन वाचायचे असेल तर पडसावल्या मधील या कवितेबरोबरच अजूनही, मेकओव्हर, लिपी, प्रियकर,पोर, सोन्याचं अंबर,उखळाची खोली यासारख्या कवितांमधून स्त्रीमनाचे अनेक कंगोरे त्या नेमकेपणाने उलगडवतात. कवयित्री एक गृहिणी आहेत. त्या स्वतः एक ब्युटी पार्लर चालवतात. त्यामुळे स्त्रीसौंदर्याचं मर्म आणि दर्शन यासंबंधी त्यांचं म्हणून एक चिंतन आहे. जगण्यातली अपरिहार्यता आणि भौतिक जगात वावरताना स्वतःला अपडेट ठेवताना तिची होणारी धावपळ, तिची स्वाभाविकता हा स्त्रीचा एक आत्मशोधच म्हणता येईल. अशा अर्थाने या कविता येतात. जगण्याला सामोरे जाताना तिची अस्तित्वाची लढाईसुद्धा ती लढते आहे. हे या कवितांतून जाणवते.
पडसावल्या संग्रहात नाविन्य आणि वेगळेपण ते असे आहे,की या कवितेत निसर्ग, आपली माणसं,आपला गाव, भक्ती आणि सामाजिकता येते, ती कवयित्रीच्या अनुभवातून, सूक्ष्म निरीक्षण आणि संवेदनशीलतेतून. या स्त्री जाणिवांच्या उत्कट संवेदनांचा एक नितांत सुंदर विष्कारच आहेत! या कवितेला एकाच वेळी वेगवेगळ्या अंगाने आणि अर्थाने समाज समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, असे जाणवते.
‘चंदनाचं झाड’ या शिर्षकाची एक कविता या संग्रहात आहे. या संग्रहातील ती एक सर्वोत्तम म्हणावी अशी कविता आहे. असं मला वाटतं.बाईचं जगणं किती अलवार किंवा काळजीचं झालं आहे.हे सांगणारी ही कविता वाचकाला अंतर्मुख करते.
या कवितेबरोबरच पोर, अंधारातील चांदण्या, बाई, किंकाळ्या, वेदना… अशा कितीतरी कविता ह्या स्त्रीजाणिवांच्या कविता आहेत. कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या या कविता वाचताना बाईच्या कविता या काव्यसंग्रहामुळे, काव्यजगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले जेष्ठ कवी किरण येले यांची विशेषत्वाने याद आल्याशिवाय राहत नाही.
पडसावल्या या काव्यसंग्रहामध्ये हृदयस्थ नाती आहेत. निसर्ग आहे. सामाजिकता आहे. भावगर्भता आहे .तशीच चिंतनशीलता आहे .अतिशय संवेदनशीलतेने घेतलेला स्व आणि स्वत्वाचा शोध आहे.
जेथे सापडेल खरी
मीच स्वतःची स्वतःला
जरा देईल दिलासा
मी ही माझ्याच मनाला
एकांताचे रान, अलंकार, येल, दोन काठ, कुंपण सारख्या या संग्रहातील कविता स्त्रीमनाच्या आत्ममग्नपर कविता म्हणता येतील.या कवितेमध्ये खरंखुरं प्रेम आहे.त्यातली सुंदरता आणि सघनता आहे. जुना आठव आहे. विरह आणि हुरहूर आहे. मनस्वप्नांची व्याकुळता आहे. महत्वाचं म्हणजे परिस्थितीशी भान ठेवून येणारी सजगता आहे. स्त्रीमनाचा आलेख हळुवारपणे नि बारकाईने चितरणाऱ्या या कविता उत्तम झाल्या आहेत.
एकंदरीतच बाईचं जगणं,आठवणं,कुढणं ,स्वत:च स्वतःच्या मनाची समजूत घालणं …माणूस म्हणून स्वतःला अधिक उंचावत नेणाऱ्या या कविता संग्रहाला उंची देतात.
या कवितेचा कॅनव्हास मोठा आहे. तीत जन्मापासून मृत्यूपर्यंतचं सखोल चिंतन आहे. जगण्याची, स्वप्नांची, विचारांची, आत्मचिंतनाची अनेक महत्त्वाची चित्र यात येतात. ती सत्य आणि वास्तवातली आहेत. या सर्वांचं एक प्रतिबिंब मनात कळत, नकळत पडतच असतं. या सावल्यांची अनेक प्रतिबींब ठळकपणे या संग्रहात उतरली आहेत. ती काल्पनिक किंवा स्वातसुखायतेने आलेली नाहीत. ती बेगडी आणि बटबटीत तर मुळीच नाहीत. ती सात्विक, खरीखुरी आणि प्रामाणिक अनुभवांची आहेत. हृद्य आणि हळवी आहेत. या कविता मनात छान रेंगाळत राहतात. अपेक्षित परिणाम साधतात.स्रियांचं जगणं मुळातून समजून घ्यायला पडसावल्या मधील कविता उपयोगी ठरू शकतील.
या कवितांचं नेमकं मर्म काय किंवा त्यांची जातकुळी अशी कोणती ? असं जर विचारलं तर, संदर्भ संपुर्ण वेगळा असूनही,त्यासाठी कवयित्रीच्या माझा गाव या कवितेचा आधार येथे घेता येईल.
शेण सडा सारवण
शुभ्र रांगोळीची नक्षी
अंगणात पानवठा
येता तहानले पक्षी
ज्याच्या त्याच्या तहानेपुरतं आपण या कवितांच्या शुभ्र विहिरीमध्ये उतरावं ! अशी ही एक विचारशील कविता आहे. या नितळ-निर्मळ कवितेचं मी स्वागत करतो.
पुस्तक : पडसावल्या
कवयित्री : प्रतिभा सुरेश खैरनार
समीक्षण
– विवेक उगलमुगले
नाशिक