‘इतकंच’ : स्री जीवनाच्या अंतर्मनाचा घेतलेला ठाव
हल्ली समाज माध्यमांवर जगाच्या कान्याकोपऱ्यातून माहितीचा खजाना मिळत असतो, त्यातल्या त्यात मराठी साहित्याला विशेष असा बहर आलेला दिसत आहे. साहित्य कलाकृती कशी असावी, तिचे मुखपृष्ठ कसे असावे याबाबत प्रत्येक साहित्यिक विचार करत असतो. असेच एक मुखपृष्ठ मला अपरिचित असलेल्या कवयित्री लता चव्हाण, सातारा यांच्या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर बाराखडीतील फक्त चारच व्यंजने “इतकंच” असे लिहलेले शीर्षक असलेल्या कलाकृतीचे नुकतेच प्रकाशन झाल्याचे समाजमाध्यमावर वाचनात आले.
“इतकंच” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर अग्रभागी एका स्रीचा चेहरा दाखवला आहे, डोळे बंद केलेले आहे, केसांचा अंबाडा घातला आहे, पलीकडे एक पुरुष घराच्या दिशेने जाताना दाखवला आहे, स्रीच्या पाठीमागे झाडाची दोन पाने गळताना दिसत आहेत तर शेजारी एका झाडाच्या पानावर पाण्याचे दोन तीन थेंब तरळतांना दाखवले आहेत. दूरवर डोंगररांगा दिसत आहे, तेथून उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या धबधब्यात बुडाली आहे तरीही चेहरा हसरा दाखवला आहे. आणि शीर्षकात फक्त चार व्यंजने “इतकंच” लिहले आहे… असं अर्थपूर्ण मुखपृष्ठ पाहायला मिळाले.
अतिशय अर्थपूर्ण अशा या मुखपृष्ठाला न्याहाळताना यातून कवयित्रीने स्री जीवनाचे अनेक संदर्भ यातून दाखवून दिल्याचे जाणवले आहे. कवयित्री स्री जीवनाकडे पाहताना तिच्या भाव भावनांचा अंतर्मनातून विचार करून स्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊ पहात आहे. यातील प्रत्येक संदर्भाचा आपण येथे परामर्श करणार आहोत… काय आहे या मुखपृष्ठावर .. यातून काय निष्कर्ष काढू शकतो, हे मुखपृष्ठ असेच का दाखवले असेल. यातून अनेक प्रश्नांचा उलगडा करणार आहोत. कदाचित कवयित्री आणि मुखपृष्ठचित्रकार यांच्या विचारांची नाळ जुळली असल्याने इतके अर्थपूर्ण मुखपृष्ठ या कलाकृतीसाठी सजवले गेले असावे असे मला वाटते..
“इतकंच” या मुखपृष्ठावर एका स्रीला केंद्रबिंदू केले आहे यातून असा अर्थ निघतो की, स्री शिक्षणाच्या आद्यप्रवर्तक, महिलांना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्राबाई फुले यांनी स्रीला शिक्षण मिळावे यासाठी जातीपातीची भिंत पाडून समाजव्यवस्थेविरुद्ध लढा देवून, प्रसंगी शेणामातीचा मार खावून जातीव्यवस्थेची श्रुंखला तोडून शिक्षणाची गंगा आपल्या पायाजवळ आणली. एक स्री शिकली की संपूर्ण पिढी शिक्षित होत असते. म्हणून समस्त स्रीवर्गाला “इतकंच” सांगणं आहे की या आदर्शांच्या विचारांचे आचरण करून समाजातील स्री शिक्षण आणि कुटुंब शिक्षणावर भर देवून तळागाळातील महिला वर्गाला ज्या अजूनही कर्मकांड आणि अंधश्रद्धेत गुरफटून पडल्या आहेत त्यांना बाहेर काढा “इतकंच” मागणं केलं आहे.
“इतकंच” या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एक पुरुष घराच्या दिशेने जातांना दाखवला आहे – याचा अर्थ असा की, स्री ही आता स्वयंसिद्ध झाली आहे, पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना काही क्षेत्रात पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात समाजात काम करतांना दिसून येत आहे , थोडक्यात तिला असे म्हणायचे आहे की, पुरुषांची मक्तेगिरी काही प्रमाणात मोडीस काढली आहे, म्हणून पुरुषाने स्रीला स्वातंत्र्य देवून एक खंबीर साथ सोबत केली पाहिजे, आपणही थोडसं मागे राहून स्रीला पुढे आणले पाहिजे हा अर्थ मला इथे अभिप्रेत होतोय आणि खरे आहे, आजही समाजात हा शिक्षणाने झालेला बदल आता आपल्याला दिसून येत आहे. म्हणून कवयित्रीला इथे “इतकंच” यातून सुचवायचे असेल की महिलांनी आता शिक्षित झाले पाहिजे, जगाच्या पुढे आले पाहिजे.
“इतकंच” या मुखपृष्ठावरच्या स्रीची प्रतिमा डोळे बंद करून हसरी दाखवली आहे.. ही स्री कुटुंबातीलच नव्हे तर समाजातील कुणाची आई पत्नी, बहिण, तर कुणाची मुलगी यांचं प्रतिनिधित्व करणारी रेखाटली आहे. तिच्या अंगी असलेला सोशिकपणा, नम्रपणा, तिच्यात असलेली सहनशीलता, शालीनता या मुखपृष्ठावर अधोरेखित केली आहे. स्रीच्या अंगी असलेली ती शालीनता, ती नम्रता व्यक्त करण्यासाठी या मुखपृष्ठावरील स्रीचे डोळे बंद दाखवले आहेत असे मला वाटते. यातून कवयित्री एकच संदेश देते की – जर जीवनात सुखी रहायचे असेल तर “इतकंच” कर की ही शालीनता, ही नम्रता कायम जपून ठेव हा अर्थ मला इथे अभिप्रेत होतो.
झाडाचे पान पिकले की ते गळणारच असते, आयुष्य माणसाचं देखील असेच क्षणभंगुर असते. कधी हातातला क्षण निसटून जाईल सांगता येत नाही. पहाटे तृणपात्यावर पडणारे दवबिंदू मोत्यासारखे चमकून दिसतात मात्र ऊन पडल्यावर सुकून जातात “इतकंच” त्याचं आयुष्य असते पण क्षणभर का होईना पाण्याचे दोन थेंब तृणपात्याला मोत्यांचा हार घालत असतात आणि हेच सूचित करण्यासाठी मुखपृष्ठावर एका झाडाच्या पानावर पाण्याचे थेंब तरळतांना दाखवले असावे. जोवर आहोत तोवर या दोन थेंबाप्रमाणे माणसानं आयुष्यात “इतकंच” करावं की इतरांच्या मनाच्या पानावर मोत्यासारखं चमकून रहावं आणि याच अर्थाने मुखपृष्ठावरील स्रीच्या खांद्याजवळ पानावर पाण्याचे थेंब दाखवले आहे हा अर्थ मला इथे अभिप्रेत होतो.
“इतकंच” या मुखपृष्ठाला सागरनाथ गायकवाड यांनी अतिशय कल्पकतेने आपल्या कुंचल्याने सजवून साहित्य जगात एक ओळख करून दिली आहे.. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पावनभूमीचा स्पर्श झालेल्या समीक्षा पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने या कलाकृतीला प्रकाशित करून खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवर नेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कवयित्री लता चव्हाण यांच्या “इतकंच” या कलाकृतीचे वाचक नक्कीच स्वागत करतील यात शंकाच नाही… त्यांना पुढील कलाकृती निर्मितीसाठी हार्दिक शुभेच्छा…
मुखपृष्ठ परीक्षण-
प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – ७७७३९२५००० (तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)
काव्यकलाकृतीचे नाव – “इतकंच”
कवयित्री – लता चव्हाण, सातारा
प्रकाशन – समीक्षा पब्लिकेशन
मुखपृष्ठचित्रकार – सागरनाथ गायकवाड