सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश !
* ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
* राजुरा तालुक्यात प्रत्यक्ष पाहणीनंतर तातडीने दिले होते स्थानिक यंत्रणेला कार्यवाहीचे निर्देश
चंद्रपूर, : अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या, आणि सतत अनिश्चिततेच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावाने त्रस्त केले; या शेतकऱ्यांच्या मदतीला राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार धावून आले.
ना. मुनगंटीवार यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा प्रत्यक्ष शेतावर भेटू देवून जाणून घेतली: या बाबताची वस्तुस्थिती मा. मुख्यमंत्री, मा. कृषिमंत्री यांना अवगत करून, विशेष पॅकेज जाहीर करण्याची विनंती केली. तसेच राज्याचे मा. कृषिमंत्री व कृषीसचिवांना राज्यातील इतर जिल्ह्यातही अशाप्रकारे नुकसान झाले असल्यास त्या बाबत स्वतः लक्ष देवून आढावा घेण्याबाबत विनंती केली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलीत म्हणून शासनाने आता राज्यातील सोयाबीनच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारचे मदत व पुनर्वसन विभागाचे आदेश सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी निर्गमित झाले आहेत.
या शासन निर्णयामुळे चंद्रपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.