संभाजी ब्रिगेडचा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणार.!
संभाजी ब्रिगेडचा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणार.!
* प्रवक्ते प्रा.प्रेमकुमार बोके यांचे प्रतिपादन
गौरव प्रकाशन अमरावती: वाशिम येथे होणारा संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणारा ठरेल आणि पुढील काळात महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या दिशेने जाईल असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आणि वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. प्रेमकुमार बोके यांनी केले आहे.
आज वाशिम येथे संभाजी ब्रिगेडचा भव्य राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने संभाजी ब्रिगेडचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी वाशिममध्ये दाखल होणार आहेत.या मेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे नेते, व्याख्याते महाराष्ट्राच्या राजकारणाला नव्या दिशेने येणारी मांडणी करणार असून त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला वेगळा संदेश दिला जाईल.मागील वर्षी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झालेली आहे. महाराष्ट्रातील पुढील सर्व निवडणुका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड संयुक्तपणे लढणार आहे.या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले आहे.
विदर्भात होणारा संभाजी ब्रिगेडचा हा पहिलाच राज्यस्तरीय वर्धापन दिन मेळावा आहे.त्यामुळे वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात या मेळाव्याची चर्चा असून संभाजी ब्रिगेडचे नेते कोणती भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.सर्व राजकीय पक्षाचे नेते सुद्धा या भव्य मेळाव्यावर बारकाईने नजर ठेवून असून या मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे निश्चितपणे बदलतील अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्यात येणार असल्यामुळे मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.सध्या राज्यातील सत्ताधारी असलेल्या लोकांनी जी मनमानी सुरू केलेली आहे, त्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे नेते या मेळाव्यात आक्रमक भूमिका घेणार असून सत्ताधाऱ्या विरोधात रान पेटवणार आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर आणि जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे यांनी केले आहे.