भूक
भूक नावाच्या रांडंचा
जर खून करता आला असता तर.
तर…तर…
माझी आईच कितीतरी वेळा
गुन्हेगार झाली असती.
निवद खायला आलेल्या
कावळ्यांनो.
पोटभर खा
पण,
माझ्या आईचं पोट
भरलेला एकतरी पुरावा द्या.
“नाहीतर इथंच तुमची कत्तल करीन”
जिंदगीभर तिच्या आतड्यात
थयथय नाचलात तेव्हा,
हिच भूक उकिरड्यावर
कुत्र्यांशी भांडत राहिली.
जिवंत देहाला घास
भरवणारा पंधरवडा
अजूनतरी कोणत्या धर्माने
केल्याचे ऐकलं नाही मी.
माझ्या आईचं भरलेलं पोट
मला एकदा तरी दाखवा
नाहीतर,
कुणाच्याच पिंडाला शिवायला,
एकही कावळा मी जिवंत ठेवणार नाही.
पण,
फक्त कावळे संपतील
भूक मात्र जिवंतच राहील.
आणि,
भूक जिवंतच ठेवावी लागेल मला.
कारण एकदा तो दिवस उगवणार आहे.
सगळेच कावळे बोलणार आहेत
माझ्या कवितेत
कि,आम्ही फक्त कावळे आहोत
कुणाचे पूर्वज नाहीत.
तोपर्यंत कविते तू अशीच
सळसळत राहा.
दंगलकार-नितीन चंदनशिवे.
कवठेमहांकाळ.सांगली
070209 09521