नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार
मानवाकडे सर्वात मोठा अवगुणाचा घटक म्हणजे इर्षा होय. हा मानवतेला लागलेला कलंक आहे. ईर्षेपोटी माणसाने माणसाचे फार मोठे नुकसान केले आहे. एकदा का माणूस ईर्षेपोटी लागला की तो सर्वनाशच करतो. त्याला कुठलेही भान राहत नाही. अशा इतिहासात अनेक घटना ईर्षेपोटी घडल्या आहेत. मानवानेच मानवाचे नुकसान केले आहे.
इर्षा म्हणजे आपल्याकडे नसलेल्या गोष्टीची ओढ होय. इर्षा म्हणजे कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख होय. ह्याचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अनुभव येत असतो. ही इर्षा प्रत्येक ठिकाणी असते. ती कुटुंबात, समाजात, जाती-पातित, धर्मा-धर्मात व देशात-देशात सुद्धा असते आणि ह्या इर्षे पोटी मानवजातीचे फार मोठे नुकसान झाल्याचे इतिहासावरून आपल्याला बघायला मिळते. त्यातील एक मोठे उदाहरण म्हणजे विश्वख्यातीचे नालंदा विश्व विद्यापीठ आगीत भस्मसात झाले हे होय. हे एव्हढे मोठे विश्वख्यातीचे विद्यापीठ आगीत का भस्मसात झाले तर त्याला एकच कारण आहे ते म्हणजे इर्षा होय.
तुर्की शासक बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठाला आग लावली होती. असे सांगितले जाते की, विद्यापीठाच्या ग्रंथालयात एवढी पुस्तके होती, की तब्बल तीन महिने ही आग धूमसत होती.
बख्तियार खिलजीने विद्यापीठातील धर्माचार्य आणि बौद्ध भिक्षूंना ठार केले. खिलजीने भारतात बौद्ध शासन काळात भरभराटीस आलेल्या अनेक शहरांवर कब्जा केला होता.
इतिहासकारांच्या मते, नालंदा विद्यापीठाला आग लावण्याचे कारण बख्तियार खिलजीचे आजारपण होते. झाले असे, की खिलजी खूप आजारी होता. त्याच्यावर अनेक हकीमांनी उपचार केले पण त्याची प्रकृती सुधारली नाही. तेव्हा त्याला सल्ला देण्यात आला, की नालंदा विद्यापीठातील आयर्वेद विभागप्रमुख आचार्य राहुल श्रीभद्र यांचा सल्ला घ्यावा. त्याने बौद्ध भिक्षू आचार्य राहुल यांना बोलावणे पाठवले पण उपचाराआधी अट ठेवली की मी हिंदूस्थानचे कोणतेही औषध घेणार नाही. एवढेच नाही तर या मुघल शासकाने जर मी बरा झालो नाही तर आचार्याची हत्या करेल असेही फर्मावले.
दुसर्या दिवशी आचार्य त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याला कुराणाचे पृष्ठ संख्या इथपासून इथपर्यंत पठण केल्यास बरे वाटेल असे सांगितले. त्याने कुराणाचे वाचन केले आणि अक्षरशः त्याला बरे वाटू लागले. याचा त्याला आनंद होण्याएवजी राग आला. त्याच्या हकीमांना जे जमले नाही ते एका भारतीय वैद्याने करुन दाखवल्याने तो संतप्त झाला. त्याला भारतीय ज्ञानाचे श्रेष्ठत्व सहन झाले नाही. बौद्ध धर्म आणि आचार्य राहुल यांचे आभार मानन्याऐवजी त्याने 1199 मध्ये नालंदा विद्यापीठालाच आग लावली. तेथील बौद्ध भिक्षूंना ठार केले. खिलजी बरे होण्याचे कारण म्हणजे आचार्य राहुल यांनी खिलजीला कुराणाची जी पाने वाचण्यास सांगितली त्या पानांच्या कोपर्यावर त्यांनी आयुर्वेदिक औषधींचा लेप बेमालूमपणे लावला होता. खिलजी कुराणाची पाने उलटत असताना बोटाला थुंकू लावत होता. त्यामाध्यमातून त्याने 20-25 पाने चाटली आणि औषध त्याच्या पोटात गेले आणि त्याला बरे वाटले. याची परतफेड त्याने नालंदा विद्यापीठ आगीच्या भक्षस्थानी देऊन केली.
आजही माणूस जन्माला येऊन करोडो वर्ष झाले परंतु त्याच्यातील इर्षा हा अवगुण मात्र गेला नाही. मला, मला, मलाच सर्व काही पाहिजे हीच चाढाओढ सध्या सुरु आहे. श्रीमंत – गरीब ह्यामधली दरी अधिक वाढत आहे. काहीं कडे गडगंज संपत्ती आहे तर काहींना दोन वेळचे जेवण सुद्धा नशीब नाही आहे.
ह्या दुःखाचे निवारण करण्यासाठी भगवान बुद्धांनी राजमहालाचा त्याग केला. अहोरात्र तपश्चर्या करून मानवकल्याणासाठी ध्यान प्राप्त केले आणि स्वतःवर विजय मिळविला. स्वतःवर विजय मिळविणे म्हणजे सर्व अवगुणांचा नाश करणे होय. हा विजय सर्वांनी आपल्यावर मिळविला तर तो माणूस तणावरहित व शांततेने जीवन जगू शकतो. ह्यासाठी भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाची गरज संपूर्ण मानव जातीला आहे.
हा नालंदाचा बहुमूल्य ठेवा आज असता तर नक्कीच मानवाचे कल्याण झाले असते. कदाचित करोना इकडे फिरकला सुद्धा नसता व कोरोडोंचे प्राण वाचले असते.
हे वारंवार सिद्ध झाले आहे की, अहिंसेमुळेच मानवाचे कल्याण होऊ शकते. चला परत एकदा संकल्प करूया की, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचा स्वीकार करूया व नालंदाच्या इर्षेची धगधगती आग विझवूया व मानवजातीचे कल्याण करूया.
बौद्ध पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा, सर्वांचे मंगल होवो.
– अरविंद मोरे,
नवीन पनवेल पूर्व
मो. ९४२३१२५२५१