महानगरपालिकेकडून डेंग्यू आजाराबाबत जनजागृती मोहीम
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती शहरात डेंग्यूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेद्वारे कठोर उपाययोजना केली जात आहेत. अमरावती महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या निर्देशानुसार, शहरातील सर्व झोन निहाय जनजागृती, घरोघरी सर्वेक्षण, औषध फवारणी, धूर फवारणी, कुलरमध्ये औषधी टाकणे, गप्पीमासे सोडणे या सर्व उपाययोजना नियमितपणे मनपातर्फे करण्यात येत आहेत.
मात्र यानंतरही काही भागात डेंग्यूच्या रुग्णांची नोंद होत आहे, किंवा लारवा आढळतो आहे. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने परिसरात व घरी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे तसेच डेंग्यू सदस्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
डेंग्यू हा आजार डेंगी विषाणूमुळे होतो व त्याचा प्रसार एडिस इजिष्टाय नामक मादी डासाच्या चावल्यामुळे होतो. साठविलेल्या किंवा साठलेल्या पाण्यात भंगार साहित्य जसे टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे डबे, पाण्याचे टाके, फ्रिज मागील पाण्याचे ट्रे, कुंडया, कुलर, ड्रेनेजच्या जाळ्या, ई. ठिकाणी या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी निरुपयोगी सामानाची विल्हेवाट लावावी. पाणी वाहते करावे, आठवडयातून कोणताही एक कोरडा दिवस पाळावा. तहान मुलांना संपूर्ण अंग झाकेल असे सैल कपडे घालावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.