कुणाचं छत्र नसलेला रवींद्र साळवे यांच्या कवितेतील ‘बाप’
प्रत्येकाचे एक विश्व आहे आणि या विश्वाचं ज्याचं त्याचं एक छत्र आहे ते म्हणजे बाप. बाप म्हणजे छत्र आणि छत्र म्हणजे बाप, असे हे एकमेकाला समर्पक शब्द आहेत. प्रत्येक मुलासाठी आणि कुटुंबासाठी न डगमगणारा छत्र म्हणजे ‘बाप’. ज्यावेळेला बाप नावाचे छत्र कोसळते त्यावेळेला प्रत्येक मुलावर आणि कुटुंबावर संकटाचा आभाळ कोसळत असते. विश्वातल्या प्रत्येक कुटुंबासाठी बाप नावाचं हे छत्र जरी असलं तरीही बाप नावाच्या या छत्राला एकही छत्र (आधार) नसल्याचे बुलढाणा येथील शिक्षक व कवी रवींद्र साळवे यांनी त्यांच्या कवितेत सांगितले आहे.
‘उजाडलं तरी पण…’ या काव्यसंग्रहातील ‘चालत राहणे एवढेच त्याला माहीत होते फक्त’ ही कविता असून त्यामध्ये बापाची दिनचर्या आणि कुटुंबाप्रती असलेली काळजी व्यक्त करणारी ही कविता आहे. ‘ उजाडलं तरी पण…’ हे काव्यसंग्रहाचे नाव असून त्यामध्येही गुढ अर्थ दडलेला दिसतो. उजाडलं हा शब्द जीवनामध्ये निर्माण झालेली सुखकर अवस्था व्यक्त करणारा वाटतो. परंतु, त्या समोर आलेला ‘पण’ शब्द हा थोडा बोचऱ्या स्वरूपाचा वाटतो. ‘पण’ हा शब्द कदाचित असेही सूचित करत असेल की, प्राप्त झालेल्या सुखकर जीवनाला अजूनही वेदनेचा दाह कायम आहे. अजून पुरेसं उजाडलं नाही. अशा ह्या संग्रहातील बापाविषयीची कविता वाचतांना, कवितेचे नाव हे वाचतांना वाचकाला नक्कीच विचारा मग्न करते, असे म्हणता येईल. कवितेचे नाव आहे…’ चालत राहणे एवढेच त्याला माहीत होते फक्त’. कवितेचे हे नाव म्हणजे, कर्म करीत रहा यासारखे वाटते. त्यासोबतच चांगलं कर्म केल्याने चांगले फळ मिळत असते. त्यामुळे फक्त चांगले कर्म करत राहणे एवढेच आपले हाती आहे , हे तत्व माहित असलेला बाप जणू काही कवी रवींद्र साळवे यांनी कवितेच्या या नावावरून वाचकांच्या समोर शब्दबद्ध केला आहे, असे वाटते.
मुलांचा आधार असलेला ‘बाप’ हा नेहमीच मुलांच्या भविष्याचा विचार करीत असतो. मुलांची स्वप्ने साकार करण्यासाठी , ‘बाप’ हा स्वतःची एक आदर्श दिनचर्या निर्माण करतो. त्या दिनचर्याप्रमाणे आपले वर्तन करीत असतो. ज्या वेळेला सकाळी भल्या पहाटे अंथरुणावर ‘बाप’ जागतो. त्यावेळेला सकाळी सकाळी पहिला विचार बापाच्या मनामध्ये मुलांच्या भविष्याचा असतो. या विचारांमध्ये अंथरुणावर जागी झालेल्या बापाची नजर विचारांमध्ये तल्लीन होते आणि तल्लीन झालेल्या नजरेने एकटक विचार करत छपराकडे बघणारा ‘बाप ‘ हा कवी रवींद्र साळवे यांनी व्यक्त केला आहे. एकटक हा शब्द बापाची त्यांच्या लक्षाकडे असलेली एकाग्रता व्यक्त करणारा वाटतो. काहीशी एकाग्रता आणि काही चिंता व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी आहेत…
भल्या पहाटे बाप माझा
अंथरुणावर जागायचा,
एकटक विचार करत
तो छपराकडं बघायचा.
मुलांच्या भविष्याची आणि एकूणच संसाराची चिंता वाहतांना, खिन्न अवस्थेमध्ये घराच्या छताकडे एकटक पाहणारा ‘बाप’ मनातल्या मनात प्रश्नांच्या सोडवणूकीचा विचार करायचा. कवी रवींद्र साळवे यांनी बापाचे वर्णन कडव्यामध्ये रेखाटलेले दिसतंय. बाप गरिबीने पिचलेला होता. त्याच्या अनेक समस्या असल्यामुळे बापाचं आयुष्य जणू फुटकंच आहे, असे कवी म्हणतो. फुटकंच हा शब्द बापाच्या जीवनामध्ये असलेल्या अनेक समस्यांचे प्रतीक आहे, असे वाटते. फुटक्या आयुष्यामध्ये बापाच्या जीवनातील अनेक स्वप्न भिजली आहेत… पाण्यात मिसळली आहेत असे काहीसे, कविला सांगायचे असेल, असे वाटते. अशा फुटक्या आयुष्यात भौतिक दृष्ट्या हतबल झालेला ‘बाप ‘ व्यक्त करतांना कवीने घराची फुटकीच पत्रं असल्याचेही कवितेमध्ये सांगितले आहे. फुटक्या नशिबामध्ये स्वप्न भिजली आणि फुटक्या पत्रामुळे बापाचा संसार पावसात भिजला. अशा या फुटक्या आयुष्याला आणि फुटक्या पत्राला कुणाचेही छत्र प्राप्त झालं नाही, याची खंत कवींनी कवितेच्या पुढील ओळींमध्ये व्यक्त केली आहे…
फुटकंच आयुष्य त्याचं
फुटकीच घराची पत्रं,
धो धो पावसात भिजतांना
नव्हतं कुणाचं छत्र.
फाटलेल्या आयुष्याला शिवतांना, अहोरात्र कष्ट करणाऱ्या बापाचे हात अतिशय कष्ट करून रक्ताळलेले आहेत. यासोबतच शेतात कष्टाची काम करताना बापाच्या पायात कधी काटा रुतला आहे. अशा अनेक समस्यांना समोर जाणारा बापाचा जीवनरुपी प्रवास आहे. अशाही अवस्थेमध्ये मुलांचे स्वप्न साकार करणारा आणि मुलांच्या स्वप्नांना गगन भरारी देण्याचे बळ देणार जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे बाप होय. बापाच्या प्रत्येक वाटा ह्या भेगाळलेल्या आहेत. भेगाळलेल्या वाटा हे शब्द बापाच्या मार्गातील अडथळे व्यक्त करणाऱ्या आहेत. असाच खडतर मार्गाचा प्रवास करणारा मार्गस्थ बाप कवी रवींद्र साळवे यांनी कवितेतील पुढील ओळीमध्ये चित्रबद्ध केला आहे…
रक्ताळला हात कधी
रुतला कधी काटा,
खाचखळग्यांचा प्रवास त्याचा
भेगाळलेल्या वाटा.
बापाच्या जीवनामधील कष्टाला परिसिमा नाही. बापाच्या अतीव कष्टामुळे घाम निथळला आहे… आणि रक्तही सुकून गेले आहे. बापाच्या जीवनामधील अतिशय कष्ट व्यक्त करतांना, कवी रवींद्र साळवे यांनी अतिशयोक्ती अलंकाराचा उपयोगी या ठिकाणी केला आहे. असे असले तरीसुद्धा, कोणताही विचार न करता, केवळ आपल्याला या मार्गावर चालत राहायचे आहे… नक्कीच या मार्गावर आपल्याला आपल्या मुलाचा उज्वल भविष्याचा मार्ग सापडेल, असा बापा मधील आशावाद व्यक्त करणाऱ्या कवितेतील पुढील ओळी आहेत…
निथळला घाम त्याचा
सुकून गेले रक्त,
चालत राहणे एवढेच त्याला
माहीत होते फक्त.
मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि जीवनातील उन्नतीसाठी फोकांना बाक देणारा, पारंपरिक व्यवसाय करणारा बाप कवी रवींद्र साळवे यांनी कवितेमध्ये शब्दबद्ध केला आहे. फोक म्हणजे लांब आणि नाजूक काडी. जिचा उपयोग ग्रामीण भागातील वस्तू बनवण्यासाठी करण्यात येतो. जसे की, दुरडी, कनग, डालं इत्यादी वस्तू… अशा प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारे फोक डोक्यावर वाहणारा बाप कवीने कवितेमध्ये दाखविला आहे. पृथ्वीएवढं ओझं, बाप डोक्यावर वाहायचा, असा शब्दप्रयोग कवितेमध्ये कवीने केलेला आहे. पृथ्वीएवढं ओझं हा शब्द संसाराचं ओझं आशा अर्थाने घेतला असावा, असे वाटते. पारंपारिक व्यवसाय करीत संसाराचं ओझं वाहणारा बाप हा कवी रवींद्र साळवे यांनी कवितेतील पुढील ओळींमधून व्यक्त केला आहे…
फोकांना बाक देतांना बाप माझा
एक बघायचा,
पृथ्वीएवढंच ओझं
तो डोक्यावर वाहायचा.
हलाखीची परिस्थिती असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी चुलीचा उपयोग केला जातो. जळतं म्हणून काट्याच्या झाडाच्या फांद्या उपयोगात आणल्या जातात. यामधील चुलीमध्ये काटक्या टाकून मोठा जाळ करणारा बाप हा बरंच काही सांगून जातो. काटक्या ह्या मला बापाच्या जीवनामध्ये आलेल्या अनेक समस्या वाढतात. अनेक समस्यांची वाट लावत, प्रगतीचा जाळ निर्माण करणारा बाप हा मला या ओळी मधून दिसतो. कारण, चालत राहणे एवढेच त्याला माहीत होते फक्त, यामध्ये बापाच्या मनामध्ये असलेला दुर्दम्य आत्मविश्वास व्यक्त होतो. कारण, प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या बापाला ठामपणे माहित आहे की, काळ बदलत असतो. फक्त त्यासाठी करत असते, आपण आपल्याशी प्रामाणिक असण्याची… बापामधला प्रामाणिकपणा अधोरेखित करणाऱ्या कवितेमधील पुढील ओळी आहेत…
चुलीत काटक्या टाकून त्यानं
केला मोठा जाळ,
माहित होतं त्याला
बदलत असतो कधी काळ.
कठोर आणि प्रामाणिक कष्टाने काळालाही बदलता येते. अशा प्रकारचा अमूल्य संदेश समाजाला देणारी कवी रवींद्र साळवे यांची ही कविता आहे.
काव्य नभातील बाप
– भगवान राईतकर
हिवरा आश्रम, मेहकर
मो.९७३०३३२१५१
…………………………….