तरुणाईचा आदर्श : विश्वास नांगरे पाटील
श्री विश्वास नांगरे पाटील आयपीएस यांच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड या गावात माझी गाडी शिरल्याबरोबर आम्ही समोर दिसणाऱ्या व्यक्तीला विचारले .विश्वास नांगरे पाटलांचे घर कोणते आहे ? त्यांनी आम्हाला योग्य ती दिशा दाखवली. आमची गाडी त्यांच्या कुंपणाजवळ जाऊन थांबली. श्री विश्वास नांगरे पाटलांचे बंधू आमचे स्वागत करायला आले. तेव्हा त्यांचे वडील घरीच होते .आम्ही त्यांचा चरण स्पर्श घेतला. ज्या चर्चा रंगल्या. या गोष्टी झाल्या. जेवण झाले. आमचे M H 27 ही गाडी पाहून काही आजूबाजूचे लोक पण साहेबांच्या वाड्यावर आले. मला भेटले.
श्री विश्वास नागरे पाटलांनी जा ग्रंथालयात अभ्यास केला ते ग्रंथालय पाहण्याची आमची इच्छा होती. ती त्यांचे बंधू त्यांनी पूर्ण केली. आमदार श्री शिवाजीराव देशमुख यांनी विश्वास नागरे पाटील यांना ते आमदार असताना अभ्यासिका व ग्रंथालयासाठी भरीव आर्थिक मदत केली होती. त्यांचे घर पण पाहिले. तेव्हा ते घरी नव्हते. त्यामुळे त्यांच्या भेटीचा योग हुकला. आम्ही निरोप घेताना श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांना माझ्या नवीन पुस्तकासाठी एक संदेश देण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली तो संदेश आजही माझ्या पुस्तकात आहे.
आमची गाडी नंतर कोल्हापूरकडे वळली. श्री विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे आमचे आयएएस करणारे कोल्हापूरचे विद्यार्थी सोबत होते. आम्ही कार्यालय शिरलो. त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला मोबाईल बाहेरच काढायला सांगितले.साहेबांबरोबर फोटो काढायचे नाहीत असे त्यांनी सांगितले. कारण दोन चार दिवसांपूर्वीच काही लोकांनी साहेबांबरोबर फोटो काढून ते प्रसिद्धी माध्यमाला दिले होते आणि त्या लोकांचे नाव चांगल्या लोकांच्या यादीत नव्हते.
● हे वाचा – दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी
आम्ही साहेबांच्या कक्षात शिरताच साहेबांनी या या या असे तीन वेळा म्हणून आमचे सर्वांचे स्वागत केले. आणि मला म्हणाले या लहान लेकरांना कुठून आणलं. मी म्हटलं सर हे कोल्हापूरचीच आहेत. माझ्या मार्गदर्शनाखाली आतापासून आय ए एस ची तयारी करीत आहेत. गप्पागोष्टी झाल्या. चहापाणी झालं. साहेब मला म्हणाले .तुमची मला नियमित पत्र येतात. पण कार्य बाहुल्यामुळे मला उत्तर देता येत नाहीत. मी त्यांना अमरावतीला कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. ते मला म्हणाले काठोळे सर मला काही अडचण नाही. पण आमचा पोलिसांचा व्यवसाय काही सांगता येत नाही. बघा उद्या मुंबईला माझा मोठा कार्यक्रम आहे. सहज आणि मोठी तयारी केलेली आहे पण उद्याच पालकमंत्र्यांनी मीटिंग ठेवलेली आहे मला त्या कार्यक्रमाला जाता येणार नाही तुम्ही कार्यक्रमा अरेंज केला तयारी केली आणि मी आलो नाही तर तुमची किती पंचाईत होईल. मला ते पटले.
मी त्यांना म्हटले सर आम्हाला आणि आमच्या मुलांना तुमच्याबरोबर फोटो काढायचे आहे. ते म्हणाले का नाही ? तुमचा मोबाईल द्या आणि शिपायाला त्यांनी सांगितले यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढा. आम्ही त्यांना सांगितले की तुमच्या कार्यालयात आमचे मोबाईल जमा झाले आहेत. त्यांनी पटकन बेल वाजवली. संबंधितांना बोलावले आणि सांगितले अरे ही सज्जन माणसे आहेत .इतक्या दुरून आलेली आहेत. चेहरा पाहायचा. माणसे ओळखायला शिका .यांचा मोबाईल यांना आणून द्या. आम्ही विश्वास नागरे पाटलांबरोबर फोटो काढले. मुलांना खूपच आनंद झाला एवढा मोठा चर्चेत असलेला अधिकारी आपल्याशी बोलतो काय ? आपल्या फोटो काढतो काय आपल्याबरोबर फोटो काढतो काय ? हे सगळेच काहीतरी त्यांना नवीन होते . श्री विश्वास नागरे पाटील म्हणाले मी जरी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तुमच्या विद्यार्थ्यांसमोर बोलेल आणि त्यांनी तो शब्द पाळला. माझे अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये जेव्हा भव्य दिव्य साडेआठशे मुलांचे दहा दिवसांचे स्पर्धा परीक्षा शिबिर झाले. तेव्हा माझे सहकारी श्री स्वप्निल आळेकर यांनी श्री विश्वास नागरे पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि साहेबांनी फोनवरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये तीन-चार नावे जास्तच प्रसिद्ध आहेत. श्री विश्वास नांगरे पाटील श्री भारत आंधळे श्री संदीप कुमार साळुंखे आणि श्री यजुर्वेद महाजन. इंटरनेटमुळे मोठमोठे आयएएस अधिकारी घराघरात पोहोचले आहेत. पण आम्ही 2000 यावर्षी जेव्हा मिशन आयएएस सुरू केले तेव्हा हे काही नव्हते. आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला दहा दहा हजार विद्यार्थी असायचे .पटांगण फुल भरायचे . पुस्तके पण हजारो विकल्या जायचे. त्याकाळी विश्वास नांगरे पाटील यांनी बारामती येथे महाराष्ट्राचे दैवत असलेले श्री शरद पवार साहेब यांच्या कृषी महाविद्यालयामध्ये भाषण दिले होते. ते भाषण प्रचंड गाजले. कितीतरी कोटी लोकांनी ते ऐकले त्या काळात.
● हे वाचा – दुनिया फक्त विश्वासावर चालते.!
खरं म्हणजे विश्वास नागरे पाटील यांची गोष्ट सर्वांनी आदर्श ठेवण्यासारखी आहे. आणि त्यांच्या आदर्शाचे पालन केले तर प्रत्येक मुलगा जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो याची मी स्टॅम्प पेपरवर ग्वाही देऊ शकतो .पण मुले कोचिंग क्लास काय लावतात ? अभ्यासाच्या नावाखाली वाटेल ते करतात. आणि नापास होतात.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड हे लहानसे गाव. त्या गावात फक्त चौथ्या वर्गापर्यंत शाळा. आणि तीही जिल्हा परिषदेची. या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये श्री विश्वास नांगरे पाटील यांचे शिक्षण झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना शिराळा येथे प्रवेश घ्यावा लागला. हे आहे गाव सापामुळे प्रसिद्ध आहे. नागपंचमीला सापांची येथे मोठी यात्रा भरते. विश्वास नागरे पाटील रोज 17 किलोमीटर असलेल्या या शाळेमध्ये जाणे येणे करायचे. हुशार होते तल्लख होते. त्या शाळेत गायकवाड नावाचे एक अध्यापक होते. त्यांनी विश्वासची ही तत्परता ओळखली आणि त्याला आपल्या घरातील एक खोली राहावयास दिली.
गायकवाड सरांना सकाळी तीन वाजता उठायची सवय होती. ते देखील विश्वासला तीन वाजता उठायचे आणि आंघोळ करून अभ्यास करायला लावायचे .त्याचा असा परिणाम झाला की हा छोट्याशा गावातला विद्यार्थी दहावीची परीक्षा चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. अकरावीला मग तो कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध अशा न्यू कॉलेजमध्ये शिकावयास गेला .काही योग विचित्रच असतात .तसाच योगायोग श्री विश्वास नागरे पाटील यांच्या जीवनामध्ये आला. श्री भूषण गगराणी जेव्हा आय ए एस अधिकारी म्हणून कोल्हापूरला कार्यरत होते .एक दिवस ते न्यू कॉलेजमध्ये भाषण द्यायला आले .आणि त्यांनी सांगितले की कलेक्टरची परीक्षा मराठी भाषेतून देता येते. कलेक्टरच्या पहिल्या परीक्षेला फक्त बारावीपर्यंतचेच प्रश्न येतात. आणि परीक्षेला बसायला तुम्हाला फक्त 35 टक्के मार्क पाहिजे .पहिली परीक्षा पास करायला फक्त 25 टक्के मार्क लागतात आणि सगळे प्रश्न हे वैकल्पिक स्वरूपाचे असतात. विश्वास भाषण झाल्यावर श्री भूषण गगराणी सरांना भेटला. सर त्याला म्हणाले अरे मी मराठी भाषेतूनच परीक्षा देऊन आयएएस झालेलो आहे.
विश्वास गावला आला. त्याने एका मंगल कार्यालयामध्ये सर्व मुलांना बोलावले. अध्यापकांना बोलावले. पालकांना बोलावले आणि सभा घेतली. श्री भुषण गगराणी जे जे बोलले. ते त्यांनी गावकऱ्यांना शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सांगितले आणि सर्वांना सांगितले चला आपण आता स्पर्धा परीक्षांची तयारी करू या .पण गावात अभ्यासिका नव्हती.ग्रंथालय नव्हते. पण या कामात तत्कालीन आमदार आणि सोज्वळ व्यक्तिमत्व असलेल्या श्री शिवाजीराव पाटील यांनी ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी त्यांना भरपूर मदत केली. ग्रंथालय उभे झाले अभ्यासिका उभी झाली आणि कोकरूड गावामध्ये त्या ग्रंथालयामध्ये अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी झाला.
तेव्हा बारावीच्या तुमच्या टक्केवारीवर तुम्हाला मेडिकलला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत होता., तेव्हा नीट जे ई ई इ भानगड नव्हती. विश्वासला बारावीला 92 टक्के मार्क मिळाले .पण त्याने प्रवेश घेतला तो कला शाखेमध्ये. इतरही त्याच्या मित्रांनी कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. बीए बरोबर त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला .सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असलेले श्री विकास खारगे व विश्वास नांगरे पाटील एकाच महाविद्यालयात होते. विश्वासचा स्वभाव विकास खारगे साहेबांनी पाहिला आणि त्याला कानमंत्र दिला. बाकीचे कामे कमी करायची .अभ्यासाकडे लक्ष द्यायचं .विश्वासनी तो कानमंत्र अक्षरशः झेलला आणि इतक्या काळजीपूर्वक अभ्यास केला की खेड्यातून आलेला इंग्रजी चांगली बोलताना न येणारा हा मुलगा स्पर्धा परीक्षेला बसला आणि चक्क पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखती अशा 13 प्रकारच्या परीक्षा त्यांनी एका दमात पास केल्या. कोण कहता है की आसमान मे सुराग नही होता एक तो पत्थर तब्येतसे उछालो यारो आणि कोशिश करने वालो की कभी हार नही होती पंख होने से कुछ नही होता हा मंत्र त्यांनी सिद्ध करून दाखवला.
विश्वास नुसतं आयपीएस होऊन थांबला नाही तर आयपीएसचा निकाल लागल्यानंतर त्याने मुलांना जागे करण्याची मोहीम हाती घेतली. त्यागोजागी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या आणि अजूनही त्या सुरू आहेत. लातूरला अहमदनगरला कार्यरत असताना विश्वासने पोलीस खात्यात राहून विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले आहे. तेव्हा त्यांची व्याख्याने प्रचंड गाजली. हजारोंनी विद्यार्थी असायचे .त्यांच्या युट्युब वरील भाषणे एकमेव असायचे. कारण की त्यांच्या शिवाय दुसरा कोणी नव्हता आणि हा फक्त असा वक्ता होता की जो आयपीएस झालेला होता. शिवाय बोलण्याचे कौशल्य सादरी करण्याची किमया त्यांना अवगत झाली होती. त्यामुळे त्यांची भाषणे प्रचंड गाजली आणि या भाषणातून अनेक मुलं आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकारी झाले. विश्वास नागरे पाटलांची भाषणे झाली नसती. युट्युब वर मुलांनी ती ऐकली नसती. तर एक मोठी पिढी सनदी व राजपत्रित अधिकारी होण्यापासून वंचित झाली असती. आज साधारणता 40 ते 25 या गटातील चे अधिकारी आहेत ते तुम्हाला सांगतील की आम्ही विश्वास नागरे पाटील यांचे भाषण ऐकले आणि त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली .असा हा युवकांचा आयडल माणूस. जिथे गेला तिथे त्यांनी आपले साम्राज्य स्थापन केले. सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळला .सर्वसामान्य मुलांना मदतीचा हात दिला. आज महाराष्ट्राच्या पोलीस खात्यामध्ये हा माणूस कार्यरत आहे .याचा आम्हाला अभिमान आहे.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003