साने गुरुजींचा वारसदार म्हणजे हेरंब कुलकर्णी सर..!
शिवम प्रतिष्ठानच्या वतीने घारेवाडी (कराड) याठिकाणी शिक्षण हृदय संमेलन आयोजित करण्यात आलेले होते.यामध्ये आम्ही दोघेही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो.
या आधी बऱ्याचवेळा आमचा भेटीचा योग यायचा पण आमच्या दोघांच्याही वेळा व्यस्त असल्यामुळे भेट व्हायची नाही.आणि मनाला सतत रुखरुख लागून राहायची.
ही रुखरुख संपली.आणि आमची भेट झाली.अत्यंत साधेपणा.बोलण्यात निखळपणा,तसे पाहिले तर त्यांच्यात आणि माझ्या वयात खूप लांबचा फरक.पण त्यांनी तो अजिबात जाणवू दिला नाही.त्यांचे पाय धरण्यासाठी मी झुकलो तेव्हा त्यांनी अलगद मला त्यांच्या मिठीत घेत म्हणाले “अरे नितीन आपण मित्र आहोत रे…” तेव्हाच मला साने गुरुजी भेटल्यासारखे वाटले.
अतिशय नम्रपणे आणि खूप जुनी मैत्री असल्यासारखी आमचा संवाद झाला.दिलखुलासपणे हा माणूस व्यक्त होत राहिला.इतकेच काय रात्री आम्ही एकत्र मुक्काम केला.सकाळी मला त्यांनी अर्ध्या रस्त्यात सोडले.गाडीतून उतरून माझ्यासोबत उभे राहिले.तिथे आम्ही चहा घेतला.आणि मला एस. टी.मध्ये बसवून त्यांनी निरोप घेतला.
हेरंब कुलकर्णी सर म्हणजे खरा माणूस.साने गुरुजींचे विचार इथल्या शिक्षक वर्गात पेरायचे ध्येय ठेवून आपले काम प्रामाणिकपणे करत राहणारा हा अवलिया.इथल्या शिक्षण व्यवस्थेविषयी नाराजी आणि राग व्यक्त करून थांबून चालणार नाही.तर बदल घडवण्यासाठी काम केले पाहिजे आणि शिक्षकांना जागृत ठेवले पाहिजे ही भावना घेऊन एक शैक्षणिक लढाई लढणाऱ्या या योध्याला सलाम करावासा वाटला.
त्यांच्यासोबत गप्पा रंगल्या.पण मी मात्र जितकं लुटता येईल तेवढं हेरंब कुलकर्णी या माणसाला लुटून घेतलं.कारण या जगात दरोडा टाकून लुटण्यासारखी संपत्ती फार कमी झाली आहे.आणि असा खजिना जर अलगद माझ्यासमोर येत असेल तर मी लुटायला कमी करणार नाही..
हेरंब कुलकर्णी सरांच्या या कार्यात आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करत राहूया.साने गुरुजींच्या पायावर फुले वाहून त्यांना देव बनवण्या पेक्षा साने गुरुजींना या मातीत पुन्हा पेरण्याऱ्या आणि चांगला सभ्य संस्कारी समाज घडवू पाहणाऱ्या या शिक्षकाला आपण कायम जपत राहूया…
सर आपल्या या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा…
– दंगलकार नितीन चंदनशिवे
070209 09521