शेतीमातीच्या व्यथा आणि वेदना म्हणजे – माती मागतेय पेनकिलर
चांदवड, जि नाशिकचे प्रसिद्ध कवी सागर जाधव यांचा नुकताच “माती मागतेय पेनकिलर” हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अत्यंत सुबक आणि अर्थपूर्ण असलेला कवितासंग्रहाचा फोटो पाहताच त्यावर लिहण्याचा मोह आवरता आला नाही. कवितासंग्रहाचे शीर्षकच आणि मुखपृष्ठ इतके बोलके आहे की पाहताच क्षणीच त्याची तारीफ करावी. ३० जून रोजी प्रकाशित झालेल्या या कवितासंग्रहाबद्दल, त्याच्या मुखपृष्ठाबद्दल माहिती करून घेऊ या.
“माती मागतेय पेनकिलर” या संग्रहाच्या मुखपृष्ठावर जमिनीला पडलेल्या भेगांतील मातीतून एक मानवी हात बाहेर आलेला दाखवला आहे, हाताच्या बाजूला कोवळी पाने उगवताना दिसत आहेत , वर पांढऱ्या रंगात ‘माती मागतेय पेनकिलर’ हे शीर्षक आहे.. अतिशय अर्थपूर्ण असलेले हे मुखपृष्ठ कवी सागर जाधव (जोपुळकर) यांनी आपल्या काव्यसंग्रह या कलाकृतीवर घेतले आहे. या मुखपृष्ठातून शेतकऱ्यांच्या जीवनाच्या व्यथा आणि वेदना तर आहेच पण ज्या मातीत हा जगाचा पोशिंदा घाम गाळतो त्या मातीच्याही वेदना यातून दिसून येतात. या वेदनांचा आपण विचार करणार आहोत.
जगाच्या नकाशात ७० टक्के पाणी आणि फक्त तीस टक्के जमिनीचा भूभाग आहे. या तीस टक्क्यातही काही क्षेत्र रहिवास्यांसाठी राखीव आहे, काही क्षेत्र वनसंरक्षण म्हणून सुरक्षित केले आहे तर काही क्षेत्र हे शेतीव्यवसायासाठी वापरले जाते. जगातील काही देश हे शेती व्यवसायाकरीत गणले गेले आहेत त्यात भारत देश अव्वल नंबरचा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात बाराही महिने शेती हा मुख्य व्यवसाय करून जगाला अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. शेतीला पूरक वातावरण, स्वच्छ पाणी, आणि जमिनीचा पोत यावर शेतीव्यवसाय अवलंबून आहे.
साधारणपणे सन १७५० ते १८५० या कालखंडात इंग्लंड यादेशातून औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि पुढे ही क्रांती युरोपीय देशात कार्यान्वित झाली.. जग झपाट्याने कृषीक्षेत्राकडून औद्योगिक क्षेत्राकडे वळाले.. प्रचंड मोढ्या प्रमाणात उद्योगधंद्यांनी हातपाय पसरून शेतीसाठी राखीव असलेली जमीन कवडीमोल किमतीत विकत घेऊन मोठमोठे कारखाने सुरु झाले… त्यामुळे असंख्य मजुरांना रोजगार मिळाला मात्र शेती व्यवसाय डबघाईला येवून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जंगलासासाठी राखीव ठेवलेले वन तोडली जाऊन तेथे कारखाने उभे राहिले. झाडे तोडल्याने पर्जन्यमानावर परिणाम होऊन त्याचा प्रत्यक्ष परिणाम शेतीवर झाला. शेतीमालाचा भाव कमी झाला, निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात आलेली पिके कधी पाण्याखाली गेली तर कधी दुष्काळाने भाजून जळून गेली, कुठे जमिनीला भेगा पडल्या आहेत , शेतीवर कर्ज काढून शेतकरी कर्जबाजारी झाला त्याच्या आयुष्यात दुःख आणि वेदना शिल्लक राहिल्या आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या याचेच प्रतिक म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा हात दाखवला आहे, जणू काही हा शेतकरी इतर शेतकऱ्यांच्या सुखकर आयुष्यासाठी एखादी वेदनाशामक गोळी मागतो आहे, जणू काही शेती व्यवसायाला टिकविण्यासाठी न्यायाची याचना करीत आहे असा गर्भित अर्थ मला जाणवला.
प्रचंड मोठी औद्योगिक क्रांती झाली, कारखानदारी वाढली , या कारखान्यातून प्रक्रिया करून उरलेले लाखो लिटर रसायनयुक्त सांडपाणी बाहेर नदी नाल्यात सोडले जाते, तेच पाणी पुढे मोठमोठ्या धरणात येवून साठून राहते आणि पुढे हेच पाणी शेतीसाठी वापरले जाते. प्रचंड मोठ्या प्रमाणात सांडपाण्यातून मानवी आरोग्याला घातक असलेले रसायनयुक्त पाणी शेतीत वापरले जाते त्यामुळे शेतीच्या मातीवर त्याचा दीर्घ परिणाम होऊन जमिनीचा कस खालावला, शेतीत असणारे पालाश, स्फुरद, नत्र यांचे प्रमाण कमी होऊन जमीन विविध घातक रसायनाच्या विळख्यात सापडली गेली… त्यातच झटपट पिकांना मात्रा लागू व्हाव्यात म्हणून विविध रासायनिक खते, औषधे निर्माण झाली, या खतातून व औषधातून पिकांना वेळेत पोषक तत्वे मिळाली पण त्यामुळे जमिनीचा कसदारपणा जाऊन जमीन नापीक होऊ लागली. अन्नधान्यातून जे मानवी जीवनाला पोषकतत्वे मिळायला पाहिजे ती पोषक तत्वे फक्त पिकांना मिळतात पण मानवी शरीराला त्याचा काहीच फायदा होत नाही आणि मातीलाही त्याचा फायदा होत नाही. मानवी शरीरावर त्याचा घातक परिणाम होत असल्याचे आपल्याला दिसून येते. अनेक विविध आजारांची लागण होऊन जीवित हानी होत आहे. मानवी जीवनाबरोबर शेतीचीदेखील हानी होत आहे त्यामुळे या जमिनीलादेखील वेदना होत आहेत. ज्या प्रमाणे मानवाला आजारी झाल्यावर एखादी वेदनाशामक गोळी दिली जाते तशी जमिनीच्या या वेदना कमी करण्यासाठी काहीतरी ठोस उपाय योजना प्रत्येक स्तरावर राबवाव्यात या अर्थाने ही जमीन जणूकाही हात पुढे करून वेदनाशामक गोळी म्हणजेच पेनकिलर मागत आहे असा अर्थ मला जाणवला.
“माती मागतेय पेनकिलर” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर काही कोवळे पाने मातीचा थर फोडून बाहेर येत असल्याचे दाखवले आहे, याचा अर्थ असा आहे की, निसर्गाने प्रत्येकाला जगण्याचे बळ दिले आहे. जो तो जगण्यासाठी धडपडत असतो, निसर्गातील चल-अचल, सजीव निर्जीव यांना जगण्यासाठी कष्ट करावे लागतात , स्वतःला मातीतून वर आल्याशिवाय सुखाचे किरणे दिसत नाहीत म्हणून कष्ट करून आपले अस्तित्व जपले पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा की , जर या मातीची योग्य प्रकारे निगा राखली, नियमित चांगले पाणी, खाद्य आणि पोषक वातावरण उपलब्ध झाले तर या मातीतून सुपीकता दिसून येईल या गर्भित अर्थाने काही कोवळे पाने मातीचा थर फोडून बाहेर येत असल्याचे दाखवले आहे असे मला वाटते.
“माती मागतेय पेनकिलर” या कवितासंग्रहातून कवी सागर जाधव यांनी शेतीत राबणाऱ्या कष्टकरी वर्गाच्या जीवनशैलीच्या कविता घेतल्या आहेत. स्वतः शेतीत राबून शेतकऱ्याच्या जाणिवा ओळखून त्यांनी या संग्रहाच्या मुखपृष्ठावर सुबक अर्थपूर्ण संदर्भ रेखाटले आहे. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी आपल्या कुंचल्याने या मुखापृठला सजवले असून अथर्व पब्लिकेशन्स या प्रकाशन संस्थेने या कलाकृतीचे प्रकाशन करून साहित्य क्षेत्रात एका नव्या दमाच्या कवीला प्रोत्साहन दिले आहे. वाचक या कलाकृतीचा स्वीकार करतील आणि ही कलाकृती संग्रही ठेवतील अशी आशा आहे.- तूर्तास इतकेच
मुखपृष्ठ परीक्षण
– प्रशांत वाघ
संपर्क- ७७७३९२५०००
कलाकृती परिचय :
कलाकृतीचे नाव : माती मागतेय पेनकिलर
साहित्याचा प्रकार- कविता संग्रह
कवी – सागर जाधव (जोपुळकर)
संपर्क- ९४०४८ ०५०६८
प्रकाशक- अथर्व पब्लिकेशन्स