साहित्यिक सोमनाथ पगार यांना साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार जाहीर
गौरव प्रकाशन नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथील साहित्यिक सोमनाथ पगार यांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र आयोजित प्रजासत्ताक अमृत गौरव सोहळा २०२४ अंतर्गत ‘साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४’ जाहीर झाला असल्याचे संयोजन समितीने कळविले आहे.
नुकताच ‘वेदनेचे काटे’ या त्यांच्या कवितासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनुदान प्राप्त झाले असून ठाणे येथील प्रसिद्ध अनघा प्रकाशनाने प्रकशित केलेल्या या कवितासंग्रहाची तसेच साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून त्यांना ‘साहित्यरत्न’ या पुरस्काराने मुंबई, बांद्रा पच्छिम येथील नॅशनल लायब्ररी सभाग्रह, स्वामी विवेकांनद रोड येथे रविवार दि, २५ ऑगस्ट २०२४ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे संयोजन समितीने निवड पत्राद्वारे कळविले आहे.
सोमनाथ पगार हे उदयोन्मुख गीतकार, कवी, लेखक, युट्युबर, ब्लॉगर तसेच विविध साहित्यिक कलाकृतींच्या पुस्तक परिचय तसेच परीक्षण लिहण्यासाठी साहित्य क्षेत्रात सर्वांच्या परिचयाचे असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या नाशिक येथील निगळ फिल्म्स प्रोडक्शन निर्मित ‘प्रधानमंत्री’ या चित्रपटाचे ते गीतकार तसेच ‘श्री. संत नारायणनंद काठे महाराज महिमा’ ही मराठी भक्ती गीते तर ‘ऐका हो ऐका माझ्या बळीराज्याची कथा’ ही मराठी शेतकरी गीते यासाठी त्यांनी गीतलेखन केले आहे.
पुरस्कार प्रेरणा देतात, यामुळे लिखाणाला बळ तर मिळतेच शिवाय आपल्या साहित्याचा दर्जा कळतो. या प्रेरणादायी पुरस्कारामुळे मला पुढील साहित्यिक वाटचालीस निच्छितच दिशा मिळून याहीपुढे अधिकाधिक दर्जेदार लिखाणास मदत होईल. असे यावेळी सोमनाथ पगार यांनी सांगितले.
मुख्य संयोजन समितीत वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबईचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नागेश हुलावळे, लेखन अन् मी साहित्य समूहाचे रमेश मारुती पाटील, सा. आम्ही मुंबईकर सा. वृत्तपत्राचे प्रमोद सूर्यवंशी, काव्ययोग काव्यसंस्था पुणेचे योगेश हरणे इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाळासाहेब तोरस्कर तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ. ख.र. माळवे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकारचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.जी.डी.यादव, नासा शास्त्रज्ञ डॉ. हेरिक एंजल्स, दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर हे आहेत.
बी.पी.ई हायस्कूलचे मुख्याध्यापक भानुदास केसरे, नॅशनल लायब्ररीचे सचिव प्रमोद महाडिक, ग्रिन्डलेज फार्मास्युटिकल प्रा.ली.चे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर रामकृष्ण कोलवणकर, मल्टी नॅशनल कंपनीचे वित्त व्यवस्थापक राजेश कांबळे, वुमेन्स इंडिपेंडेन्सच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नॅन्सी अल्बुकर्क आदि मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.
या यशाबद्दल कवी सोमनाथ पगार यांचे साहित्यिक, कला, मनोरंजन, सामाजिक, राजकीय इत्यादी सर्वच स्तरांतून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे