पुण्याचे आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार 

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

पुण्याचे आयकर आयुक्त श्री अभिनय कुंभार 

सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व सध्या पुणे येथे आयकर आयुक्त म्हणून असलेले श्री अभिनय कुंभार यांची भेट झाली व माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली. आता अभिनय कुंभार पुण्याला आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांची माझी भेट झाली नसती तर कदाचित आज महाराष्ट्रामध्ये मिशन आय ए एस ची जी चळवळ 36 जिल्ह्यामध्ये उभी राहिली ती कदाचित राहिली नसती. आणि महाराष्ट्राचा आय ए एस चाआकडा 23 वरून शंभर पर्यंत गेला नसता. 

    श्री अभिनय कुंभार हे आज जरी उच्चपदस्थ सनदी अधिकारी असले तरी अमरावतीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते जेव्हा 25 वर्षांपूर्वी आयएएस ही परीक्षा २००० यावर्षी पास झाले तेव्हा ते बसने आले होते. आजकाल तर विद्यार्थी देखील टॅक्सीने फिरतात. ओलाने फिरतात .पण अमरावतीकरांविषयी प्रेम असलेला हा माणूस चक्क बसने अमरावतीला आला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बसनेच गेला.

● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!

त्याचे असे झाले की मी सुप्रसिद्ध स्वातंत्र्य संग्राम सैनिक व पत्री सरकारचे सर्वेसर्वा क्रांतिसिंह श्री नाना पाटील त्यांचे सहकारी श्री नागनाथ अण्णा नायकवडी यांच्याकडे सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे मुक्कामी होतो. एवढा मोठा माणूस. साखर कारखान्याचा संस्थापक. राहतो मात्र शाळेत. मी त्यांच्याबरोबर शाळेतच थांबलो. सकाळी

माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी वर्तमानपत्र वाचायला घेतले. त्यामध्ये सांगली जिल्ह्याचे सुपुत्र व शिराळा या तालुक्याच्या ठिकाणी राहणारे श्री अभिनय कुंभार हे आयएएस झाल्याचे वाचले. ती बातमी वाचल्यानंतर मला अभिनय कुंभारांना भेटावेसे वाटले. तोपर्यंत माझा आय ए एस या शब्दांशी शब्दा इतकाच परिचय होता. मी व माझे सहकारी प्राध्यापक मुकेश सरदार हे अभिनय कुंभार यांच्या गावाला निघालो.  बस अभिनय कुंभार यांच्या गावाच्या दिशेने धावू लागली. बसमध्ये अभिनय कुंभार यांच्या गावचे कोणी आहे का मी चौकशी केली. तर एका सभ्य गृहस्थाने ते गावात राहत नाहीत. शिराळा या तालुक्याच्या ठिकाणी राहतात असे सांगून शिराळा येथील त्यांचा पत्ता मला दिला. आम्ही वाहकाला विनंती करून बस थांबवली. दुसऱ्या बसने आम्ही शिराळा येथे पोहोचलो. 

त्या सद्गुरुस्त्याने अभिनयचे वडील प्राचार्य शिवाजीराव कुंभार यांचा पत्ता दिला होता. पत्ता तोंडीच होता .प्राध्यापक कॉलनी शिराळा. हे गाव  शिराळा 32 या नावाने ओळखले जाते. तिथे सापाची यात्रा भरते. आम्ही अभिनय कुंभार यांच्या घरी पोहोचलो. आम्ही अमरावतीहून आलेलो आहोत हे पाहून श्री शिवाजीराव कुंभार व श्री अभिनय कुंभार यांना खूपच आनंद झाला. कारण अमरावती ते सांगली हा 24 तासाचा प्रवास आहे. आम्ही अभिनयचे स्वागत व सत्कार केले. त्याच्या आई वडिलांचाही सत्कार केला. त्याच वेळेस मी अभिनयाची मुलाखत घेतली. त्याने मला जी माहिती सांगितली की धक्कादायक होती .मी प्राध्यापक असून मलाच माहीत नव्हतं. आय ए एस परीक्षा मराठी भाषेत देता येते. या परीक्षेला बसण्यासाठी 35 टक्केच गुण पाहिजेत. पहिली परीक्षा पास होण्यासाठी 25% गुण पाहिजेत. पूर्व परीक्षेला फक्त बारावीपर्यंतचेच प्रश्न येतात. आणि सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ असतात. प्रश्नांची उत्तरे दिलेली असतात .फक्त मार्क करावा लागतो.

आय ए एस ही परीक्षा इतकी सोपी असते हे मला वयाच्या 50 व्या वर्षी कळले. मी तर सतर्क राहणारा प्राध्यापक होतो .लेखक होतो .पण मला देखील या परीक्षेची फारशी माहिती नव्हती. अभिनयने आमच्या मनातील सगळ्या शंका काढून टाकल्या. मी अभिनयला म्हटले तुम्ही अमरावतीला येणार का. त्यांनी पटकन होकार दिला आणि होकार दिल्याप्रमाणे ते बसनेअमरावतीला आले. आपल्या शिराळ्याच्या भेटीत अभिनय कुंभार यांनी अमरावतीचे श्री अमोल पाटील यांचा आवर्जून उल्लेख केला. युनिक अकादमी मध्ये अमोल पाटील आणि अभिनय कुंभार हे सोबत अभ्यास करीत होते. अभिनय पास झाला होता .तर अमोल पाटील यांना अपयश आले होते. मी अमरावतीला आल्यावर श्री अमोल पाटील यांना भेटलो. लगेच श्री अभिनय कुंभार यांच्या सत्काराची व स्पर्धा परीक्षा कार्यशाळेची तयारी सुरू केली.

 हे वाचा – दुनिया फक्त विश्वासावर चालते.! 

       12 मे 2000 हा दिवस उजाडला. अमरावती शहराच्या इतिहासात हा दिवस  सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल .कारण संपूर्ण महाराष्ट्राला जागे करणारी मिशन आय ए एस चळवळ ही महाराष्ट्रात सर्वप्रथम अमरावतीला या दिवशी सुरू झाली. या कार्यक्रमाचा पूर्ण खर्च प्राचार्य अण्णासाहेब हिवसे यांनी उचलला. अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जवळील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या दंत महाविद्यालयात ही स्पर्धा परीक्षा कार्यशाळा झाली. यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी व सध्याचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे व दुसरे सनदी अधिकारी तसेच अमरावती मनपाचे आयुक्त श्री धनराज खामतकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. ही कार्यशाळा तब्बल 12 तास चालली. सकाळी नऊला सुरू झालेली कार्यशाळा ही रात्री नऊला संपली. त्यावेळेस स्पर्धा परीक्षा विषयी जागृती नव्हती. अभिनय नुकताच आय ए एस झालेला होता. मदतीला अमोल पाटील सर होते .पूर्ण विदर्भातून या कार्यशाळेला पाचशेच्या जवळपास विद्यार्थी आले होते. माझ्या पत्नीने व तिच्या सगळ्या मैत्रिणीने भोजनाचा भार उचलला होता. 

अभिनय बसमध्ये बसेपर्यंत विद्यार्थी अभिनय सरांचा पाठलाग करीत होते. प्रश्नाचा भडीमार सुरू होता. बस सुरू होईपर्यंत मुलांनी अभिनय सरांचा इच्छा सोडला नाही. जाता जाता अभिनय मला म्हणाले सर कार्यशाळा चांगली झाली. पण मुलांसाठी अभ्यासिका आणि ग्रंथालय असल्याशिवाय ही मुले प्रगती करू शकणार नाहीत. 

अभिनय कुंभार हे अमरावतीला आले नसते मुलांना मार्गदर्शन केले नसते तर कदाचित मिशन आय ए एस अशी चळवळ उभी राहिली नसती. मी मराठीचा प्राध्यापक होतो . अमरावतीच्या भारतीय महाविद्यालयात नोकरीला होतो. चांगला पगार होता. अमरावतीला तपोवन  परिसरात  संस्थेचे संस्थापक पद्मश्री श्री दाजी साहेब पटवर्धनांनी राहायला चांगले घर दिले होते .मी लेखक होतो .कवी होतो. साहित्य संगम बहुजन साहित्य परिषद अशा समृद्ध साहित्य संस्था माझ्या पाठीशी होत्या आणि मी त्यात रममान झालो होतो .पण अभिनय कुंभार भेटले आणि आयुष्याला वेगळे वळण लागले. आपण स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जो बॅकलॉग आहे तो भरून काढला पाहिजे. मुलांना जागे केले पाहिजे. असे वाटायला लागले आणि आम्ही बारा मे दोन हजार या दिवशी सुरू केलेल्या या चळवळीला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत 

अभिनय कुंभार नंतर प्रा. अमोल पाटील यांच्या लग्नाला अमरावतीला आले .तोपर्यंत आम्ही आमच्या महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरात आमच्या निवासस्थानी अभ्यासिका सुरू केली होती. अमरावती शहरातील ही पहिली अभ्यासिका. मला तेव्हा गाडगे नगर राठी नगर राधानगर या भागात अभ्यासिकेसाठी कोणी भाड्याने हॉल देखील द्यायला तयार नव्हता. आमचा बंगला मोठा होता. माझी पत्नी सौ विद्याने मनाचा मोठेपणा दाखवला आणि आमचा बंगला आम्ही स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिकेसाठी ग्रंथालयासाठी अर्पण केला. 

प्रा. अमोल पाटील यांच्या लग्नाला आलेले श्री अभिनय कुंभार  सपत्नीक आमच्या निवासस्थानी असलेल्या अभ्यासिकेत आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि मी ग्रंथालय व अभ्यासिका सुरू केल्याबद्दल माझ्या अभिनंदनही केले आणि हे कार्य असेच निरंतर सुरू ठेवावे अशी विनंती केली.

 हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे  कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य

परवा मी पुण्याला आयकर कार्यालयात गेलो. तत्पूर्वी ते कोल्हापूरला असताना कोल्हापूरलाही जाऊन त्यांची आयकर कार्यालयात भेट घेतली .आता साहेब आयकर आयुक्त झाले होते .आयकर विभागातील अति उच्च पदावर पोहोचले होते. मी भेटायला गेलो. माझ्याबरोबर मुंबईच्या जीएसटी कार्यालयातील उपायुक्त व माझे मित्र श्री महेबूब कासार हे होते. अभिनय कुमार यांनी आमचे स्वागत केले. मी त्यांना 12 मे 2025 चे निमंत्रण दिले. मिशन आय ए एस ला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम आहे. तुम्ही आले पाहिजे अशी त्यांना गळ घातली. त्यांनी ती लगेच मान्य केली. चांगली  चर्चा झाली. आणि आम्ही अभिनय कुंभार यांचा निरोप घेतला 

    आज पंचवीस वर्षानंतर मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा एक अभिनय कुंभार नावाचा नुकताच आयएएस झालेला पंचवीस वर्षाचा तरुण माझ्या आयुष्यात आला नसता तर मिशन आयएएसने पूर्ण भारतात जे नोंदणीय काम केले आहे ते झाले नसते. अभिनय जेव्हा आयएएस झाले तेव्हा महाराष्ट्रातून फक्त 23 विद्यार्थी ही परीक्षा पास झाली होती. आता हा आकडा 100 च्या जवळपास पोहोचला आहे. त्यासाठी आम्ही जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 16171 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या आहेत. या पंचवीस वर्षात महाराष्ट्रामध्ये अगदी गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यातही स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जे जागृती झालेली आहे ती झाली नसती. अभिनय कुंभार यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. ते बसने  आले. बसचे भाडे देखील त्यांनी घेतले नाही. अभिनय सरांनी अमरावतीला येऊन मिशन आय ए एस ची मुहुर्तमेढ रोवली आणि आता या चळवळीला सार्वत्रिक रूप आले आहे. जवळपास 273 आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकारी या चळवळीमध्ये या ना निमित्ताने येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गेले आहेत. भारतातील ही एकमेव चळवळ आहे की ज्या चळवळीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने आयएएस सनदी व राजपत्रित अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन गेले आहेत. पण अभिनय कुंभारांनी दिलेला सकारात्मक कौल या चळवळीला खतपाणी घालून गेला हे तितकेच महत्त्वाचे. 12 मे 2025 ला मिशन आय ए एस चा रौप्य महोत्सव आहे.  अभिनय कुमार यांनी शब्द दिला आहे आणि ते शंभर टक्के तो पाळतील याची शाश्वतीही आहे. पण या माणसामुळे व त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना  जागे केले आहे. या सर्व प्रगतीला एकच माणूस पुरेसा आहे आणि तो म्हणजे अभिनय कुंभार. आज त्यांचा जन्मदिवस .त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

 संचालक, मिशन आयएएस 

अमरावती कॅम्प 

9890967003

Leave a comment