मराठीच्या ‘अभिजात दर्जा’चा तिढा दूर झाला
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मागील ११ वर्षापासून सतत लढा सुरू होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून मराठी भाषा मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव आदींपर्यंत केंद्राला पत्र दिले आहे. गेल्या ११ वर्षांत ३० हून अधिक काळ सांस्कृतिक मंत्रालयाने अधिक पत्रे पाठवली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी २०२० मध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेत प्रस्ताव मंजूर करून तो पाठवलाही होता…मात्र केंद्र सरकारने तब्बल एका तपानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे मान्य केले आहे.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी २०१३ सालापासून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती.शासनाने १० जानेवारी २०१२ रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञ संशोधकांची समिती स्थापन केली होती. या समितीने इतिहास संशोधन करुन जुने संदर्भ, प्राचीन ग्रंथ, पुरातन काळातील ताम्रपट, कोरीव लेख, शिलालेखांचा संदर्भ इ. प्राचीन दस्ताऐवज तपासून त्याआधारे एक सर्वंकष व परिपूर्ण अहवाल शासनास सादर केला. या अहवालामध्ये सविस्तर विवेचनासह मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळणेसाठी विहित केलेल्या निकषांची पूर्तता करते ह पुराव्यांसह स्पष्ट केले आहे.
मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो.
माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके….’ असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. मराठी भाषेला जवळपास २००० वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय. असं असलं तरी अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न केला जात होते.शेवटी तो सोन्याचा दिन उजडला शेवटी ‘देर आये दुरुस्त आये ‘ या म्हणीनुसार केंद्र सरकारला जाग आला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.
अभिजात भाषेसंबंधी निकष काय असावेत यासंबंधी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय निर्णय घेतं. आतापर्यंत ज्या भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यांची नोंद भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये करण्यात आली आहे. सध्या देशातील तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पंतप्रधानाच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील भाषां व्यतिरिक्त मराठी, पाली प्राकृत, असामी बंगाली या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे आता अभिजात भाषांची संख्या ११ झाली आहे.
एकूण ५२ बोली भाषेपासून आपली मराठी भाषा नटलेली आहे. मराठी भाषेची महती दुर्गाभागवतांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांनी १८८५ साली, तर ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी १९२७ सालीच त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवली आहे.
गाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केला आहे. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे, याचा अंदाज येऊ शकेल. मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. म्हणूनच मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी होत होती.अभिजनांची भाषा म्हणजे अभिजात भाषा असा आतापर्यंत प्रस्थापित समज होता. पण प्रा. रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून त्याची उत्तम मांडणी केली आहे. मराठीचं वय ८००वर्षे सांगितलं गेल्यामुळंही त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळं आता आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या केवळ एक पाऊल दूर होतो आता ते पाऊल जवळ आल आहे.
मराठी भाषेला तिच्या प्राचीनतेमुळे, साहित्यामुळे अभिजात दर्जा मिळणे आवश्यक होते. अमेरिकेतील ‘एथनोलॉग’ या संस्थेतर्फे २०१९ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला. जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांची यादी यामध्ये प्रसिद्ध झाली. त्यानुसार मराठी भाषा दहाव्या स्थानावर आहे. जागतिक लोकसंख्येच्या १.०७९ टक्के, म्हणजे सुमारे आठ कोटी ३१ लाख लोक मराठी भाषा बोलतात. हे पुरेसे नाही का? तेलुगू भाषा अकराव्या, तर तमीळ अठराव्या स्थानावर आहे. असे असूनही मराठीला अभिजात दर्जा मिळत नव्हता. ही खेदाची बाब आहे. मराठी ही फक्त महाराष्ट्राची भाषा नाही. गोवा, दादरा, नगर, हवेली, दमण, दीव येथेही मराठी भाषक आहेत. हिंदी आणि बंगालीनंतर सर्वाधिक बोलली जाणारी ही भाषा आहे. यापूर्वी मराठी प्राकृत ही भाषा होती. अजूनही त्यातील ग्रंथ आहेत. महाराष्ट्री प्राकृतापासून पुढे मराठी प्रचलित झाली. यादव राजांच्या काळात मराठी भाषेने बाळसे धरले. त्या राजवटीत कन्नड आणि मराठी या भाषा वापरल्या गेल्या. मग धार्मिक साहित्यातून मराठी भाषा खऱ्या अर्थाने प्रचलित होऊ लागली.
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात,
१)संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान १५००-२००० वर्षे प्राचीन असावा.
२) या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे.
३) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
४) प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे :
अभिजात भाषा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्यांना भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो तेव्हा भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोरच उमटवली जाते. मुख्य म्हणजे भाषेच्या विकासकार्यासाठी अधिक चालना मिळत जाते.
अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत :
मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.
मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे. इ.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६