गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी) : माहितीचा अधिकार अधिनियम-2005 कायद्याची व्यापक जनजागृती होण्यासाठी माहिती अधिकार सप्ताहांतर्गत राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठाच्या वतीने सोमवारी, 9 ऑक्टोबरला सकाळी 10.45 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षीय भाषण करणार आहेत. तसेच माहिती अधिकार कायद्याचे राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र पांडे प्रमुख वक्ता म्हणून कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कायद्याची अंमलबजावणी देशभरात दि. 12 ऑक्टोबर 2005 पासून करण्यात आली आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रशासनामध्ये पारदर्शकता व जनतेप्रती उत्तरदयित्व निर्माण होण्यास हातभार लागत आहे. तसेच प्रशासन व्यवस्था अधिक लोकभिमुख होण्यास मदत होत आहे. शासन व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने दरवर्षी दि. 06 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत ‘माहिती अधिकार सप्ताह’ साजरा करण्याचे निर्देश केंद्र शासनाने सर्व राज्यांना दिले आहेत. त्यानुसार या सप्ताहात राज्यात सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास जनमाहिती अधिकारी, अपीलीय अधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठाचे उप सचिव देविसिंग डाबेराव यांनी केले आहे