रमाईस तिच्या लेकीचं पत्र
प्रिय रमाई,
तू नसतीस तर आज कुठे असतो आम्ही ? कल्पनाही करवत नाही, तू जीवापाड सोसलेस माऊली! त्यागाची परिभाषा तू आहेस. गावकुसाबाहेरील लाखो मुक्या जीवांना ‘माणूस’ म्हणून जगण्याचा सन्मान तू अपार दुःख सोसल्यामुळेच मिळालाय ह्याची जाणीव पावलोपावली आम्हास होते. प्रज्ञासूर्याच्या आयुष्यात तू नसतीस तर ……..कल्पनाच नको वाटते…..थरकाप उडतो, घशाला कोरड पडते, श्वासही अडकतो, अंधारून येते डोळ्यासमोर भर दिवसाही!
तू नसत्या खाल्ल्या खस्ता तर युगायुगांचा काळाकुट्ट अंधार नसताच झाला नामशेष, शिळ्या तुकड्यांवर जगत वळवळलो असतो वेशीबाहेरच्या अंधारल्या दुर्लक्षित शेणाच्या पवात…..हक्क-अधिकार काय असतात? स्वाभिमान, आत्मभान कशाशी खातात? नसतंच कळलं कधी…. पाटीपुस्तकाने आयुष्य अंतर्बाह्य बदललं नसतं. गावा-शहरात ‘राजगृह’ नसते उभे राहिले दिमाखात, वातानुकूलित चारचाकीत ऐटीत बसून कसे फिरलो असतो? वास्तव मांडण्याची पोटतिडीक कशी जागृत झाली असती? मोठ्या पदावर मानाने मिरवलो नसतो की कायद्याची भाषा बोलू शकलो नसतो.
रमाई ,आम्हाला मनुवादापासून मुक्ती देत ‘माणूसपण’ मिळालं ते तू बाबासाहेबांना दिलेल्या प्रेरणेतूनच. समतेसाठी लढताना, बोलताना इथून मागे नाकारलेल्या कित्येक पिढ्यांच्या वेदना-चित्कार थैमान घालत राहतात मनमेंदूत तद्वत आज ‘माणूस’ म्हणून आमची गणना होते ,आम्ही इतरांसारखे जिणे जगतो तेव्हा तुझे कष्ट-अपेष्टा यांच्या जाणिवा नेणिवेत ठेवतो आम्ही जपून. धगधगत राहते पीडा वाताहत झालेल्या ,गुलाम म्हणून जगलेल्या मागील कित्येक बापजादयांच्या लाचार व्यथांची! हे सारं संपवल बाबासाहेबांनी आणि रचलं मानवतेचं नवं सूक्त-नवं तत्वज्ञान. ह्या तत्वज्ञानाची खरी जननी तू आहेस माय रमाई…..तुझ्या कष्टाचे, त्यागाचे, सहनशीलतेचे वर्णन करायला अजून शब्द जन्माला यायचेत गं! तुला शब्दात पकडू शकतील एवढे अफाट उंचीचे सामर्थ्य लाभलेले शब्द नाही सापडले मला अजून कुठल्याच शब्दकोशात…..
तू आहेस आमच्या जागृत सुखावह जगण्याचं कारण, तू आहेस आमुची सांस्कृतिक माता, तू आहेस प्रगाढ समजूतदार कारुण्य, तू आहेस उदंड मानवतेचे प्रतीक, तू आहेस ममता-प्रेमाची व्याख्या, तूच आहेस महामानवाची, ज्ञानपुरुषाची, घटनाकाराची अबोल स्फूर्ती, प्रचंड प्रेरणा.
तुझा संघर्ष साऱ्या संघर्षांहून मोठा आणि कठीण होता. बाबासाहेब परदेशात असताना अनंत अपेष्टा, संकटांना कसं तोंड दिलंस गं रमाई तू एकटीने…? तू गेली नाहीस कोणत्याच शाळेत शिकायला वा गिरवले नाहीत पाढे, बाराखडी पण तू ज्या समर्थ सामंजस्याने एकटी संसाराचा गाडा ओढत राहिलीस नं विनातक्रार ते कोणत्याच विद्यापीठात शिकवलं जात नाही. तू हे कुठून शिकलीस माय? निष्ठा, बांधिलकी, समाज कल्याणार्थ त्याग आणि समर्पण काय असतं हे जर समजून घ्यायचं असेल, शिकायचं असेल तर एकच विद्यापीठ मला आज विश्वात दिसतं ते म्हणजे ‘रमाई’!
नकळत्या वयात लग्न होऊन तू आलीस , रामजीबाबांची सून म्हणून, भीमरावांची बायको म्हणून आणि नाकारल्या आम्हा सर्वांना आपल्या त्यागाने तू कायमचे ऋणी करून गेलीस रमाई….नाहीच फेडता येण्यासारखे तुझे ऋण , ७ फेब्रुवारी हा एकच दिवस नाही तुला आठवण्याचा तर प्रत्येक श्वासागणिक तुझे उपकार जाणवत राहतात रमाई…आमची वाणी जर बाबासाहेबांचा मानवतावाद बोलत असेल, न्याय-समता-स्वातंत्याप्रती आम्ही जागृत असू तर रमाई तुझ्या त्यागाची जाणीव ह्या धमन्यांमधून वाहत आहे म्हणूनच….तू खूप कमी भेटलीस साहित्यातून, कवितेतून,पुस्तकातून…..तू नेहमीच राहिलीस पडद्यामागे, तुला नव्हतीच कधी मिरवण्याची हौस, ना सत्काराची आस. तू तर जगलीस फक्त तुझ्या साहेबांची आणि आमच्या बाबासाहेबांची ‘रामू’ म्हणून .
रमाई, तुझ्या आयुष्याची गणितं खूप किचकट होती गं ….कशी सोडवलीस तू अचूक? तुला ना लाभले पुरेसे वस्त्र ना अन्न ,ना पैसा ना कसलीच सुखं तरी तू कशी गं विनातक्रार झगडत राहिलीस हयातभर आयुष्याशी??? तू बाई म्हणून कोडं वाटत आली आहेस आम्हाला! तुझ्या बालपणीच तू झालीस पोरकी. नियतीने निर्दयी वार केलेत तुझ्यावर पण तू संयमाने ठामपणे लढत राहिलीस. दुःखाचा कांगावा नाही की सहानुभूतीची आस नाही. तू नं मला खूपदा अनाकलनीय कोडं वाटतेस गं…..आई रुक्मिणीची कष्टाळू ‘रामी’ बाबासाहेबांची प्रिय प्रेमळ पत्नी ‘रामू’ आणि करोडोंची ‘रमाई’ आहेस तू. ”कष्टाशिवाय मनुष्य मरतो, कष्टानं मरत नाही . कुणाचं वाईट चिंतू नये. कुणाची निंदा,द्वेष करू नये. दुनियेत गुणांची कदर होते,आपण स्वच्छ असावं, एक दिवस आपली कदर होतेच. हिणवणाऱ्यांच्या माना एक ना एक दिवस खाली जातात” हे आईने दिलेले बाळकडू तू आयुष्यभर प्रकर्षाने जगलीस तू रमाई….कसं साध्य केलंस हे सारं काटेकोरपणे?
तुझ्या पोरसवदा वयात अकाली तू पोरकी झालीस, आईबापाच्या मायेचं खंबीर छत्र कायमचं हरपलं. अनपेक्षित आलेल्या या वादळाने तू डगमगली नाहीस. मागेपुढे अंधार दाटलेला असताना, त्याही सैरभैर अवस्थेत तू आसवं पुसली आणि लहानग्या गौरा, शंकरची तू आई झालीस. कुठल्याही बुकात, शाळेत, विद्यापीठात नाही शिकवलं जातं हे, म्हणूनच जेव्हा जेव्हा सारं संपल्यासारखं वाटतं, चौफेर काळोख दाटतो, दिशा सापडत नाही, वाट दिसत नाही, संकटं कोंडमारा करतात, नैराश्य घेरतं, न्याय्य बाजूसाठी लढताना छुपे धर्मांध वार होतात तेव्हा डोळे घट्ट मिटून मी ‘रमाई’ आठवत जाते आणि आपसूक बळ मिळते काळोखात उजेड पेरण्याचं.
म्हणूनच ‘रमाई’ तू आहेस संजीवनी आमच्या स्वप्नांची, आमच्या मनांची, आशांची आणि आगामी साऱ्याच विजयांची!(©डॉ.प्रतिभा जाधव)
रमाई, खरं तर तू ‘बालपण’ हरवलेली आणि समजूतदार ‘आईपण’ अकाली गवसलेली आमची प्रेरणा. वयाच्या नवव्या वर्षी पुस्तकवेड्या, देखण्या, बुद्धिमान भीमरावांची तू जोडीदार झालीस. खरं तर तुझा संसार हा ‘वादळा’ बरोबरचा संसार होता. मातेच्या निधनानंतर तू गौरा-शंकरची आई झालीस आणि बालपणीच आई गमावलेल्या बाबासाहेबांचीदेखील ‘आई’ झालीस. वलंगकरांची लेक सुभेदारांची सून झाली ‘रमाबाई भीमराव आंबेडकर’!
मीराआत्याच्या तालमीत तू घडलीस रमाई. आपले भवितव्य काय? कोणत्या दिशेने हा प्रवास तुला नेणार? कुणालाही कसला पत्ता नसताना तुफानाशी लगीनगाठ बांधून नवा इतिहास घडविण्यासाठी तू सज्ज झालीस. ज्योतिबांनी साऊला अक्षरओळख करून दिली तशी तुही तुझ्या साहेबांकडून वाचायला शिकलीस. तुला नवऱ्याच्या हुशारीचं मोठं अप्रूप वाटे म्हणूनच तर मॅट्रिक पास झाल्यावर भीमरावांचा सत्कार तू डोळे भरून अनुभवला आणि घरी आल्यानंतर म्हणालीस नवऱ्याला, “तुम्ही खूप मोठ्ठे आहात, आणखी खूप शिका-मोठ्ठे व्हा, मी तुमच्यावर संसाराचा भार पडू देणार नाही. तुम्ही खूप खूप शिका..” तू जबाबदारीने स्वतःला बांधून घेतलंस, तुझ्या साहेबांना दिलेला शब्द अखेरपर्यंत पाळलास….कष्टत राहिलीस, तिष्ठत राहिलीस, अनवाणी वाट तुडवत राहिलीस, कधी कसली अपेक्षा नाही की मागणी नाही, शेकडो दुःख झेलीत तू सतत चालत राहिलीस. खरंच माऊली कोणत्या मातीची बनली होतीस गं तू? निरपेक्षपणे साऱ्या जीवनाची आहुती देत गेलीस.
पित्यासमान सासरा रामजीबाबांच्या रुपात तुला लाभला पण काळाने हे छत्रही हिरावून घेतल्यानंतर तू खूप दुःखी झालीस रमाई. बाबासाहेब शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि लहानग्या यशवंतासोबत तू पोयबावडीतल्या खोलीत फाटकातुटका संसार नेटाने पुढे रेटत राहिलीस. रमेश जन्मास आला आणि तू दुसऱ्यांदा आई झालीस . वर्षाच्या आत रमेश दगावला. ह्या दुःखाच्या प्रसंगी तुझे साहेब तुजजवळ नव्हते. अन्यायाच्या अंधाऱ्या गर्तेत खितपत पडलेल्या आपल्या समाजाला जागे करण्यासाठी , त्यांचा निसर्गदत्त ‘माणूस’ असल्याचा सन्मान मिळवून देण्यासाठी रात्रंदिन एक करून ते अभ्यास करत होते , प्रतिकूल परिस्थितीतही आपले ध्येय, निर्धार त्यांनी ढळू दिले नाहीत. सांसारिक सारी दुःखे त्यांनी काळजावर दगड ठेवून सहन केली. तुझ्यावर त्यांची पराकोटीची श्रद्धा होती गं रमाई. तूच तर होतीस त्यांची ऊर्जा, त्यांचे बळ. तुझ्याच भरवशावर संसार सोपवून परदेशी शिक्षण घेत होते.
छोट्या छोट्या गोष्टींमुळे खचून गेलेल्या , मरण जवळ करु पाहणाऱ्या माणसांनी खरं तर तुझा काटेरी वाटेवरला प्रवास समजून घेतला तर त्यांना कळेल , आपण किती फालतू कारणांसाठी जगणं संपवायला जातोय.
रमेशच्या पाठी इंदू जन्माला आली आणि पुन्हा त्याच दुःखाची पुनरावृत्ती , इंदुही दीड वर्षातच सोडून गेली. काटेकोर काटकासरीत, प्रसंगी गोवऱ्या-शेण्या थापून दिवस काढणाऱ्या तुझ्याकडे कसले आले मुलांच्या उपचारासाठी पैसे? बाबासाहेब लंडनला शिक्षण घेत असताना इंदूनंतर जन्मलेला आणि जन्मापासून आजार सोबत घेऊन आलेला नाजूक प्रकृतीचा गंगाधर हे तिसरे लेकरूही आपल्या डोळ्यासमोर शेवटचा श्वास घेताना तू पाहिलंस रमाई, काय वाटलं असेल तुझ्यातल्या आईला….. बापरे! कल्पनाही करवत नाही गं !! पोटची तीन लेकरं मातीत पुरताना तुझं काळीज किती खोलवर पोखरलं असेल दुःखाने? अशा कठीण कसोटीच्या क्षणी तुझे साहेब तुझ्या सोबत नसणं हेही दुःख मोठंच गं माऊले…खूप मोठं! मन किती घट्ट केलं असशील तू नऊ महिने उदरात वाढवलेलं लेकरू मातीआड करताना. त्यावेळी तुझ्याजवळ नव्हता जोडीदाराचा भक्कम खांदा विसावण्यासाठी की नव्हते त्याचे दिलाशाचे चार शब्द त्या कठीण समयी. तू नेहमीच केलेस परिस्थितीशी दोन हात, जणू विसावा-सुख ह्या बाबी तुझ्यासाठी नव्हत्याच कधी . तुझ्यासाठी होती काट्यांची वाट , दुःखाने भरलेलं ताट, वेदनांची साथ ….. (©डॉ.प्रतिभा जाधव)
तुझा अन तुझ्या साहेबांचा जीव की प्राण असणारा राजरत्न गेला तेव्हाही तुझं काळीज दुभंगून गेलेलं. नियतीने, परिस्थितीने खडतर कसोटी पहिली तुझी आयुष्यभर. पाचपैकी चार अपत्य काळाने हिरावून घेतली अशावेळी बाबासाहेबदेखील एवढ्या मोठ्या दुःखाने खचले होते पण रमाई, तूच कणखर झालीस आणि त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिलीस. पोटची अपत्य गेलीत पण समाजातील असंख्य लेकरांना मानाचं माणूसपणाचं जगणं लाभावं म्हणून तूच उभारी दिलीस पुन्हा साहेबांना! म्हणूनच खरंच तू आम्हा सर्वांची ‘आई आहेस,रमाई आहेस’!(©डॉ.प्रतिभा जाधव)
रमाई,तुला लाभलंच नाही गं सुख कधी पण तुझे साहेब जेव्हा तुला प्रमाणे ‘रामू’ म्हणायचे तेव्हा तू मोहरायचीस, खुलायचीस. किती माफक अपेक्षा आणि व्याख्या होती नाही तुझी सुखाची! बाबासाहेब परदेशात शिकत असताना तू पोयबावडी ते दादर-माहीमपर्यंत पायपीट करायचीस. तू शेण वेचलं, गोवऱ्या थापल्या, सरपणासाठी वणवण केली. बॅरिस्टरची बायको सरपणाचे भारे डोईवर वाहते म्हणत तुझ्या साहेबांना कुठे कमीपणा येऊ नये म्हणून तू अंधारून आल्यावर सरपण आणायला बाहेर पडायचीस. किती हे निस्सीम प्रेम आणि काळजी साहेबांची. रमाई, तुझे सारे फोटो कुठे कुठे शोधून बघितले गं मी! साऱ्या फोटोत तुझा कृश देह, डोळ्यातील करुण, प्रेमळ भाव आणि चेहऱ्यावर अगणित कष्ट- अपेष्टांचं सोसणं प्रकर्षाने चटकन नजरेत भरतं…. खरंच कित्ती कित्ती सोसलंय रमाई तू आमच्यासाठी……! इथल्या बहुजनांच्या, नाकारलेल्या सर्वांचे, समग्र महिलांच्या कल्याणाचे जे कायदे,योजना, नियम आहेत ना ते केवळ तुझं देणं आहे , त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की , जगातील सर्वात श्रेष्ठ अशी जी राज्यघटना आपल्या भारत देशाला मिळाली तीही तुझ्यामुळेच कारण प्रपंचाच्या समस्यांत तू बाबासाहेबांना गुंतवून ठेवलं नाहीस की तशी अपेक्षाही कधी त्यांचेकडून केली नाहीस. तू बोलली नाहीस कधी स्वतःच्या त्रासाबद्दल, त्यागाबद्दल पण आता तो लख्ख दिसतोय आम्हाला आमच्या सुबत्ता आणि स्वाभिमान भरल्या जगण्यातून. तू सोसलंस म्हणून आम्ही आज हे सुख उपभोगतोय ही नम्र भावना काळजापासून व्यक्त करते रमाई.
साधारण पत्नीप्रमाणे तुझी तक्रार कधीच नव्हती की, नवरा वेळ देत नाही म्हणून. बाबासाहेबांचाही जीव तीळ तीळ तुटायचा यशवंताच्या ,तुझ्या भेटीसाठी. त्यांनी जर विश्रांती घेतली असती तर त्यांच्या निद्रिस्त आणि गुलामी स्वीकारलेल्या समाजाला जागृत कोण करणार? हा मोठा प्रश्न त्यांना पडायचा . रमाई, तुझा व तुझ्या साहेबांचा पत्रव्यवहार आम्ही वाचतो तेव्हा त्या पत्रातील शब्द शब्द काळीज कातरत जातो. आमच्यासाठी किती त्रास सहन केलाय , खस्ता खाल्ल्यात तुम्ही ! याची जाणीव प्रकर्षाने होते रमाई आम्हाला. दहा ठिकाणी फाटकं लुगडं नेसून तू कुरबुर न करता तू नांदलीस. त्याच फाटक्या पदरानं प्रसंगी आई होऊन तू साहेबांचे अश्रू पुसलेस. रमाई तू होतीस म्हणून तर बाबासाहेबांच्या स्वप्नांना पंख फुटले , त्यांची पावलं निर्भय झाली, चालणं खंबीर झालं. तू नसतीस तर ते किनारे नसलेल्या प्रवाहासारखे झाले असते. (©डॉ.प्रतिभा जाधव)
सारी पीडा सोसूनही तू म्हणायचीस साहेबांना, ‘तुम्ही माझे पती नसता तर माझ्या जगण्याला तरी काय अर्थ होता?’ या वाक्यामुळे तर तुझी उंची हिमालयाहूनही उत्तुंग भासते रमाई मला. कुठेच दुःखाचा लवलेश नाही, तक्रारींचा पाढा नाही. तुझ्या मनाइतका मोठेपणा, नितळपणा, सकारात्मकता कुठेच कधी आढळून येणार नाही हे मात्र सत्य .
बाबासाहेबांच्या अंधारल्या संघर्षाच्या वाटेतील छोटासा दिवा तू स्वतःला म्हणवून घेतेस यातच तुझे उत्तुंग असणे जाणवते आम्हाला रमाई.
आयुष्यभर तुझी फरफटच झाली माऊली रमाई, अपुरा आहार, आर्थिक विपन्नावस्था, सतत काळजीचे सावट, डोळ्यासमोर अनुभवलेली आप्तांची, अपत्यांची कैक मरणं. खूप दुःख सोसल्यानंतर राजगृहात तू राहायला आलीस खरी, पण नियतीने शेवटीही घात केलाच. तुला क्षयाने गाठलं. आता कुठे सुखाचे दिवस आले होते की ,आजाराने डोके वर काढले. बाबासाहेबांनी तुझी अत्यंत काळजी घेतली पण त्यांना तुझी साथ बहुदा इथवरच लाभणार होती.
शेवटच्या क्षणापर्यंत आजारपणात स्वतःच्या जीवपेक्षाही तुझ्या साहेबांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून तू काळजी वाहायचीस रमाई. आयुष्यात कुणावरतरी तुझ्याइतकं निरपेक्ष, निस्सीम प्रेम करणं जमायला हवं गं आम्हालाही. रमाई, तुझी शेवटची इच्छा होती नं, भरल्या कपाळाने, हिरव्या लुगड्याने जाता यावं. तसं तू तुझ्या साहेबांना बोलूनसुद्धा दाखवायचीस आणि ते हळवे होत, दुःखाने गदगदून जात. रमाई, अखेर तो दुःखाचा दिवस उगवलाच , रंजल्या-गांजल्यांची आई, बाबासाहेबांना प्रिय असलेली ‘रामू’ अखेरच्या प्रवासास निघाली. तू गेलीस तेव्हाही मृत्यूला हवालदिल करणारं , मरणावर विजय मिळवणारं कृतकृत्य स्मित तुझ्या मुखावर उतरलेलं…..तुझ्या साहेबांच्या अश्रूंना बांध नव्हता, ते तुला लहान लेकरासारखे वारंवार विनवत होते ‘रामू ,रामू मला सोडून जाऊ नकोस रामू…” २७ मे १९३५ रोजी तू आम्हा सर्वांना पोरकं करून गेलीस रमाई!आई… आई…म्हणत यशवंता हंबरडा फोडत होता. साहेबांची रामू हरपली होती. कारुण्याच्या महाकाव्याचा अंत झाला ,त्यागाच्या अथांग महासागर शांत झाला. रमाई तू गेलीस आणि वंचीत, शोषित, नाकारलेली घरं कितीतरी दिवस रडत राहिली, आपली माय गमावल्याचे दुःख त्यांच्या उरात सलत राहिले. मोठी पोकळी निर्माण झाली पण जाताना तू बाबासाहेबांना म्हणाली होतीस नं की, जगातल्या, देशातल्या सर्व दुःखांना पोटाशी धरणारी आई व्हा, कनवाळू बाप व्हा. रमाई तू गेलीस अन आम्हास ‘भिमाई’ देऊन गेलीस……. तुझ्याशिवाय बाबासाहेबांची कल्पना करणेही शक्य नाही. ‘भिमाई-रमाई’ हे आमच्या स्वाभिमानी जगण्याचं गमक आहे . आमच्या स्वातंत्र्याचं कारण आहे. आमचं माणूस म्हणून स्वीकाराचं कारण आहे. तुमचा त्याग, त्रास व्यर्थ जाणार नाही कारण तुमची लेकरं आता विचार करताय, वाचताय-लिहिताय. व्यक्त होताय, जुलुमी व्यवस्थेस हादरा देताय. समतेचा उद्घोष करताय. संघर्ष सुरूच आहे तुमचे वैचारिक-जैविक वारस लढलेय आणि लढताय…..तुम्ही आहातच सतत मनमेंदूत, धमन्यांत आणि विचारांतदेखील. याच विचारांशी राहू आम्हीही हयातभर बांधील आणि देऊ त्यास कृतीची जोड ,तेव्हाच तर तुमचे वारस आहोत हे जबाबदारीने आम्ही जगाला आमच्या कृतीतून दाखवू शकू. कोटी कोटी प्रणाम माऊली!
-तुझी एक धडपडणारी लेक
-डॉ.प्रतिभा जाधव
pratibhajadhav279@gmail.com