अशी घ्या गरोदरपणात काळजी
कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचे मुख्य कारण गरोदर स्त्रियांनी गरोदरपण आणि प्रसुतीनंतर योग्य ती काळजी घेतलेली नसणे तसेच जन्माअगोदर आणि जन्मानंतर बालकाचे स्वास्थ्य चांगले असण्यासाठी गरोदर मातेने आपल्या बाळाची काळजी गरोदर असल्यापासून घेणे आवश्यक असते. बाळाचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी गरोदर मातेने गरोदरपणात काळजी घेणे आवश्यक आहे.
गरोदरपणातील काळजी
बाळ सुदृढपणे जन्माला येण्याकरिता गरोदर स्त्रियांनी गरोदरपणातच काळजी घ्यावी. गरोदर मातेने गरोदरपणात तीन महिन्यांत आपली नोंदणी जवळच्या सरकारी रुग्णालयात (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) येथे करुन घेणे आवश्यक आहे. गरोदर मातेने गरोदरपणात दोन टीटीचे इंजेक्शन, लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे. तसेच गरोदरपणात दोन सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. पहिली सोनोग्राफी 16 ते 18 आठवड्यात बाळामध्ये काही व्यंगत्व तपासण्यासाठी असते. व्यंग असल्यास किंवा अपंग मुल जन्माला येऊ नये म्हणून गर्भपात करणे आवश्यक आहे. गर्भपात नियमानुसार (एमटीपी ॲक्ट) 20 आठवडे म्हणजे पाच महिन्यांच्या आत गर्भपाताची परवानगी आहे. या नियमानुसार अशा परिस्थितीत गर्भपात करता येईल. दुसरी सोनोग्राफी आठ ते नवव्या महिन्यात करणे गरजेचे आहे. या सोनोग्राफीमध्ये बाळंतपण किंवा प्रसुती सामान्य होईल किंवा शस्त्रक्रिया करावी लागणार याचे नियोजन करता येते. त्यासाठी दुसरी सोनोग्राफी करणे गरजेचे आहे.
प्रत्येक मातेने आपले हिमोग्लोबीन दर तीन महिन्यांनी तपासणे आवश्यक आहे. हिमोग्लोबीन हे नेहमीकरिता 11 ग्रॅमच्यावर असणे गरजेचे असते. लघवीमध्ये प्रोटीन अल्बोमीन बघण्याकरिता लघवीची तपासणी करून अल्बोमीन लघवीमध्ये आहे का हे तपासून घेणे गरजेचे असते. लघवीमध्ये अल्बोमीनचे प्रमाण जास्त असल्यास गरोदरमातेच्या पायावर, अंगावर सूज येण्याची शक्यता असते. प्रत्येक मातेने आपले रक्तदाब तपासून घ्यावे, रक्तदाब 120/80 असावा. प्रत्येक मातेने बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवावे. बाळाची हालचाल 18 आठवड्यानंतर मातेला माहिती पडते, तरी मातेने पाच महिन्यानंतर बाळाची हालचाल बघावी. जर बाळाची हालचाल होत नसल्यास गर्भाशयातच बाळ मृत होण्याची शक्यता असते. अशी स्थिती उद्भवल्यास तत्काळ जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्याना दाखवावे किंवा सोनोग्राफी करुन घ्यावी. गरोदरपणात तीन ते पाचवेळा तपासणी करावी. पहिली तपासणी तिसऱ्या महिन्यात, दुसरी तपासणी 18-20 आठवड्यात तिसरी तपासणी सातव्या ते आठव्या महिन्यात आणि पुढे दर महिन्यांनी किंवा 15 दिवसांनी करावी.
गरोदरपणात मातेचा आहार
गरोदरपणात मातेचे वजन 8 ते 12 किलोग्रॅमने वाढलेले असावे, यासाठी प्रत्येक मातेने आपल्या वजनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गरोदरपणात प्रत्येक मातेला 400 किलोग्रॅम कॅलरी आहार जास्त घेणे गरजेचे आहे. प्रथिने 23 ग्रॅम जास्तीचे घेणे आवश्यक आहे. प्रथिने हे तुरीची दाळ, दुध, अंडी व मोड आलेली धान्ये यामध्ये जास्त असते. यासाठी मातेने हे प्रमाण जेवणामध्ये घेणे गरजेचे आहे.
पहिल्या चार महिन्यात आणि शेवटच्या आठव्या महिन्यानंतर मातेने वजन उचलणे व वाकण्याचे काम करु नये. यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. तसेच पूर्ण दिवस होण्यापूर्वी प्रसुती होण्याची शक्यता असते. परिणामी बाळाचे फुफ्फुस परिपक्व होत नाही. सुखरुप प्रसुतीसाठी जवळच्या रुग्णालयात प्रसुती करावी. प्रसुतीनंतर बाळ 1 ते 5 मिनिटात रडणे जरुरीचे आहे. बाळ जर तत्काळ रडले तर मेंदू आणि शरीराची वाढ योग्य प्रमाणात होते. बाळंतपणानंतर 30 मिनिटांनी बाळाला दूध द्यावे. बाळाला दोन ते तीन तासाने मातेचे दूध देण्यात यावे. पहिल्या सहा महिन्यात रोज 730 मिली दूध मातेकडून बाळाला मिळते. पहिल्या 24 तासात इंजेक्शन व्हिटॅमिन के, बीसीजी, हिपॅटाइझीस बी, पोलिओ याप्रकारे इंजेक्शन आणि लसी मातेने आपल्या बाळास नर्स किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगून देण्यासाठी बाध्य करावे.
सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचे दूध द्यावे. बाळाला पाणी देवू नये सात ते अकरा महिन्यापर्यंत बाळाला पातळ द्रव्य द्यावे. बाराव्या महिन्यापासून बाळाला पूर्ण आहार देता येतो. प्रथम 48 तासात कॉपर टी लावून घेतल्यास पाळणा लांबतो. माता आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते. मातेचा मृत्यूदर कमी होतो. बाळ कुपोषित होत नाही. त्यामुळे बालमृत्यू दर कमी होईल. यासाठी समाजातील नागरीकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरोदर मातेला प्रवृत्त करावे.
कुपोषित बालके जन्माला येणार नाहीत, तसेच बाळ सुदृढ राहिल, नातेवाईकांनीही त्यावर योग्य लक्ष ठेवावे, गरोदर स्त्रियांनी गरोदरपण आणि प्रसुतीनंतर वरीलप्रमाणे काळजी घ्यावी.
– डॉ. टी. जी. धोटे,
जिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ.
(सौजन्य – महान्युज)