सोयरीक…
सकाळी सकाळी फोन वाजला ,तिकडून मित्र बोलत होता .आर उठला का नाय भो ! म्हणलं उठलोय रे!! तिकडून तो बोलला मग आवर लवकर जरा आमच्या पप्याला पोर बघायला जायचंय, आन लै बोभाटा करू नको भो ! लगीच गावात . लोकांना समाजल तर काड्या सुरू व्हत्यात. एक तर कोणी पोर दावत नाय. आलंय इकडून तिकडून तर नाट नको. बर त्य जाऊ दे! म्या आलोच आर तू बोलबच्चन हाय तव्हा तिकडं पावहण्याना समजून सांगशील तव्हा म्हणलं तुला घेऊन जावं.
माझी आंघोळ होई पर्यत दारात बोलेरो हजर जोरात हॉर्न ” का वाजातोय म्हणून म्हतारी बाहेर आली, का भोंगा वाजीता र …सकाळ सकाळी ,! घरात येऊन बोलता येत नाय का ? आन कोण हाय .तिकडून मित्र मारुती उतरला , आता माझ आजोळ ही गावा तल असल्या मुळे आमच्या म्हतारी ला सगळे आत्या ” म्हणत असल्या मुळे मारुती गाडीतून उतरत म्हणाला ,आत्या आग का मोठ्या ने धावती” एक तर तुह्या आवाज मोठा साऱ्या गावाला ऐकू जाईल की, ! म्हतारी आणखी चिडली, एवढं समजत व्हतं तर कश्या पायी माह्य दारा पुढं भोंगा वाजीत . मारुती हसला तुह्या बरोबर वाद घालायला येळ नाय. ममई कर कुड हाय ते सांग,
“का त्याच्या पशी काय काम हाय तुहय”
“नको येऊ म्हण कोणत्या गाडीत बसू तुला जे इचारल त्य” सांग ना आत्या ! का मोकार दळाण दळीती उगाच! अस म्हणत मारुती थेट घरात आला.घरात येता येता म्हतारी ला बोलला च्या ठु ! लवकर ,आम्हला जायचं हाय लवकर.
“मी आतल्या घरात कपडे बदलत होतो, मारुती जवळ येऊन बोलला .आर पोर” पप्या ला बघायची तू का इतका नटतो,? मी म्हंटल आर कपडे पण घालू नको का ? इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा होईस्तोवर चहा आला आणि चहा घेऊन आम्ही निघालो.
मी पुढच्या सिटवर माझ्या बाजूला मारुती गाडी चालवत होता. आणि पप्या मागच्या सीटवर बसला होता.गाडीत , आम्हीं तिघेच होतो. मी बोललो तीन तिघडा आणि काम बिघाडा होईल .कोणाला तरी अजून घ्या.अस म्हणताच भगवान चेरमन समोरून मोटारसायकल वर दिसला त्याला आवाज दिला . मारुतीला म्हटलं गाडी थांबव. त्याने गाडी बाजूला घेतली.भगवान कडे पहात मी म्हटलं , गाडी लाव सावलीला ,आणि बस गाडीत .तो बोलला भोकाडी( बायको) बोंबा मारत बसल भो! गायांना पाणी चारा , आज माह्याव बारी हाय. बस तर खर !मी बोललो पारनेर वरून तर यायचं… अस म्हणताच तो त्याची गाडी बाजूला लावून आमच्या गाडीत बसला.
मारुती मोठा विचित्र होता त्याने मुद्दाम गाडीत गाणं लावलं
“वय झाल्याव सोय नाय ग बायी”
“लवकर लगीन करून घे बायी”
आता मात्र पप्या चिडला तुला दुसर गाणं लावता येत का नाय ? नाय तर मी येत नाय .मारुती काय बोलून देणार होता का ? तो बोलला फिरू का गाडी माघ सांग ! अस बोल्यावर पप्या एकदम गप्प..
गाडी सुसाट निघाली होती. ,इतक्यात मारुतीच्या फोनवर कुणाचा तरी फोन आला., गाडीचा वेग कमी करत तो बोलू लागला, व्हय “व्हय “बारा कश्याला आहो आम्ही अकरा च्या अगुदर हजर व्हतो मंग तर बास ना! अस बोलून त्याने फोन ठेवला.इकडं पप्या ची धाकधूक वाढली होती, कारण दोन तीन सोयरिकी मोडल्या मुळ त्याला काय भरवसा वाटत नव्हता.
अगदी अकरा च्या अगोदर आम्ही इच्छित स्थळी पोहचलो पूर्वी सारखी मुलीच्या घरचे आता जास्त पुढं पुढं करत नव्हते. आम्ही गाडीतून उतरलो तरी कोणी घरा बाहेर येईना मग तर पप्या चा चेहरा पार उतरला होता, चेरमन पाप्या कडे पहात म्हणाला नको लोड घेऊ! , इतक्यात गळ्यात मफलर डोक्यावर टोपी आणि नेहरू पायजमा घातलेला पाहुणा बाहेर आला . आम्हला पाहताच त्याने आवाज दिला पाव्हन आल्यात र ! पढीत बसाया टाका आन पाणी आणा.
आम्ही पढवित बसलो ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या .अजून दोन मंडळी आली. त्यातील एक जण बोलला राधुच्या” पोरीला लै सोयरिकी येत्यात. पण म्हणलं त्यो बी शेतीत कष्ट करतोय आन पोरिला शेतकऱ्याला द्यायची नाय अस ठरलं व्हतं.पण आता तुमचा पोरगा सुप्या ला जातोय कामाला ,घरी दूध धंदा बी हाय, आन शेती बी हाय तव्हा मीच त्याला बोललो लाव डोकं म्हणून त्यो तयार झालाय नाय तर त्यो नायच म्हणत व्हता, पण म्या भरी घातलं.
मी म्हटलं आहो सरकारी नोकरी असलं तर ठीक नाय तर पुण्या ,मुंबई ची लै वेगळी तर्हा आहे .आहो मी मुंबईत राहतोय , जिंदगी जाती पण घर होत नाही, जरी घेतलं तर जिंदगी भर कर्ज फेडत बसा ,बर घर तरी किती कोंबड्या च्या खुरड्या सारख, पुढं पोर बाळ झाल्यावर शिक्षण सगळा खर्च काही उरत नाही त्या पेक्ष्या आता गावचा पोरगा सरस आहे. तिकडून तो पाव्हना बोलला त्य बी खरच हाय म्हणा.
तोवर मी मुलाची ओळख करून दिली , पप्या थोडा मागे बसला होता . इतक्यात एक नथ घातलेली म्हतारी घरातून बाहेर आली आणि आमच्या कडे पाहू लागली मी आणि चेरमन पुढं होतो, तिचा चेहरा जरा पडला मी ओळखलं म्हटलं पप्पू पुढे येऊन बस जरा, तो उठला .म्हटलं मावशी हा मुलगा आहे बर का ?
म्हटलं बोलवा मुलीला ,व्हय व्हय म्हणत तिथं बसलेल्या कुणी तरी आवाज दिला ताब्या भरून आन म्हणावं पोरीला आन पाट भी आणा कोणीतरी , बर कोण इचारणार हाय बसा बर मोर्ह चेरमन ला म्हटलं बस तू ,तो बोलला नको तू बस मारुती ही बोलला तुच बस मग मी बसलो ,समोर पाट ठेवला इतक्यात त्यातील एक जण बोलला अस नग राकीस मोहरी नको ! पाट फिरवा.
मुलगी ही न लाजता पाणी घेऊन आली. तीने ही हा कार्यक्रम बऱ्याच वेळा केला असल्या मुळे तिच्या ही अंगवळणी पडलं असाव त्या मूळ ति काय लाजली नव्हती. समोर येऊन मुलगी बसताच तिथं असणारा एक जण बोलला इचरा काय इचरायच ते समदी शेती काम, स्वयपाक,यतोय साळा बी झाली . समोर असलेल्या ताटात मी खडी सारख हळद कुंकू आणि पीस ठेवला ,नारळ ही ठेवला. तिला हळद कुंकू लावलं आणि काही प्रश्न विचारले तिने ही अगदी न अडखळता उत्तर दिलं तिच्या कडे पहात पप्या कड बोट दाखवत बोललो हा मुलगा आहे पाहून घे, आणि त्याला ही म्हटलं ही मुलगी नीट पाहून घे,! पप्या कमी पण ती मात्र त्याला बारीक पहात होती.
मी खिशात हात घातला ,तेवढ्यात मुली कडील एक जण बोलला काय महागाई वाढली ब्या शम्बरात तर काही व्हतं नाही. तो अस बोलताच मी दोनशे ची नोट काढलेली पाकिट मध्ये ठेवली आणि पाचशे ची ताटात टाकली. सगळ्या च्या पाया पडून मुलगी निघून गेली. भगवान गालातल्या गालात माझ्याकडे पाहून हसत होता.
चहा आणि पोहे घेऊन पुन्हा मुलगी आली आम्ही गप्पा मारत तेवढे फस्त केले आणि निघालो , बर पूर्वी निघताना मुलांच्या लोकांना विचारलं जायचं कळवा पण इथं उलट ऐकू आला ,मुली कडीलं पाव्हने बोललो कळवतो बर का
दोन तीन दिवसात……
-अशोक पवार
8369117148