“अंधार जीवनी पण, झालो निराश नाही, नेत्रामुळे मनाच्या, सत्यास पाहतो मी”- काशिनाथ महाजन
सहज फेसबुक चाळत असतांना चांदवडचे प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार विष्णू थोरे यांच्या फेसबुकवर एका साहित्य कलाकृतीचे मुखपृष्ठ दिसले. नाशिकच्या साहित्य वैभवात भर घालणा-या या मुखपृष्ठाने माझे लक्ष वेधून घेतले. अतिशय गंभीर आणि तितकेच समजण्यास अवघड असलेल्या या मुखपृष्ठाचा विचार केला.. त्यातून अनेक बाबी समोर आल्या. या कलाकृतीचे निर्माते काशिनाथ देवराम महाजन यांच्या स्वभावाशी, त्यांच्या साहित्य कलेशी साधर्म्य पावलेले हे मुखपृष्ठ मला खूपच भावले. लवकरच या कलाकृतीचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे त्यानिमित्ताने या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील संदर्भाचा हा थोडक्यात घेतलेला मागोवा..
कवी काशिनाथ महाजन यांची पान हिरवे या मनाचे या शीर्षकाची गझल काव्यकलाकृती पाहिली आणि त्यावरील संदर्भ मनात साठवत गेलो ..एका उंच डेरेदार झाडाखाली एक दाढी वाढवलेला व्यक्ती डोळे बंद करून बसलेला आहे, खांद्यावर एक चिमणी दिसत आहे, तर डेरेदार झाडाच्या मुळ्या उघड्या पडल्या असून झाड आतून पोकळ झाले आहे कारण वरील साल निघून गेल्याचे दिसत आहे… आजूबाजूला विविध रंगछटा एकमेकांत मिसळून गेल्या आहेत. असे मुखपृष्ठ साकारलेले दिसून येते. प्रकाशक स्वयं प्रकाशन पुणे यांच्याकडून प्रकाशित होत असलेल्या या मुखपृष्ठावरून मुखपृष्ठचित्रकाराने “पान हिरवे या मनाचे” या कलाकृतीच्या निर्मितीकाराच्या स्वभावाचा, त्यांच्या साहित्याचा आणि एकंदरीत त्याच्या जीवनशैलीचा पट उलगडून दाखवला आहे. आपण या मुखपृष्ठावरील संदर्भाचा आढावा घेणार आहोत.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पातोंडे येथील देवराम महाजन हे अतिशय गरीब मिल मजूर कुटुंब, एकूण नऊ सदस्यांचे मोठे कुटुंब, त्यावेळी आत्ताच्या सारख्या सोईसुविधा उपलब्ध नव्हत्या, एकच व्यक्ती कमावता होता आणि इतर सारे खात होते… मोलमजुरीशिवाय इतर व्यवसाय नव्हता. देवराम महाजन यांचा हा काळ म्हणजे भारत स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, त्यानंतर १९५६ मध्ये काशिनाथ महाजन यांचा जन्म झाला. त्याकाळात एकत्रित कुटुंब पद्धती होती, या एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रतिक म्हणजे हे डेरेदार झाड दाखवले असेल असे मला वाटते…
झाडाच्या मुळ्या तेव्हाच उघड्या पडतात जेव्हा त्या झाडाखालचा आधार काढून घेतला जातो. झाडाचा बुंधा मोकळा झाला की झाड आपोआप पानझड होऊ लागते आणि आतून पोकळ होत जाते, त्याचावर असणारी रया निघून जाते आणि झाड गुळगुळीत होते.. असेच काहीसे काशिनाथ महाजन यांच्या बाबतीत झाले असावे. वडिलांच्या अकाली निधनाने जणू काही महाकाय वादळात एखादे झाड उन्मळून पडावे तसे हे कुटुंब उन्मळून पडले याचे प्रतिक म्हणून या झाडाच्या मुळ्या उघड्या पडलेल्या दाखवल्या असाव्यात आणि हीच भावना काशिनाथ महाजन आणि मुखपृष्ठचित्रकार विष्णू थोरे यांनी साकारली असावी.
काशिनाथ महाजन हे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून आलेले असल्याने त्याच्या साहित्यात वेदना, आक्रंदने ठासून भरलेले असले तरी त्यांनी त्यावर मात करून जीवनाच्या प्रवासात सुखाच्या सावल्या शोधत शोधत त्यांचा प्रवास चालू ठेवला. अनेक स्थित्यंतरे आली आणि गेली, अशा अनेक घटना असतात की एक सांगावी तर दुसरी झाकते आणि दुसरी सांगावी तर पहिली झाकते अशा अनेक घटनात आपल्या गोड आणि मधाळ वाणीने त्यांनी साऱ्यांना आपलेसे केले, ही स्थित्यंतरे म्हणजेच पान हिरवे या मनाचे या मुखपृष्ठावर आजूबाजूला विविध रंगछटा एकमेकांत मिसळून गेल्याचे दाखवले असावे.
पान हिरवे या मनाचे या कलाकृतीवरील झाडाखाली एक दाढी वाढवलेला व्यक्ती डोळे बंद करून बसलेला आहे, खांद्यावर एक पक्षी दिसत आहे, अतिशय अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारा हा संदर्भ.. या मुखपृष्ठाचा सारांश आणि कवी तथा गझलकार काशिनाथ महाजन यांच्या अंतःहृदयाशी संवाद करणारा हा संदर्भ… काशिनाथ महाजन यांना मी पाहिले ते नाशिक येथील गझल मंथनच्या संमेलनात.. माझी ओळख देखील नाही… पण तेथे त्यांनी हातातील एका तबकडीवर बोटे फिरवून न पाहता गझल सादर केली होती तो संदर्भ डोळ्यासमोर आला आणि या मुखपृष्ठावरील व्यक्ती डोळे बंद करून बसलेला हा संदर्भ यांचा मेळ घातला तेव्हा असे लक्षात आले की गझलकार काशिनाथ महाजन हे लहानपणी बारा वर्षाचे असतांना त्यांनी हातात पांढरी काठी घेतली. ज्या वयात निसर्ग पाहायचा, सृष्टी डोळ्यात साठवायची त्यावयात त्यांनी पांढरी काठी हातात घेऊन शब्दसृष्टीने हे जग बंद डोळ्यांनी पहायला सुरुवात केली. म्हणतात ना असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी पण महाजन यांना आपल्या डोळ्यांनी जरी निसर्गाचा हिरवेपणा पाहता आला नाही तरी शब्दसृष्टीने, मनाच्या हिरवेपणाने जग पाहिले आणि संपूर्ण आयुष्य बहरून टाकले आणि म्हणूनच की काय मुखपृष्ठावर डोळे बंद केलेली व्यक्ती दाखवली आहे. यातून असाही अर्थ निघतो की, ही व्यक्ती चिंतन, मनन अधिक करीत आहे, आयुष्यातील गत जीवनाचे संदर्भ एका निवांत वेळात डोळे बंद करून आत्मचिंतन केले तर पुढील आयुष्याला नवे वळण मिळते. आयुष्यात आलेला रुक्षपणा आपल्या ज्ञानाच्या, हुशारीच्या जोरावर सहज मात करून घालवता येतो आणि असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी ही म्हण त्यांनी खोटी ठरवता येते. मानवी जीवनात कितीही दुःख आले तरी मनाच्या गाभाऱ्यात आनंदाचे हिरवे पान जपून ठेवले पाहिजे आणि म्हणूनच की काय पान हिरवे या मनाचे अशा शीर्षकाला त्यांनी मुखपृष्ठावर घेतले असावे.
कवी काशिनाथ महाजन हे सध्या सेवानिवृत्त अधिकारी आहेत, साठीनंतर चिमणीपाखरांसोबत उर्वरित आयुष्य निवांत जगावे हा कदाचित हेतू असावा म्हणून खांद्यावर चिमणी दाखवली आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून पांढरीकाठी घेऊन त्यांनी जीवनात मनाचा हिरवेपणा जपून ठेवला आहे. त्यांच्या बंद डोळ्यांनीदेखील ती सृष्टी पाहिली आहे जी सृष्टी इतर दृष्टी असूनही पाहू शकत नाही. त्यांच्या गझला डोळस माणसाला विचार करायला लावणाऱ्या आहेत. या मुखपृष्ठातून जगाला एकच संदेश दिला आहे की, “जरी असलो दृष्टिहीन, तरी न खचलो जीवनी, घेतली हाती पांढरी काठी, पान हिरवे जपले मनी. याच अनुषंगाने त्यांच्याच गझलेचा एक शेर येथे देत आहे “अंधार जीवनी पण, झालो निराश नाही, नेत्रामुळे मनाच्या, सत्यास पाहतो मी” कवी गझलकार काशिनाथ महाजन यांना पुढील कलाकृती निर्मितीस हार्दिक शुभेच्छा
परीक्षण-
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क- ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)