दिवस आपल्यासाठी उगवतोच.!
मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.तो आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता.जणू पैलवानच.म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.आणि पोरं त्याच्या गुडघ्याला.अंगाने दणकट असणारा नाना.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.
त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता,वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची.त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची.पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं.आणि त्याचा परिणाम म्हणजे नाना दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा.आणि पोरं पण नानाला मारताना जोरात रट्टा द्यायची.नाना डोळे गच्च मिटून हाताची घडी घालून उभा राहायचा.पोरांनी कधीच नानावर दया माया दाखवली नाही.मला मात्र नानाची फार कीव यायची.कारण नानाला कशाचंच उत्तर यायचं नाही.
तरीही नाना दररोज शाळेत न चुकता यायचा.उलट सर्वांच्या आधी नाना वर्गात हजर असायचा.सकाळी आलेला नाना व्यवस्थित दिसायचा.आणि शाळा सुटल्यावरचा नाना म्हणजे दोन्ही गाल लालभडक सुजलेले आणि डोळे पार रडून रडून खोल गेलेले दिसायचे.एक दिवस शाळा सुटल्यावर मी जवळ जाऊन नानाला विचारलं,म्हणलं “नाना कशाला शाळेत येतो?तुला काही येत नाही. रोज पोरं मारतात तुला.तू कुणाला काहीच बोलत नाहीस.मला कळत नाही एवढं सहन करूनसुद्धा तू कधी शाळा चुकवत नाहीस.कशासाठी हे तू करतोस.?” त्यावर नानाने माझ्या डोक्यावर हात ठेवून केसातून हळुवार बोटे फिरवली.माझ्याकडे पाहत त्याने डोळे गच्च मिटले.डोक्यावरचा हात काढून घेतला आणि नाना तसाच पाठमोरा होऊन झपझप पावले टाकत निघून गेला.मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नानाने दिलं नाही.
रोज शाळा भरत राहिली.आणि रोज नाना न चुकता मार खात राहिला.तोंड सुजवून घेत राहिला.मास्तरने प्रश्न विचारला की आपोआप नाना मनानेच उभा राहायचा अगदी तसाच डोळे गच्च मिटून.आणि मग ज्या पोरानं उत्तर बरोबर दिलेलं असायचं ते उड्या मारत नानाजवळ जायचं आणि खाडकन नानाच्या जोरात मुस्काडीत द्यायचं.पाचही बोटे नानाच्या गालावर जशीच्या तशी उमटायची.एवढ्या धिप्पाड नानाला मारलेल्या आनंदाने ते पोरगं लै उड्या मारायचं.आणि सगळी पोरं नानावर खी…खी…खीं..दात इच्कुन माकडासारखी हसायची.आणि मी हे सगळं केविलपणे बघत बसायचो.
पण एक दिवस घडलं असं,मास्तरने एक प्रश्न विचारला,तो प्रश्न असा होता.”गावाबाहेर बायका जिथं धुणं धुवायला जातात,त्या जागेला काय म्हणतात.?”आम्ही सगळ्यांनी जमेल तशी उत्तरे दिली, कुणी सांगितलं,ओढा म्हणतात, नदी म्हणतात,वगळ,आड,विहीर,तलाव,तळं, डबकं,पोहरा म्हणतात तर कुणी कुणी खूप डोकं खाजवून काहीही उत्तरे दिली.पण मास्तर उत्तर चुकीचं आहे असंच सांगत होते.नाना शांत बसून सगळीकडे पाहत होता.सगळ्यांची उत्तरे चुकलेली होती.गोंधळ शांत झाला आणि नानाने हात वर केला.जसं नानाने हात वर केला तशी सगळी पोरं एकसाथ मान वळवून नानाकडे बघायला लागली.मास्तर ही नानाकडे एकटक बघतच राहिले.कारण आज पहिल्यांदाच नानाने बोट वर केलेलं होतं.
त्याच शांततेत नाना उभा राहिला.आणि हाताची घडी घालून नानाने मान ताठ करून उत्तर दिलं,”गुरुजी गावाबाहेर बायका ज्या जागेवर धुणं धुतात त्या जागेला पाणवठा म्हणतात.”आणि एका झटक्यात गुरुजी म्हणाले,”नाना लेका तुझं उत्तर बरोबर आहे”.मास्तर जसं उत्तर बरोबर आहे म्हणाले तसा नानाने मोठा दीर्घ श्वास घेतला.गेल्या सहा वर्षांनंतर आज आज नानाचं उत्तर बरोबर आलेलं होतं.आणि नियमानुसार आज नाना सगळ्यांच्या मुस्काडीत मारणार होता.नानाचा एक हात किमान बारा किलो वजनाचा तरी नक्की असावा. त्याचं ते रूप बघून वर्गातली सगळी पोरं थरथर कापायला लागली.पळून जाण्यासाठी दफ्तर आवरायला लागली.नानाच्या लक्षात आलं.आणि पटकन दाराकडे धाव घेत वर्गाचं दार लावून दाराची आतली कडी लावली.त्याने कडी लावल्याबरोबर सगळी पोरं मोठ्याने बोंबलायला लागली.कारण नानाचा दणका बसल्यानंतर आयुष्यातून उठणार याची जाणीव प्रत्येकाला झालेली होती.
मी शांतपणे नानाकडे पाहत होतो.मलाही एक त्याची मुस्काडीत बसणार होतीच.पण मनातून मी खूप आनंदी झालो होतो.नानाचा चेहरा लालबुंध झाला होता.त्याचा हात सळसळत होता.डोळे मोठे झाले होते,आणि नाना आता सगळ्या वर्गावर तुटून पडणार होता.मास्तरानीच नियम केलेला असल्यामुळे मास्तर नानाला अडवूच शकत नव्हते.तरीही नानाचा तो राग पाहून मास्तर दबकतच हळूच नानाला म्हणाले,”नाना जाऊ दे सोड लेकरं लहान…..” मास्तरचं वाक्य पूर्ण झालंच नाही.तोच नानाने अक्षरशः मास्तरला लहान मुलासारखं दोन्ही हाताने उचलून घेतलं आणि अलगद खुर्चीवर नेऊन ठेवलं. मास्तर घाबरून शांत बसले.
त्यानंतर गेल्या जवळजवळ सात वर्षाचा तो अन्याय नानाला आठवला.नानाने वर्गावर नजर फिरवली.त्याला आठवू लागलं.कुणी कुणी कसं हानलेलं आहे.कुणी किती छळेलेल आहे हे सगळं नानाने डोक्यात फिट्ट केलेलं होतं.नाना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आग फेकून पाहू लागलेला होता.पोरं हात जोडून ओरडत होती.नव्हे बोंबलत होती.मास्तरला विनवण्या करत होती.पण मास्तरचा नाईलाज होता.
नानाने सुरवात केली.एक एक पोरगं कॉलरला धरून नानाने उभं केलं नाही तर एका हाताने उचलून धरलं.आणि दुसऱ्या हाताने नानाने असं झोडपून काढायला सुरवात केली की बस्स.एका मुस्काडीत पोरगं भिंतीवर जाऊन आदळत होतं.आणि आडवं होऊन पडत होतं.ते बघून बाकीचे सगळे जोरात बोंबलत होते.नाना पेटलेलाच होता.सगळा वर्ग ओला होताना दिसायला लागला.त्याच्या एका रट्याने पोरं चड्डीत मुतून मुतून बोंबलत होती.काही पोरं ते बघूनच मारायच्या आधीच लघवी करत होती.मास्तर हात जोडून वर बघून काहीतरी डोळे झाकून बडबडत होते.नाना कुणाला सुट्टी देत नव्हता.
मी कधी नानाला मारलं नव्हतं.म्हणून नानाने माझ्या फक्त गालावर हात फिरवला.सगळ्यांना झोडपून झाल्यावर नाना त्याच्या जागेवर जाऊन बसला.सगळा वर्ग हमसून हमसून रडत होता.आणि नाना त्याच्या फुटलेल्या मिशिवर ताव मारत सगळीकडे बघत बसला होता. पोरं एकमेकांना सावरत होती. मास्तर टेबलावर मान टाकून गप्प पडून बसलेलं होतं. मी हळूच नानाला चोरून पाहत होतो.त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं.त्याचा असा हसरा आणि सुंदर चेहरा आज मी पहिल्यांदा बघत होतो.
शाळा सुटली.रोज दंगा करत धावत पळत जाणारी पोरं जागेवरच बसून राहिली.फक्त नाना उठला आणि माझ्याजवळ आला.माझ्या हाताला धरून त्याने मला उठवलं.मी त्याच्यासोबत बाहेर आलो.त्याने त्याचं दफ्तर मला दिलं.आणि म्हणाला, “ राहू दे आता तुलाच दफ्तर,मी शाळा सोडली आजपासून.उद्यापासून येणार नाही.तू मला विचारलं होतं ना की शाळा का सोडून देत नाहीस? तर यासाठी सोडत नव्हतो.कारण मला माहित होतं.एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल.एक ना एक दिवस तरी माझ्यासाठी दिवस उगवल.त्या दिवसाची वाट बघत होतो.आणि आज तो दिवस आला.” माझ्या नाजूक गालावर त्याने हात फिरवला.आणि नाना शाळेच्या मैदानातून शांतपणे निघून गेला.
दोस्त हो, गोष्ट संपली.पण फार मोठी शिकवण नानाने दिली.जोपर्यंत सहन करायचा काळ असतो तोपर्यंत सहन करत रहा.कारण आपला दिवस येणारच असतो त्या दिवसाची वाट पहात रहा.
– दंगलकार नितीन सुभाष चंदनशिवे
मु. कवठेमहांकाळ
जि. सांगली.
संपर्क – 070209 09521 (आपली प्रतिक्रिया लेखकाला कॉल करून ही देऊ शकता.)
अजून हसत आहात का..? हसता हसता शेअर करून टाका बरं….