” काय रे अरविंदा ” हे शब्द स्मरणात ठेऊन मा. रामभाऊ तिडके साहेब निघून गेले “
तो एक काळ होता १९८० चा. जवळपास ४४ वर्ष पूर्वीचा. आम्ही नुकतेच शंकर नगर, अमरावती परिसरामध्ये राहायला आलो होतो. आजचे शंकर नगर आणि ४४ वर्षापूर्वीचे शंकर नगर यात जमीन अस्मानाचा फरक. आम्ही राहायला आलो, तेव्हा शंकर नगर मध्ये तीनच घरे होती. एक आमचे ( मोरेंचे) दुसरे मा. रामभाऊजी तिडके सरांचे आणि मा. मुंदडा सरांचे. रस्ते नाही, वीज नाही. मी १२ वी चा अभ्यास कंदिलात केला. रात्री शंकर नगरला सायकल रिक्षा (तेव्हा ऑटो रिक्षा नव्हता) यायला तयार नसे कारण काय तर शंकर नगरला लागून स्मशान होते.
आमचे वडील संपतराव मोरे बी.एस.एन. एल. ला होते. तेव्हा मा. तिडके साहेबांनी वडिलांना आग्रह करून शंकर नगरला रु. २.४० स्क्वे.फिट. भावाने प्लॉट घेण्यास सांगितले. आमच्या दोघांच्या घरांना एकमेकांचा सहारा. काहीच घर नसल्यामुळे भक-भक हवा असायची आणि वीज नसल्यामुळे संपूर्ण काळोखच.
एक दिवस भल्या सकाळी मा. तिडके साहेब आमच्या घरी आले व ढसा-ढसा रडायला लागले. मला काहीच कळेना. मी घाबरून गेलो. रडता-रडता म्हणाले की, मोरे साहेब, “आपला पाईकराव गेला’ तेव्हा मा. तिडके साहेब बी. एस. एन.एल. ला मोठे साहेब म्हणून होते त्यांच्याच घरी फोन होता. त्यांना ही माहिती फोनवर लगेच कळली. ना-आपल्या जातीचा, ना पातीचा, ना नातेवाईक, पाईकराव पण आपल्या सहकार्यासाठी एवढा जीव लावणारा संवेदनशील, अश्रू ढाळणारा मी पहिल्यांदाच बघितला.
मी लहान होतो जेमतेम १७-१८ वर्षाचा व कोण जाणे, काय जाणे माझ्यावर त्यांचा खूपच लळा. मी तेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. तेव्हा मी Competitive Success Review (CSR) मॅगझीन व एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर वाचायचो. हे साहेब म्हणायचे आन बरं ते तुझं Competitive Success Review (CSR) मॅगझीन आणि एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर. सोबत त्यांच्या शेजारी यूको बँकेचे रहपाटे साहेब असायचे. साहेबांना मधल्या सर्वच प्रश्नांची पटापट उत्तर यायची, मला नवलच वाटायचं. न कळत माझा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास / तयारी होत असे. त्यावेळेस मला कळले सुद्धा नाही. त्याकाळी मी पाच स्पर्धा परीक्षा पास झालो. कदाचित ह्याच वातावरणाचा परिणाम असेल माझी निवड बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये झाली. नंतर साहेबांची पदोन्नती झाली आणि ते सुरतला गेले. काही वर्षांनी परत प्रमोशन घेऊन अमरावतीला मोठे साहेब म्हणून परत आले.
एव्हढ्या वर्षानंतर सुद्धा ते अरविंदाला विसरले नाहीत. जीवनामध्ये आनंद कसा आणायचा हे तिडके साहेबाकडून शिकावे. त्यात सामूहिक आनंद, समूह भावना समाजामध्ये कशी रूजवावी हे यांना बरोबर माहित होते. आता भाजीपाला आणणे हे काय इव्हेंट होऊ शकतो काय ? आम्ही ५ जण मी, तिडके साहेब, डाखोडे साहेब, तालमले साहेब आणि रांजणे साहेब असे मिळून रविवारी इतवारा बाजारात जात होतो. एकत्र भाजीपाला ठोक भावात घ्यायचा आणि साहेबांच्या घरी बसून त्याचे वाटे करायचे आणि त्या वेळेचा संवाद हा काही वेगळाच व आनंदी असायचा. ह्यावरसुद्धा साहेबांचे खास लक्ष्य असायचे. एवढा कठीण आणि बारीक हिशेबावर त्यांचे लक्ष्य असायचे.
साहेब फारच हजरजबाबी आणि तडकाफडकी होते. तो काळ कसोटी क्रिकेटचा होता पण साहेबांची बॅटिंग त्या काळात सुद्धा २०-२० ची होती. ते खूपच खेळीमेळीचे, हजरजबाबी व विनोदी होते. कोणाचे लग्न कार्य असले की ते त्या कार्यक्रमाचे त्याच्या आवडीनुसार मार्गदर्शन करायचे, धीर द्यायचे. त्यांचा भर अनाठायी खर्च न करण्यावर होता. ते नेहमी दोन पैसे वाचविण्याच्या बाजूने होते.
एक दिवस अचानक माझी पत्नी डॉ. नीलिमाची एम. पी. एस. सी. मध्ये निवड होऊन तिला पनवेलचे महाविद्यालय मिळाले. मी पनवेलला जाण्याच्या मनस्थितीत नव्हतो. परंतु ते म्हणाले होते की, अरविंदा अशी संधी कधी जीवनात येत नाही. नीलिमाला तू जाऊ दे. तेव्हा मी त्यांचे ऐकले आणि संधीच सोनं झालं. ते नेहमीच गंमतीच्या मूडमध्ये असायचे. त्यांचा वाढदिवस हा २५ डिसेंबरला असायचा आणि त्यांच्या मुलाचा (अमित / लालू ) वाढदिवस २३ डिसेंबरला असायचा. ते नेहमी म्हणायचे हा माझ्या पेक्षा मोठा आहे.
ते काकूंची खूपच काळजी घ्यायचे. कितीतरी वर्षा अगोदर असणाऱ्या त्यांचा मधुमेहाची औषोधोपचाराची ते काळजी घ्यायचे. अजूनही काकूंचा इतक्या वर्षाचा मधुमेह असून सुद्धा काकांच्या जातीने लक्ष्य दिल्यामुळे काकूंचे स्वास्थ चांगले आहे. त्यांचे त्यांच्या सुनेवर (सरोज) खास करून प्रेम होते. सुनेची सुद्धा ते खूप काळजी करत. तिला योग्य ते मार्गदर्शन करत. सुनेनी सुद्धा त्यांच्या आजारपणात त्यांची खूप काळजी घेतली.
त्यांचे व्यक्तिमत्व एकदम रुबाबदार होते. बघीतल्याबरोबर छाप पाडणारे राजा सारखे राजेशाही होते. त्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. त्यांचे कान लांब भगवान बुद्धांसारखे होते. म्हणतात ना ज्यांचे कान लांब असतात, ते विद्वान असतात. खरोखर ते विद्वान होते. ते ज्ञानाचा सागर होते.
त्यांना कबड्डी खेळ खूप आवडत असे. ते उत्कृष्ट कबड्डी पटू होते. ते स्पष्ट वक्ता होते. ते अगदी स्पष्ट बोलायचे. त्यांच्याकडे ज्ञान असल्यामुळे स्पष्ट बोलायचे व ते घाबरत नसत. त्यांना शेती करणे खूप आवडत असे. त्यांची नया अकोला येथे सुपीक शेती आहे. ते सेवेतून निवृत्त झाल्यावर शेतीतून चांगले उत्पन्न घेत असत. त्यांना शेतीची बरीच माहिती होती. एव्हढे मोठे ते बी.एस.एन.एल. चे साहेब होते परंतु त्यांना इगो, ऍटिट्यूड नव्हता. ते समाजात मिसळत, सहकार्यासोबत खेळीमेळीच्या वातावरणात राहत असत. त्यांचा सर्वांना आदरयुक्त धाक होता. पण ते सर्वांना सहज उपलब्ध होत. इगो आणि अटीट्युड हा माणसाला लागलेला शाप आहे. ह्यामुळे माणसं दुरावतात. त्यांनी इगो एटीट्युडला कधी जवळ केलेच नाही.
गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते. एकदा ते खूप गंभीर होऊन जबरदस्त इच्छाशक्तीच्या भरवशावर तंदुरुस्त झाले. परंतु परत आजारी झाले. माझी भेट त्यांच्याशी १५ एप्रिल २०२४ ला झाली. त्या अगोदर मी मार्च २०२४ ला अमरावतीला गेलो परंतु त्यांना भेटू शकलो नाही. त्यांना कळले की मी अमरावतीला येऊन त्यांना भेटलो नाही. त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, ” काय रे अरविंदा तू मला न भेटता गेला, मला अपराधी झाल्यासारखे वाटले व मी म्हटले की, पुढच्या चक्करमध्ये येतो. ते अगदी जॉली मूडमध्ये म्हणाले, ” म्हणजे मला परत बिमार पडावे लागेल, मग तू मला पाहायला येशील.
दुर्दैवाने त्यांचे हे शब्द खरेच झाले. ते परत एकदा आजारी पडले आणि मी त्यांना भेटायला गेलो. मला बघितल्यावर ते आनंदी झाले व त्यांनी स्मित सुद्धा केले. मी म्हटले ओळखले का ? त्यांनी इशाऱ्याने सांगितले, म्हणजे काय ? लगेच सुनेला इशारा केला याला काही तरी खायला दे. मी लगेच फ्लॅश बॅक मध्ये गेलो. जेव्हा केव्हा काही स्पेशल डिश असायची तेव्हा मला सुरुवातीला व माझे लग्न झाल्यावर आम्हा दोघांना विशेष करून बोलवायचे. मग ते आंब्याचा रस असो, नॉन व्हेज असो की काही चटपटी डिश असो की गोड धोड असो. एव्हढी काळजी! मी त्यांना म्हटले की, तुम्ही अंथुरणावर चांगले दिसत नाही. तुम्ही लवकर बरे व्हा. तंदुरुस्त व्हा. त्यांनी प्रसन्न मुद्रेत होकार दिला व त्यांना मी लिहिलेले पुस्तक ” कुतूहलाचा करिश्मा ” दाखविले व त्यात त्यांचे ऋणनिर्देश मध्ये नाव टाकल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी आनंदी भावना व्यक्त करून खुणेने पुस्तक वाचतो म्हणून सांगितले आणि मी निघून आलो.
परंतु माझ्या कानात अजूनही ते शब्द दरवळत आहेत. ” कारे अरविंदा तू भेटला नाही, तुझ्या भेटीसाठी मला परत बिमार पडावे लागेल म्हणजे तू येशील.
परवा, दुःखाची बातमी कळली की, ते आता आंम्हाला सोडून गेले. ते कायमचे शांत झाले. पण कोण जाणे, काय जाणे माझ्या कानात अजूनही ते शब्द दरवळत आहेत, “कारे अरविंदा तू मला न भेटताच गेला ” त्यांची एक्झिट सर्वांच्या मनाला लागून गेली. विशेष म्हणजे माझ्या ” काय रे अरविंदा…
अरविंद मोरे,
६२, शंकर नगर, अमरावती. मो. ९८२०८२२८८२