अंगुलिमाल उराडे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा
“हे विश्व शब्दांचे” या नावातच व्यापकता
सुनील शिरपुरे/
यवतमाळ/चंद्रपूर : १ डिसेंबर २०२४ रोजी साहित्याच्या जगात एक नवे प्रकाशकिरण घेऊन येणारा “हे विश्व शब्दांचे” हा कवितासंग्रह आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रकाशित झाला. चंद्रपूर मधील मुल तालुक्यातील बेंबाळ गावातील उदयोन्मुख लेखक कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांच्या “हे विश्व शब्दांचे” या कवितासंग्रहाने ग्रामीण साहित्य क्षेत्राला एक नवी ओळख मिळवून देत आपली पहिली आणि लक्षवेधी उपस्थिती दर्शवली आहे.
या सोहळ्याचे आयोजन मा. अंगुलिमाल मायाबाई उराडे व मित्रपरिवार तर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं दोन सत्रामध्ये विभागणी करून पहिल्या सत्रात “हे विश्व शब्दांचे” या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा व दुस-या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ. विद्याधर बन्सोड होते, तर उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इसादास भडके यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नामांकित साहित्यिक मा. प्रशांत दामले, आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय कुंभारे, स्मिता कुंभारे, अरुण झगडकर उपस्थित होते.
“हे विश्व शब्दांचे” या काव्य संग्रहाचे प्रकाशन करताना कवी अंगुलिमाल उराडे आणि त्यांची आई मायाबाई उराडे यांचा शाल, सन्मानचिन्ह, साडी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
साहित्यिकतेच्या मुळाशी जाणारा हा कवितासंग्रह शब्दांच्या माध्यमातून मानवी भावनाचा शोध घेतो. या संग्रहातील कवितानी प्रेम, वेदना, संघर्ष आणि आशेची नवी परिभाषा उलगडली आहे. कवितामधील शब्दांचे वजन आणि त्यातून व्यक्त होणा-या भावना या वाचकाच्या मनाला भिडणा-या आहेत. असे मान्यवरांनी आपल्या भाषणातून नमुद केले. आनंद विद्यालयाचे श्री पी. डी. वाळके सर यांनी प्रास्ताविक सादर करताना कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांच्या सृजनशीलतेचे कौतुक केले. चंद्रपूर झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्री. अरुण झगडकर यांनी कविता संग्रहावर भाष्य करत उपस्थितांना अंतर्मुख करून गेले. कार्यक्रमात आनंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय कुंभारे सर, स्मिता कुंभारे मॅडम यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करत कविताच्या सामाजिक आणि वैयक्तिक महत्वावर भर देत कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांचे भरभरून कौतुक केले. पहिल्या सत्रातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे संचालन मा. रोशनी दाते यांनी उत्कृष्ट आणि प्रभावीपणे केले, तर कवी अनुराग गोवर्धन यानी आभार प्रदर्शन केले.
तर दुस-या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनाध्यक्षस्थानी गीता देव्हारे-रायपुरे होत्या, तर प्रमुख अतिथी विरेन खोब्रागडे, अर्जुमन बानो शेख, सुनील बावणे उपस्थित होते. कवी संमेलनात रोशनी दाते, सुमेधा श्रीरामे, आरती रोडे, यामिनी मडावी, नागोराव सोनकुसरे, एम.ए. रहीम, नागसेन साहारे, नटराज गेडाम, मिलिंद खोब्रागडे, भारती लखमापूरे, साईनाथ रहाटकर, वैजयंती गहूकर, डॉ. शिलवंत मेश्राम, तनुजा बोढाले, संगीता पिज्दूरकर, किरणकुमार बोरुले, सीमा वैद्य, राज संदोकर, सीमा भसारकर, अमृता मनोहर, सुभाष गेडाम, महेश येरमलवार, राधिका झरकर, लोमेश देशमुख, किरण चौधरी इ. कवी कवयित्रींनी सहभाग घेऊन उपस्थित काव्य रसिकांची भरभरून मने जिंकली. प्रशांत भंडारे यांनी या कवी संमेलनाचे उत्कृष्ट असे संचालन करून काव्य रसिकांना मंत्रमुग्ध केले.
अंगुलिमाल उराडे यांची तोकडी परिस्थिती असतानाही कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन हे अत्यंत चांगले आणि दर्जेदार होतं. येणा-या सगळ्या पाहूण्यांविषयी आपुलकीची भावनाही तितकीच प्रबळ जाणवली. पुस्तकाचे प्रकाशन आणि त्यानंतर झालेले कवी संमेलन दोन्ही कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध झाले. हा सोहळा प्रसन्न आणि अगदी खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणात पार पडले.अंगुलिमाल उराडे आणि त्याचा मित्र पंकज वाळके, त्यांचे काका गुरुदास उराडे, अंगुलिमाल यांची भाची कु. मानसी शेंडे तसेच आनंद विद्यालयाचे लिपिक श्री. निखिल भामदारे आणि श्री. शरद गनलावार यांनी तितक्याच तन्मयतेने काम करताना दिसले. सरतेशेवटी जेवणाची उत्तम सोय करण्यात आली.
उत्साही साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळयाने परिसरातील साहित्यिक वातावरणाला नव संजीवनी दिली. “हे विश्व शब्दाचे” हा काव्य संग्रह नक्कीच नव्या साहित्यिक प्रवाहाला चालना देईल, असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला.