“सावित्री-फातिमा वेध भविष्याचा अभियान”
‘वेध भविष्याचा’ विद्यार्थी आणि पालकांकरिता करिअर मार्गदर्शन मेळावा 26 व 27 ऑक्टोबर रोजी
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी) : आमदार तथा दिव्यांग कल्याण विभाग, ‘दिव्यांगांच्या दारी अभियाना ‘चे राज्य अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून चांदुरबाजार व अचलपूर तालुक्यातील विद्यार्थीं तसेच पालकांसाठी ‘वेध भविष्याचा’ करिअर मार्गदर्शन मेळावा 26 व 27 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे .
विद्यार्थी जीवनात करीअर मार्गदर्शन प्राप्त होणे महत्त्वाचे आहे. या बाबीचा विचार करुन इयत्ता सहावी ते बारावी विद्यार्थी तसेच पालक यांच्यासाठी वेध भविष्याचा या करीअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन उद्या, गुरुवार दि. 26 ऑक्टोबर रोजी चांदूरबाजार येथे तर शुक्रवार, दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी अचलपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.
चांदूरबाजार येथील संत श्री गुलाबराव महाराज भक्तीधाम सभागृह, बोराळा रोड येथे गुरुवार, दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तसेच दुपारी 1 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बालमुकुंद राठी विद्यालय, शिरसगाव कसबा, ता. चांदूरबाजार येथे करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
अचलपूर येथील जगदंबा विद्यालय गांधी पुल येथे शुक्रवार, दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तसेच दुपारी 1 ते दुपारी 4 वाजेपर्यंत फातिमा कॉन्व्हेन्ट, अमरावती रोड, परतवाडा येथे या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या युगात नवनवीन करिअरच्या वाटा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना माहिती होण्यासाठी हे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. पाल्य तसेच पालकांमध्ये रोजगाराच्या विविध संधीविषयी जागृकता निर्माण व्हावी, या मार्गदशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी कळविले आहे. जास्तीत-जास्त संख्येने विद्यार्थी तसेच पालकांनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बुद्धभूषण सोनेने यांनी केले आहे.