शिवपुराण मंडपातील तुकडोजी महाराज,संत गाडगे बाबांचे फोटो काढा- रुपराव वाघ
श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे माजी उपसर्वाधिकारी व साहित्यिक रुपराव वाघ यांची मागणी
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने अमरावती जवळील नवनर्मित हनुमान गढीत तथाकथित पंडीत प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण सुरु असुन यामध्ये शिवपुराणाच्या नावाखाली अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम राजाश्रयाच्या खाली होत आहे. महापुरूषांच्या नावाखाली गदी खेचण्यासाठी मंडपाच्या बाहेर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा व जगाला विज्ञानवादी दृष्टिकोन देणाऱ्या भगवान गौतम बुध्दांचे फोटो आयोजकांनी लावले आहे ही महापुरुषांची विटंबना असल्याने महापुरुषांचे फोटो काढुन खुशाल शिवपुराण जनतेला ऐकवा असा आक्षेप अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे माजी उपसर्वाधिकारी व साहित्यिक रुपराव वाघ यांनी घेतला आहे.
देशातील अंधश्रध्देला मुळासकट उखळुन टाकण्यासाठी विज्ञानवादांचा अंगिकार करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बांबा, डॉ पंजाबराव देशमुख यांनी आपली हयात खर्च केली त्याच्यांच जिल्हयात त्यांचेच फोटो मंडपात लावुन विद्यार्थ्यांनी अभ्यास न करता उत्तीर्ण होण्यासाठी सहद लावुन बेलपत्र शंकराच्या पिंडेवर चिपकवायला सांगुन उलटी गंगा अवतीर्ण करु पहाणाऱ्या कथावाचक प्रदिप मिश्रावंर “महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी सुध्दा रुपराव वाघ यांनी केली आहे. महाराष्ट्रात निवडणुकींच्या तोंडावर प्रतिगामी शक्ती कार्यरत असुन मोठया संख्येत खास करुन महीलांना यामध्ये गुंतविण्यात आले आहे. दहावि व बारावीच्या परीक्षा तोंडावर असतांना शिवपुराणाच्या नावाखाली असली फालतुगिरी चुकीची असुन पुरोगामी लोकांनी याचा निषेध करायला पाहीजे.
अंध दुबळा भाविकपणा । तो कधीहि न रुचे माझ्या मना।
संतदेवाची निष्क्रिय गर्जना ।। करील तो आस्तिक नव्हे ।।
अंध श्रध्देस आणोनि पूर । लोकी रुजविती मिथ्याचार ।
आकुंचित मते शिकविती रोगट । समाजासि ।।
अशी शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत दिली त्याच भुमित स्वार्थासाठी अशी कथावाचक आणुन लोकांना निष्क्रीय करण्याचे मनसुबे कुणी रचत असेल तर त्याचा निषेध नोंदवायला पाहीजे ज्यांना तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, भगवान गौतम बुध्द, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची गंगा अवतीर्ण करणारे डॉ पंजाबराव देशमुख यांचे विचार कळले नसेल असेच लोक यात जातील असे रुपराव वाघ यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.