अहंकार
आयुष्यात अनेक गोष्टी साध्य करतांना कधी कधी स्वतःभोवती एक विशिष्ट विकाराचे वर्तुळ तयार होते आणि त्या वर्तुळात आपण कधी गोल गोल फिरायला लागतो ते आपले आपल्याच कळतं नाही. त्या वलयाबाहेर अनेक गुणांनी विभागलेले आपल्या पेक्षा कुणी “गुणात्मा” आहे ही बघण्याची डोळस बुध्दी लय पावत जाते. हे स्वार्थी प्रवृत्तीचे वलय इतके आपल्या मनावर राज्य करायला लागतात की, आपले आपल्यालाच कळतं नाही, काय चूक नी काय बरोबर आहे. माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही किंवा माझी कुणी बरोबरी करू शकत नाही हा आविर्भाव मनावर कधी हावी होतो कळतच नाही. निस्वार्थी मनावर बसलेली स्वार्थाची धूळ इतकी जमा होत जाते की, अहंकाराचे चित्र त्यावर आपोआप कोरले जातात आणि त्या कोरलेल्या चित्रात स्वतःकडे बघण्याची दृष्टी कुमकुवत होत जाते! सर्जनशीलता प्रगल्भ असूनही, आकलन करणारी दृष्टी कमजोर होते. आपल्या जवळ असणारे सुख, आनंद अहंकाराच्या झोपाळ्यावर कधी झुलायला लागतात कळतंच नाही. विशालकाय पसरलेल्या क्षितिजाकडे आपले लक्षच जात नाही कारण किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा आपल्याला जास्त उत्साही आणि मोहित करतात. उत्साहाच्या भरात मन उंच उडायला लागते! उंच उंच बघतांना आपोआप खालचे धूसर दिसायला सुरुवात होते आणि इथेच अहंकार जन्म घेतो. ज्याची किंमत जगाच्या नजरेत शून्य आहे. त्यामुळे आपले सुंदर व्यक्तिमत्व ढासळले जातात. वाढलेला मीपणा विकसित कार्याला नकळत बाधा ठरायला सुरुवात होते. मनुष्यातील “आत्मबळ” आणि “आत्मज्ञान” कमी होत जाते!
म्हणूनच कदाचित आपल्याला आयुष्याचे धडे देण्यासाठी शाळेत असतांना ससा कासवाची गोष्ट सांगितली तसेच शिकविली जात असे..कासव फार हळूहळू चालून शेवटी जिंकतो पण मीच जिंकणार असा अहंकार झालेला सुसाट वेगाने पळणारा ससा मात्र हरतो. “शेवटी अंहकार हरला आणि आत्मविश्वास जिंकला” तरीही कळून वळत नाही अशी आपली अवस्था असते.. प्रामाणिक पणावर अहंकार जेव्हा विजय प्राप्त करतो तेव्हा, नेमके आपले चूक की बरोबर याचे आकलन होत नाही आणि चूक झालीही तरी मान्य करणे जमत नाही कारण तिथे अहंकार दुखावला जातो. जो मनाला कमजोर बनवतो.. त्याचसाठी दुसऱ्याला हरवण्याची मनात ईर्ष्या निर्माण होते. चित्त विचलित करण्याचे काम अगदी चोखपणे मनातील अहंकार करतो! कुणाचे कौतुक करणे, कुणाला प्रोत्साहन देणे, मनात असूनही करू शकत नाही.. हा असाध्य आजार कळत नकळत डोकावत असतो. बिंब प्रतिबिंबाचे द्वंद्व या अहंकाराच्या आरशात चालू असते; पण खरे काय खोटे काय हे समजायला अहंकार त्यांच्या मध्ये असतो. प्रतिबिंबाच्या आत क्रोध, घृणा, इर्षा, लालच निर्माण होते. ते हळूहळू मनावर विक्षिप्तपणे अधिराज्य गाजवायला लागतो आणि त्यातच अनेक चांगली नाती तुटत जातात.. माघार घेणे अशा लोकांना जमत नाही. कुणाचे ऐकून घेणे ही मानसिकता यांच्या मध्ये नसते! सत्य स्विकारण्याची आणि दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची क्षमता नाहीशी झालेली असते.. याचा विपरीत परिणाम यांच्या व्यक्तिमत्वावर होतो.. “अती शहाणा त्याचा बैल रिकामा” ही एक शालेय जीवनात शिकविलेले म्हंण आहे. यातून आपल्या मनावर अनेक संस्कार बिंबविले जातात; पण या समजत असलेल्या जीवनाच्या तत्वज्ञानाला समजून घेण्याची बुध्दिमत्ता अहंकार नाहीसा करतो! आपल्या कळत नकळत हे सगळे घडत असते. मीच बरोबर हा पवित्रा मनात रुजलेला असतो. कुठल्या नी कुठल्या कारणाने तो मानवी डोक्यात डोकावत असतो. दुसऱ्यांना कमी लेखणे यांना खूप चांगले जमते पण ते विसरतात, आज छोटेसे असणारे रोपटे उद्या मोठा वृक्ष होतो हा निसर्गाचा नियम आहे.. आणि आकाशात कितीही उंच उडले तरी विसाव्यासाठी पाखरांना जमिनीवरच यावे लागते..
शेवटी मातीत येणे, मातीचेच देणे आणि मातीतच जाणे.. एवढे साधे सोपे गणित ज्याला जमले त्यालाच मने जिंकता येतात.. जीवनाचे सुख आणि आनंद नम्रतेने मिळते.. शालीनतेने जीवन घडते.. आणि स्वभावातील दायित्वाणे समृध्द होते.. सांगायचे झाले तर शिवाजी महाराजांच्या दायित्वाने स्वराज्याची स्थापना झाली, संतांच्या सहनशीलतेने अंधकारमय जीवन जगत असलेल्या समाजाला एक योग्य दिशा मिळाली.. पण अहंकारी दुर्योधनामुळे महाभारत घडले तर अहंकारी रावणामुळे रामायण.. अहंकाराने फक्त नुकसान होते आपले आणि पुढील व्यक्तीचे पण.. म्हणूनच,, पायाची माती आणि मनाची प्रीती कधीही करपायला नको याचे भान ठेवले की, कुठल्याही गोष्टीचा अहंकार वर डोके काढणार नाही.. मनातील माणुसकी, भारतीय संस्कारांची शिदोरी सतत जपता यावी. जे जे येई आपणा, ते ते द्यावे सकळा.. कर्तव्य हेच कर्म आणि कर्म हीच पूजा.. या संत वचनांचे सतत स्मरत असावे! अहंकार नक्की असावा पण तो कोरडा अहंकार अजिबात नसावा!! अहंकार असावा समाजविकासाचा, समाजप्रगतीचा, समाजउन्नतीचा, गोरगरिबांना केलेल्या निस्वार्थ मदतीचा.. समाजासाठी जगतांना नफा, तोटा याही पलीकडे जावून तुम्ही योगदान देता त्याचा अहंकार करावा! समाजासाठी कार्य करीत असतांना निरपेक्ष, निपक्षपात करणे.. आपल्याकडून कुणी दुखावल्या जाऊ नये याचे भान ठेवणे.. कुणी आपला असो नसो पण मला सर्वांचे व्हायचे आहे.. हा विचार असणे.. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी.. बुडत्याला हात.. गरजेला साथ.. अशी कामे जेव्हा देशाचा नागरिक म्हणून तुम्ही समाजासाठी करता.. त्याचा अहंकार असावा..
मरावे परी कीर्ती रूपे उरावे
संतांना फिरून एकदा स्मरावे..
खोटेपणाचा आव न आणता
निस्वार्थ भावनेने कार्य करावे!
– निशा नरेंद्र खापरे
नागपूर