‘उगवत्या सूर्याचा प्रकाश म्हणजे – बॉर्डरलेस पँथर्स’
परदेशात मुलं गेल्यावर आपल्या जन्मदात्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराला यायलाही नकार देणारी मुलं आपण बघतो आहोत, पैसे पाठवून देतो अंत्यसंस्कार उरकून घ्या, असे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनाच त्यांच्याकडून सांगितले जाते, पण काही परदेशात गेलेली मुलं याला अपवाद देखील आहे, कवी देवा झिंजाड सर म्हणतात तसं गाईच्या शेणाचा पोह पडल्यावर त्याला माती चिटकतेच, जेव्हा शेण उचलतो तेव्हा ते शेण मातीसह उचलले जाते अगदी तसेच परदेशात जरी गेले तरी पण आपल्याला चिकटलेली आपली माणसं , आपली भाषा तशीच उचलत आहेत ते म्हणजे ऑस्ट्रेलिया येथील नोकरीसाठी गेलेले मुळगाव पिंपळगाव जोगा, जुन्नर असलेले दीपक सुकाळे सर.
परदेशात जरी राहत असले तरी आपल्या मातीशी घट्ट नाळ जोडली आहे त्याच नाळेतून ओतूर येथे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बॉर्डरलेस पँथर्स नावाचा समूह बनवला त्यात महाराष्ट्रातील नामवंत, गुणवंत, सामाजिक कार्य करणारे, साहित्यिक, समाजसेवक, वृक्षसेवक, आरोग्य सेवक यांना जोडले त्या समूहाचा दरवर्षी स्नेह मेळावा देखील होत आहे.
एक सप्टेंबर २०२४ रोजी नंदलाल लॉन्स, ओतूर येथे समूहाच्या सभासद सुशीला ताई डुंबरे यांच्या सेवानिवृत्तीच्या व वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी चौथ्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते, सकाळच्या सत्रात सेवानिवृत्ती कार्यक्रम व दुपारच्या सत्रात स्नेहमेळावा, त्या कार्यक्रमासाठी बॉर्डरलेस पँथर्सचा सभासद म्हणून मलाही आमंत्रण होते, एक वर्षांपूर्वी मला दीपक सरांनी फेसबुक वरून नंबर घेऊन संवाद साधून समाविष्ट केले होते, एक वर्षापासून फोनवर बोलणे सुरू होते पण प्रत्यक्ष कोणालाही बघितलेले नव्हते सर्व काही अभासी होते.
कार्यक्रमासाठी सिन्नरहून ओतूरला निघालो, कार्यक्रमाची वेळ सकाळी दहाची होती पण कोणत्याही कार्यक्रमाला वेळेवर किंवा वेळेआधी पोहोचायचं हा माझा नियम असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी नऊ वाजून 30 मिनिटांनी मी पोहचलो, पण तिथे तर कोणीही नव्हते मी एकटा होतो पण माझे निसर्गातील मित्र मला खूप दिसत होते, डोलत होते, गार हवा देत होते, अगदी निसर्गरम्य असा लॉन्स होता, सगळीकडे झाडेच झाडे होते तेच माझे निसर्ग मित्र , त्याच निसर्गमित्रांमुळे लॉन्स निसर्गरम्य होता, सगळीकडे झाडेच झाडे त्यातच मी रमलो आणि ओढ होती ती ज्या व्यक्तीने आपल्याला समूहात जोडले, आज त्यांच्यामुळे 626 लोकांना जोडलो गेलो त्यांना भेटण्याची.
काही क्षणातच त्यांची म्हणजे दीपक भाऊंची गाडी आली गाडीतून ते उतरले बघतो तर डोक्यावर एकही केस नाही, लाल रंगाचा भरदार सदरा, एक भारदस्त व्यक्तिमत्व गाडीतून उतरताच त्यांना मिठी मारली, मिठी ही खऱ्या खुरया प्रेमाचे प्रतीक असते, दीपक सुकाळे सरांची बॉर्डरलेस चा पहिल्या मित्राची पहिली भेट झाली. या भेटीचा आनंद शब्दात उतरवणं तसं अवघडच ! जी ओढ लागली होती त्यामुळे पहाटे चारला जाग आली होती ती भेट झाली, प्रत्यक्ष भेटीचा आनंद काही वेगळाच असतो.. त्यांच्याबरोबर वहिनीही होत्या त्याही भेटल्या त्यातून एक जाणवलं की अशा देव माणसांना अर्धांगिनी कडून खूप मोठी मोलाची साथ असते म्हणून ते समाजासाठी काम करू शकतात.
जसं माणसाने आयुष्यभर काय कमावले, ते केव्हा कळते, तर ते त्या माणसाच्या अंत्यविधीला आलेल्या समाजाच्या उपस्थितीवरून, तसं नोकरी करताना काय मिळवलं ते समजते ते सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात, त्यातल्या त्यात जर शिक्षक असेल तर त्या शिक्षकाने काय शिकवण दिली ती समजते, असेच याही कार्यक्रमात सुशिलाताई डुंबरे सेवानिवृत्त होताना त्यांनी कमावलेल्या माणसांनी हॉल पूर्ण पणे भरला होता, शिक्षिका ते विस्तार अधिकारी ह्या प्रवासात केलेल्या सेवेची ती पावतीच होती, सामाजिक कामातून त्यांनी खडकवाडी चे रूपांतर आनंदवाडीत केले. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी होते ते म्हणजे लोकप्रिय कादंबरीचे लेखक, जीवनाचे सत्य उलगडणार्या कादंबरीचे म्हणजे एक भाकर तीन चुलीचे कवी देवा झिंजाड सर, त्यांनी आईची कविता सादर करून सर्वच पुरुष व महिलांच्या डोळ्यात अक्षरशा पाणी आणले.
कार्यक्रमात अजून एक कार्यक्रम पार पडला तो म्हणजे डिसेंट फाउंडेशनने आयोजित केलेल्या कर्करोग या आजाराविषयी माहिती व त्याची तपासणी शिबिर, जितेंद्र बिडवे सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून या सामाजिक उपक्रमाचे काम पाहिले. असा कार्यक्रम सामाजिक कार्यक्रमाच्या ठिकाणी घेणे नक्कीच कौतुकास्पद आहे.
आज दुसरी एक आनंदाची वार्ता होती ती म्हणजे ज्यांच्या सुलेखनाने व सुमधुर अशा आवाजाने ज्यांची ओळख उभ्या महाराष्ट्रात झाली ते म्हणजे उमेशाक्षर उमेश शिंदे सर, यांची आज पहिलीच भेट होणार होती, “भावनांना शब्दांची कधीच कदर नसते” हे माझ्या लेखणीचे पहिले वाक्य त्यांनी सुलेखन केले होते आणि माझ्या जवळपास दहा कथांचे त्यांनी अभिवाचन केले आहे , त्यांची आज भेट झाली आणि एकाच शब्दात सांगायचं झालं तर या भेटीने मी भरून पावलो. या सरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जी कथा, सुविचार, लेख आवडतात तेच ते लेखन अभिवाचन करतात मग त्यासाठी कुठल्याही ओळखीची त्यांना गरज नाही अन महत्त्वाचे म्हणजे ते छंद म्हणून करत आहेत त्याचे कुठलेच मानधन ते घेत नाही. खऱ्या लेखणीला न्याय देण्याचे काम ते करत आहे.
माणुसकी रुजविणारे आणि माणुसकी जपणारे माणसं म्हणजे बॉर्डरलेस पँथर्स हे ब्रीदवाक्य आज पर्यंत ऐकत होतो पण आज ते प्रत्यक्षात अनुभवले आजच्या कार्यक्रमात वृद्धाश्रमासाठी मदत म्हणून आज समूहाच्या वतीने २ लाख ५० हजार रुपयाचा चेक प्रदान करण्यात आला ते पाहूनच नसानसात माणुसकी भरलेले आहे हे दिसले, तसेच पारनेर येथे देवा झिंजाड सरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या शाळेसाठी देखील त्यातील एका पॅंथरने 11 हजार रुपये देणगी दिली यातूनच समाजाविषयी असलेली भावना दिसून आली .
तिथे आलेले सर्वच पँथर्स एका जिव्हाळ्याने आपुलकीने बोलत होती, नवनाथ नलावडे सर, सतीश आप्पा, नाना शिंदे सर, प्रवीण डुंबरे सर, देवा तांबे सर, अजित मोरे सर, शरद डुंबरे सर, निलेश डुंबरे सर, सोमा चौधरी सर, पुंडे सर, JDU (जालिंदर उकिरडे ) सर, दत्तूची भेळ वाले खेत्री सर, सेलिब्रिटी पोपट नलावडे सर, सुरेश भोर सर, अजित मोरे सर, प्रवीण डोंगरे सर, हेमंत पेडणेकर सर, पंकज हांडे सर, सुनीताताई हांडे, मानसीताई कोयंदे ,नेहाताई कुलकर्णी, अश्विनीताई बांगर, प्रगती ताई डुंबरे, मुलाखतकार प्राध्यापिका दीपिका ताई जंगम, स्वातीताई तांबे, मानसीताई देशपांडे, काव्यरजनी डुंबरे, सुनंदाताई वाळुंज, अजून बरेच जण आहेत पण माझी काहींची नावे विसरले गेले, सर्वजण आपुलकीने विचारपूस करत होती, तुम्हीच का वृक्षमित्र? म्हणून विचारत होती.
या जगात हसविणारी माणसे आहेत आणि रडविणारी माणसे आहेत पण पाच मिनिटांच्या आत भरभरून हसावायचं आणि पाचचं मिनिटात रडवायचं हे ज्यांनी कार्यक्रमात केलं ते म्हणजे झी टॉकीज फेम हास्यसम्राट, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची आज मुलाखत घेतली गेली ते देवा झिंजाड सर यांनी पोटभरून हसवलं आणि काही क्षणात डोळ्यातून पाणी येईपर्यंत रडवलं देखील, अर्धी भाकर या कवितेचे गायन त्यांनी केले त्याआधी अनेक कविता गायल्या पण ही कविता संपूच नये असे वाटत होते त्यांनी जगलेली, अनुभवलेली ही कविता सर्वांच्याच काळजात भिडली.
ऋणानुबंध या समूहातून तयार झाले, खरंच काय हवं असतं या माणसाला? फक्त समाधानी जगणं ! ते तर आपलं रोजचं चालू आहे, पण ते जगणं सुखी होण्यासाठी बॉर्डरलेस पॅंथरची नितांत गरज आहे, सोशल मीडियाचा एक समूह काय असू शकतो? काय करू शकतो ? त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बॉर्डरलेस पँथर्स.
आपलाच माणूस क्षितिजापार जाऊन आपल्या गावाचं, आपलं नाव, मोठं करतोय याचा मात्र अभिमान वाटतो, तेच नाव काव्यसंग्रहाला देऊन आज पॅंथरचे समूह प्रमुख दीपक सुकाळे सर यांचा *क्षितिजापार* व काव्यरजनी यांचा *सांजस्मृती* या काव्यसंग्रहाचे स्थानिक आमदार बेनके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व देवा झिंजाड सरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात प्रकाशन संपन्न झाले. गोड आठवणींनी आजन्म लक्षात राहील असा आजचा संपूर्ण दिवस गेला.
कार्यक्रमाला आल्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत सर्वच पॅंथर काळजी घेत होते, मेसेज करत होते, तिथून निघण्यास पाय काही तयार नव्हते तरी सर्वांना सोडून निघालो, निलेश सरांनी नारायणगावला सोडले, तिथून सिन्नरला रात्री बारा वाजता पोहोचलो घराच्या दारापर्यंत पोहोचलो आणि फोन वाजला, विष्णू दादा तुम्ही पोहोचले का? फोन होता देवा झिंजाड सरांचा, मी म्हटलं हो दादा दारासमोर आलोय आत्ताच, जो माणूस फक्त लेखणीने भावना लिहीत नाही तर स्वतःहा ते जगतो सगळ्यांची काळजी करतो म्हणून ते खऱ्या अर्थाने देव माणूस आहेत.
घरात पोहोचलो, झोपलो, पण मनात मात्र आपण अजूनही स्नेहमेळाव्यातच आहोत की काय, असेच वाटत होते, बॉर्डरलेस पँथर्स चा कार्यक्रम छान झाला म्हणण्यापेक्षा माणसं माणसांना जोडली गेली, हा कार्यक्रम माणसं जोडण्याकरता आहे असंच म्हणता येईल, सर्व पॅंथर ची नावे लक्षात राहिले नाही पण चेहरे मात्र सर्वांचे ओळखीचे झाले काहींची नावे लक्षात राहिले. एक खंत मात्र वाटली आमच्या मातीत आमची माणसं म्हणजे समूहाचे आधारस्तंभ अशोक डुंबरे सरांची भेट झाली नाही त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. बाकी सर्वच कार्यक्रम नेत्रदीपक असाच झाला, एकाच शब्दात सांगायचे झाले तर उगवत्या सूर्याचा प्रकाश म्हणजेच बॉर्डरलेस पँथर्स. या वृक्षमित्राचा, विष्णू वाघ चा सर्वच पँथर्सना सलाम..
वृक्षमित्र विष्णू तानाजी वाघ
अध्यक्ष, वृक्षमित्र फाऊंडेशन व
वृक्षमित्र साहित्य परिषद,सिन्नर.
(दोडी बू ll)
(७०२०३०३७३८)