माणूसपणाला साद घालणारी रामदास पुजारी यांची कविता : डॉ. श्रीपाल सबनीस
रामदास पुजारी यांच्या ‘उद्याच्या श्वासासाठी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
गौरव प्रकाशन पुणे (प्रतिनिधी): एकीकडे क्रौर्याची, भोगवादाची, स्वार्थाची परिसिमा गाठली जात असताना समाज दु:खमुक्त व्हावा, प्रत्येकाच्या जाणिवा समृद्ध व्हाव्यात या उदात्त हेतूने रामदास पुजारी यांची काव्यनिर्मिती सुरू आहे. ते काव्यातून मांडत असलेली विश्वशांतीची भूमिका त्यांच्यातील प्रगल्भ कवी आणि डोळस माणसाची आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
सेवानिवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी लिखित ‘उद्याच्या श्वासासाठी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि. 22 डिसेंबर 2023 रोजी डॉ. सबनीस यांच्या हस्ते पुणे येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, कवी डॉ. शेषराव पाटील होते. रामदास पुजारी यांच्यासह कुंडल वन प्रबोधिनीचे महासंचालक जे. पी. त्रिपाठी, हिंदी,उर्दू कवयित्री,गझलकार कांचन त्रिपाठी, पारनेर साहित्य साधना मंचचे समूह संचालक, ज्येष्ठ साहित्यिक संजय पठाडे, प्रकाशक विक्रम शिंदे, निलम पुजारी व्यासपीठावर होते.
पुजारी यांच्या निसर्गासंदर्भातील काव्यात्मक घोषणा संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सूचित करून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, चिंतन हे पुजारी यांच्या कवितेचे सूत्र आहे. समाज जगविणारा आणि जागविणारा विचार त्यांच्या काव्यातून दिसून येतो. माणसाच्या माणूसपणाला साद घालणारी त्यांची कविता आहे.
आई-वडिल आणि निसर्ग हे जिव्हाळ्याचे विषय असल्याचे सांगून लेखनाविषयी मनोगत व्यक्त करताना रामदास पुजारी म्हणाले: हवा,जल व जमीन सुरक्षित राहिली,लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊन वृक्ष संवर्धन झाले तरच उद्याच्या पिढीला श्वास घेणे शक्य होणार आहे. उद्याच्या पिढीला श्वासासाठी प्राणवायू मिळण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व्हावे, निसर्गाशी संवाद वाढावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. शेषराव पाटील म्हणाले, उद्या आपल्याला श्वास घेता येईल का याकडे गांभीर्याने बघण्याची, विचार करण्याची गरज आहे. पुजारी हे खऱ्या अर्थाने कविता जगले आहेत. पुजारी यांच्या काव्यांमधून निसर्गाविषयी सखोल ज्ञान मिळणार असल्याने निसर्ग शिक्षणासाठी हा काव्यसंग्रह महत्त्वाचा ठरणार आहे.
पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास जरी झाला असला तरी पुजारी यांच्या काव्यातून आशादायी चित्र निर्माण झाले आहे. पर्यावरणविषयक आणि वृक्ष लागवडीसाठी जनजागृती व्हावी या दृष्टीने हा काव्यसंग्रह निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास जे. पी. त्रिपाठी यांनी व्यक्त केला.
निसर्गाबद्दल संवेदनशील असलेला कवी अशा शब्दांत रामदास पुजारी यांचे संजय पठाडे यांनी कौतुक केले. प्रास्ताविक प्रा.विजय लोंढे यांनी तर स्वागत रामदास पुजारी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.स्वप्निल घाटगे यांचे होते. आभार सुप्रभा पुजारी यांनी मानले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील रसिक उपस्थित होते.
फोटो ओळ : ‘उद्याच्या श्वासासाठी’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) कांचन त्रिपाठी, निलम पुजारी, रामदास पुजारी, डॉ. शेषराव पाटील, डॉ. श्रीपाल सबनीस, जे. पी. त्रिपाठी, संजय पठाडे, विक्रम शिंदे