आठवणींच्या हिंदोळ्यावर उभ्या आयुष्यात येणार्या अडचणींना रौंदत जाणारा ‘पाय आणि वाटा’
Contents hide
५ मार्च २०२३ रोजी माझ्या हेलपाटा कादंबरीच्या प्रकाशनासाठी इंगळी, हातकणंगले येथे गेलो असताना श्री. मारुती जाधव सरांच्या बुक स्टाॅलवर काही पुस्तकं दिसली. पहाताक्षणीच माझी नजर “पाय आणि वाटा” या पुस्तकावर गेली. अन्वर हुसेन यांनी रेखाटलेले पुस्तकाचं मुखपृष्ठच एवढे बोलके वाटले की ते पुस्तक घेतल्यावाचून मला स्टाॅल सोडावा वाटेना.
नुकताच श्री. सचिन पाटील सरांचा ललितसंग्रह “पाय आणि वाटा” वाचण्यात आला. सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठावर आपल्या गुरांढोरांबरोबर खळखळ वाहणार्या नदीप्रमाणे बेफान होऊन बालपण घालवलेल्या लेखक सचिन पाटील यांचं बालपण वाचकाला आपल्याही आठवणींच्या शिवारात घेऊन जातं. लहान वयात गावातील मातीच्या गुराढोरांमागच्या आठवणी, बालमित्रांसोबत केलेल्या गंमती-जमती, तक्क्याच्या बैलगाडीतून केलेला प्रवास वाचकाच्या मनाला हळूवार स्पर्श करून जातो.
रानावनात जनावरांना चारा आणायला गेल्यावर एका अवघड वळणावर बैलगाडी उलटते अन् अपघातात दोन्ही पाय निकामी होतात. कमरेखालचा भाग लुळापांगळा होतो. हा प्रसंग वाचताना वाचकाच्या काळजाला असंख्य इंगळ्या डसतात. एवढा त्रास सहन करून जीवन जगण्याची लेखकाची धडपड वाचकाला नवीन उमेद देवून जाते. अर्धे शरीर निकामी झाले असताना लेखकाची जगण्याची जिद्द वाचकाला अंतर्मुख करून जाते.
लेखक मनोगतात म्हणतो, ‘सहा वर्षानंतर मी वाॅकरच्या साहाय्याने घराबाहेर पाऊल टाकले. खरंतर हा माझा दुसरा जन्मच होता. हे वाचल्यावर वाटलं, अशा परिस्थितीत मागील वीस- पंचवीस वर्षांतील आठवणींनी एखादा व्यक्ती ठार वेडा झाला असता. परंतु या महाभयंकर प्रसंगातून स्वत:ला सावरत लेखक एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे जीवन जगण्याची उमेद घेऊन आपल्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न ‘निराशावादी’ लोकांना जीवन जगायची नवीन उभारी देणारा आहे. मनोगत वाचताना डोळ्यांच्या पापण्या नकळत ओल्या होतात.
मामाचा गाव म्हणजे ‘कडक’ उन्हातली सावली. या वाक्यातून प्रत्येकाला आपले आजोळ, आजी, आज्जा, मामा, मामी, मामाचं-आजीचं ओतप्रोत प्रेम व प्रेमानं भरलेल्या सुकुमार एकत्र कुटुंबाची गोड आठवण करून देतो. शाळेतील जुन्या आठवणींनी लेखकाच्या डोळ्यात पाणी येते तसेच ज्या वाचकांना आपल्या घरच्या परिस्थितीमुळं किंवा अन्य काही कारणांमुळे शाळा सोडावी लागली त्या दिवसांची आठवण होऊन वाचकही आपल्या शाळेच्या गोड आठवणीत स्वत:ला घेऊन जातो. ऐन तारुण्यात हातातून निसटलेले ते… गुलाबी, सोनेरी दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असतात तारुण्य सुलभ भावनांची आठवण लेखकानं करून दिल्यानं मन असलेला माणूस हळवा झाल्याशिवाय राहत नाही.
लेखक शेतकरी कुटुंबातले असल्यांन, जनावरं,जिञापं, त्यांच्या पाठीमागुन रानामाळातुन हिंडताना वीस वर्षात अनेक संवेदना गोळा केल्या .कधी खट्ट माळरान, कधी गवताळ पाऊलवाटा ,कधी चटचट पोळणारा तापलेला डांबरी रस्ता, कधी डोंगरदर्यातली खडकं ,कधी गुडघ्याएवढ्या पातळबिर्रर्र चिखल, कधी पायात मोडलेला ‘ बाभळीचा ‘ अणकुचीदार काटा . पाय असताना अशा चाललेल्या अनेक …… आडवाटा- पायवाटा आठवून लेखकाच्या लेखणीला धार प्राप्त झाली आहे असे वाटते …!
कुणीतरी म्हटलय, बालपण हे धनुष्यातुन सुटलेल्या बाणासारखं आहे, ते कधीच परत येत नाही! हे जरी खरं असलं तरी बालपणीच्या त्या आठवणींचे ठसे मनावर कायम उमटलेले असतात. तहहयात ते जिवंत ताजे टवटवीत राहतात. “पाय आणि वाटा” मधील राखण, करड्याची भाजी, ती बैलगाडी, पाठीराखा, स्पर्श एक संवेदना, घोडी, पोष्टाचं पत्र, झुकुझुकु आगीनगाडी, कोरडे डोळे, झाड आणि वाट, चिमणीचं पिल्लु, खरं प्रेम, बदललेलं गाव, पतंगाचे दिवस, पाय आणि वाटा हे सर्व लेख अस्सल ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन घडविणारे व वाचकांना गावात फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाणारे साक्षिदार आहेत.
यापूर्वी सचिन पाटील यांच्या ‘सांगावा’, ‘अवकाळी विळखा’, ‘गावठी गिच्चा’ हे तीन दर्जेदार कथासंग्रह असून त्यांना व त्यांच्या साहित्यकृतींना अनेक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. ही त्यांच्या उत्कृष्ट साहित्याची पावती आहे. त्यांच्या “अवकाळी विळखा” कथासंग्रहातील ‘कष्टाची भाकरी’ ही कथा अनेक नामवंत विद्यापीठांत अभ्यासक्रमातही समाविष्ट आहे. हा त्यांच्या साहित्याचा मोठा गौरव आहे. त्यांच्या “पाय आणि वाटा” या ललितलेख संग्रहास यावर्षी अनेक साहित्यसंस्थांचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले आहेत व अजूनही मिळत राहतील. त्या योग्यतेचे पुस्तक असून अतिशय सुंदर मांडणी व आशयसंपन्न पुस्तक आहे “पाय आणी वाटा ” नक्की वाचा..!
श्री. सचिन वसंत पाटील यांच्या पुढील साहित्यिक कार्यास माझ्या आभाळभर शुभेच्छा!
ललितगद्य: पाय आणि वाटा
लेखक: सचिन वसंत पाटील
पृष्ठे: १०१, मूल्य: १५० रुपये
प्रकाशन: हर्मिस प्रकाशन पुणे
***
समिक्षण: तानाजी धरणे
(लेखक कादंबरी: हेलपाटा)
मोबा. 9975370912