- प्रिय राहुल,
महाराष्ट्रात १४ दिवसांची पदयात्रा करून आज तू या पवित्र भूमीचा निरोप घेणार आहेस.या संस्कार भूमीत तुला काय मिळाले,काय नाही हे तुला समजले असेलच.परंतु या १४ दिवसात महाराष्ट्राच्या जनतेला मात्र खूप दिवसानंतर बरेच काही मिळाले आहे. अनेक वर्षानंतर या राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य लोक एकत्र येऊन जोडण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे.पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारची ऊर्जा प्राप्त झाली आहे. आपण या देशातले वातावरण निश्चितच बदलवू शकतो अशी खात्री अनेक दिवसांपासून नकारात्मक भूमिकेत गेलेल्या लोकांना झालेली आहे.आम्हाला सुद्धा तुझ्या यात्रेत दोन दिवस सहभागी होता आले. तुझ्यासोबत २०-२२ किलोमीटरचा पायी प्रवास करता आला याचा खरोखर मनापासून आनंद झाला. तुझ्या यात्रेत चालताना लोकांना कुठेही थकवा,शीन,उदासीनता,नैराश्य जाणवत नव्हते.वेगवेगळ्या भागातून आलेल्या पदयात्रींसोबत बोलताना सर्वांच्या बोलण्यातून देशाच्या उज्वल भवितव्याचाच विचार मांडला जात होता.जातीयता,धर्मांधता,हिंसा,व्देष,नफरत या गोष्टी देशासाठी घातक आहे असाच प्रत्येकाच्या बोलण्याचा सूर होता.
● हे वाचा – Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ……..
राहुल,या यात्रेमध्ये काँग्रेस पक्षापेक्षा केवळ देशाचा विचार करणाऱ्या लोकांचा जास्त भरणा दिसत होता हे सांगतांना आम्हाला आनंद होत आहे.अनेक लोक स्वतः सांगत होते की आम्ही काँग्रेसी नाही,परंतु सध्याच्या हिंसक आणि द्वेष निर्माण करणाऱ्या वातावरणामध्ये देशाला पुन्हा समता,एकात्मता आणि बंधुतेच्या वाटेने न्यायचे असेल तर भारताचे एक सुजाण नागरिक म्हणून आपण सुद्धा जोडण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणे ही आपली गरज आहे व देशाच्या उज्वल भविष्यासाठी ती आवश्यकता आहे.म्हणून अनेक जण यात्रेमध्ये पायी चालत होते.स्त्री,पुरुष, ज्येष्ठ नागरीक,तरुण-तरुणी,लहान लहान मुले हे पायी चालत होते व त्यांना या यात्रेबद्दल प्रचंड कुतूहल होते.
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
त्याचबरोबर तू कसा दिसतोस,कसा बोलतोस,कसा वागतोस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चांदीचा चमचा तोंडात घेवून आलेला तू खरोखर पायी चालतोस का हे पाहण्यासाठी असंख्य लोक रस्त्याच्या दुतर्फा जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी उभे राहून तुझी एक झलक पाहण्यासाठी,तुझ्या अंगाला स्पर्श करण्यासाठी,तुला मिठी मारण्यासाठी,तुला आपल्या समस्या सांगण्यासाठी मोठ्या आशेने उभे होते.वेगवेगळ्या त-हेने तुझे स्वागत करतांना त्यांना खूप आनंद वाटत होता.महिलांना सुध्दा तुझा हात हातात घेतांना,तुला मिठी मारतांना जराही संकोच वाटत नव्हता.यातच तुझ्या उच्च चारित्र्याचे दर्शन घडून येते.अकोला जिल्ह्यातील वाडेगाव फाट्यावर एका उंच बिल्डिंगवर अनेक महिला आणि तरुणी तुझी पदयात्रा पाहण्यासाठी उभ्या होत्या.तुझे लक्ष तिकडे गेल्यानंतर तू सुरक्षा कडे तोडून सरळ त्या बिल्डिंगवर चढला.आमच्या काहीच लक्षात आले नाही.परंतु जेव्हा त्या महिलांची तोंडे दुसऱ्या बाजूने वळली,तेव्हा लक्षात आले की तू त्या बिल्डिंगवर महिलांना भेटण्यासाठी गेलेला आहेस.त्याच ठिकाणी एका छोट्याशा गोंडस बाळाला छातीशी घेऊन त्याचा तू लाड केलास.तेव्हा खरोखरच तुला सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणे, वावरणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवडते याची जाणीव झाली.
● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य
प्रिय राहुल,अशाच गर्दीमध्ये रममाण होतांना तुझ्या प्रिय वडिलांचा घात झाला होता.त्यावेळी तू १९ वर्षाचा होता.तुला त्या दुःखद गोष्टीची पुरेपुर माहिती असूनसुद्धा तू पुन्हा पुन्हा हा धोका पत्करतो आहेस यातच तुझ्यातील देशप्रेमाच्या संस्काराचे प्रतिबिंब दिसून येते.या यात्रेमुळे तुला,तुझ्या पक्षाला किती फायदा होईल याच्याशी आमचा संबंध नाही.पण एक माणूस निष्पाप आणि निरागस भावनेने दररोज २५ किलोमीटर चालतो,लाखो लोकांना भेटतो, देशाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो,देशाच्या संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करतो, स्वतः अत्यंत कमी बोलून दुसऱ्यांचे ऐकून घेण्यात धन्यता मानतो यामधून निश्चितच तुझ्या प्रामाणिकतेची जाणीव होते.
● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य
राहुल, दोन दिवसाच्या आमच्या यात्रेत आम्ही बरेचदा तुला खूप जवळून पाहिले.तुझ्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळतांना तू ढोंगी नाही,नाटकी नाही,कपटी आणि फसवणारा नाहीस आणि बाताड्या तर अजिबात नाही याची शंभर टक्के खात्री झाली.चेहऱ्यावरून माणसाचे बरेचसे अंतरंग जाणून घेता येतात.त्यामुळे तुझा चेहरा खूप काही सांगून जातो.तुझ्या चेहऱ्यावर सत्तेची लालसा,प्रसिद्धी लोलूपता अजिबातही दिसत नाही.या महाराष्ट्रात अनेक संत महापुरुषांच्या विचारांची तुला जाणीव झाली असेलच.तुझ्या बोलण्यातून सुद्धा आम्ही ते प्रत्यक्ष अनुभवले.या संत महापुरुषांनी महाराष्ट्रासह देशासाठी फार मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या विचारातून तुला निश्चितच योग्य दिशा मिळेल व त्या विचारांवर चालण्याचा तू थोडाफार तरी प्रयत्न करशील असे आम्हाला वाटते.
● हे वाचा – एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!
तुझ्या यात्रेत सहभागी झाल्याने आम्हाला अनेक मोठमोठ्या लोकांचा सहवास अनुभवता आला, त्यांच्याशी बोलता आले,त्यांच्या जवळ जाता आले.तुझ्या पायी चालण्यामुळे, स्वतःच्याच गुर्मीत व अहंकारात असलेली अनेक मोठमोठी नेते मंडळी जमिनीवर आलेली पाहून खूप बरे वाटत होते.जे वर्षानुवर्षे गाडीच्या खाली उतरत नव्हते,त्या मोठमोठ्या नेत्यांना तू धूळ खात पायी चालण्यास भाग पाडले हे खूप चांगले झाले.यातून अनेक उच्चपदस्थांना, असामान्य असतानाही माणसाने किती सामान्य असले पाहिजे याची निश्चितच जाणीव होईल.देशातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबातील असतानाही गरीब व सामान्य कुटुंबातील लोकांसोबत कसे मिसळले पाहिजे हे सुद्धा काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना तू शिकवून गेलास हे खूप महत्वाचे झाले.तू गेल्यानंतर ही मंडळी तू निर्माण केलेला हा झंझावात पुढील काळात कशाप्रकारे टिकून ठेवतात यावरच तुझ्या आणि तुझ्या पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.कारण यात्रेत चालतांना एकीकडे सर्वजण तुझ्या धाडसाची प्रशंसा करीत होते तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसच्या बड्या नेत्यांना मात्र दोष देत होते.बड्या नेत्यांनीच काँग्रेसची ही दुर्दशा केली आहे हे वास्तव आम्हाला यात्रेत चालतांना जाणवले.त्यामुळे या नेत्यांना तू प्रेमाने व कठोरपणे काही चांगल्या गोष्टी निश्चितच सांगितल्या पाहिजे असे आम्हाला वाटते.
● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह
प्रिय राहुल, ज्या लोकांचे संपूर्ण राजकारणच व्देष,घृणा आणि हिंसेवर अवलंबून आहे अशा लोकांना तू मात्र प्रेमाने आणि अहिंसेने उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय ही गोष्ट देशाला विधायकतेकडे नेणारी आहे.जे लोक तुझ्या कुटुंबाबद्दल अत्यंत घाणेरड्या व विकृत शब्दात बोलतात, त्यांच्याविषयी सुध्दा तू स्वतःच्या मनात कोणताच द्वेष ठेवत नाही हे उच्चकोटीच्या सुसंस्कारी व्यक्तीचे लक्षण आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरून तो संस्कार,ती नम्रता आणि तो अहिंसात्मक भाव स्पष्टपणे दिसून येतो.*त्यामुळे तुझी ही पदयात्रा देश पूर्णपणे तुटण्याच्या आधीच जोडण्याच्या कामाला लागली हे फार चांगले लक्षण आहे.* या भारत जोडो यात्रेचे आम्हाला प्रत्यक्षपणे साक्षीदार होता आले ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.राहुल,महाराष्ट्राच्या मातीतून तुला भावनिक निरोप देतांना, तू भारत जोडण्याच्या मोहिमेत निश्चितच यशस्वी होशील अशा तुला मनापासून सदिच्छा देतो.
Best wishes dear Rahul !
- -प्रेमकुमार बोके
- अंजनगाव सुर्जी
- ९५२७९१२७०६
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–