जोडीदाराच्या विवेकी निवडीसाठी युवक-युवतींचे विवाहपूर्व समुपदेशन आजची खरी गरज
मी आणि तू-असु जरी वेगळे ॥
सुसंवादातून फुलेल नाते-आपुले आगळे ॥
समाजामध्ये आज घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे .जोडीदाराची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या हे मुला मुलींच्या आई वडिलांनी आणि मुला-मुलींनी समजून घेणे फार गरजेचे झाले आहे.नव्हे जोडीदाराच्या विवेकी निवडीसाठी-युवक-युवतींचे विवाहपूर्व समुपदेशन – आजच्या काळाची खरी गरज आहे असे मला वाटते.यासाठीच हा लेखप्रपंच.विवाह योग्य युवक युवतींनी आणि त्यांच्या आई-वडिलांनी हा लेख वाचून प्रतिक्रिया कळवा.विवाहपूर्व समुपदेशन निश्चितच होईलआणि जोडीदार चांगला मिळेल जो शेवटपर्यंत साथ देईल.
गेल्या तीन दशकांपासून सकल माळी समाजाला ‘ऋणानुबंध’ च्या माध्यमातून योग्य जोडीदार निवडीसाठी मार्गदर्शन केले. विधवा व विधूर यांचे विवाह जुळवून दिले.गैरसमज व अहंकारातून तुटू पाहणारे दोघांचे संबंध समुपदेशनातून जुळवून दिले. त्या दीर्घ अनुभवातून ‘जोडीदाराच्या विवेकी निवडीसाठी-विवाहपूर्व युवक-युवतींच्या समुपदेशनाची गरज असल्याचे ठाम मत झाले.’
आजचा समाज 21 व्या शतकाकडे वेगाने धाव घेत आहे. कालची,जीवनमूल्यें,कालचे विचार,कालच्या संकल्पनांना कालबाह्य ठरविले जात आहे. पाश्चात्य संस्कृती (नव्हे विकृती) चे अंधानुकरणामुळे स्वैराचार व स्वेच्छाचार बोकाळत आहे. कौटुंबिक आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, विश्वास, इतरांसाठी झटण्याची-झिजण्याची प्रवृत्ती इत्यादींपासून ‘माणूस’ दूर चाललाय.
वाढते घटस्फोट : सामाजिक समस्या :
आजचा माणूस हा दिवसेंदिवस ‘एक्टोव्हर्ट ऐवजी इण्टोव्हर्ट होत आहे.’ ‘हम-दो’ च्या सिमित विश्वास स्वतःला बंदिस्त करून घेत आहे. ह्या ‘कुपमंडूप’ प्रवृत्तीचे संस्कारातून ‘यंग जनरेशन’ आकारास आल्यामुळे ते केवळ स्वतःचाच विचार करताहेत. आई-वडिल, सासू-सासरे ह्यांना ‘डस्टबिन’ संबोधून ‘ते घरात नको’, ही भावना रूढ होत आहे.
आजचे डिग्री घेतलेले शिक्षित (पण सुशिक्षित नव्हे) अनेक युवक-युवतींच्या विवाहविषयक व जोडीदार संबंधातील संकल्पना बदललेल्या दिसतात.पूर्वी आई-वडील,मामा म्हणतील त्या ‘मुला/मुलीशी’ विवाह केला जाई. पण अलिकडे ‘मुलगा म्हणतो त्या मुलीशी किंवा मुलगी म्हणते त्याच मुलाशी’ विवाह करून देणे भाग पडते.परिणामतः दोघातील दुरावा वाढून ‘घटस्फोटांचे प्रमाण तीव्र गतीने वाढत आहे.ही आजची सामाजिक समस्याच नव्हे तर समाजचिंता व चिंतनाचा विषय झाला आहे.’
आजच्या धकाधकीच्या काळात अनेक आई-वडिलांना नोकरी वा व्यावसायामुळे आपल्या अपत्यांकडे म्हणावे तेवढे लक्ष्य देणे शक्य होत नाही. विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे ज्येष्ठ व्यक्तिंकडून छोट्यावर होणारे आध्यात्मिक विचार,नैतिक मूल्यें, जीवन जगण्याच्या आदर्श संकल्पनातून सुसंस्कारांची पखरण होणे हद्धपार झाले. परिणामतः बालपणापासून टी.व्ही.मोबाईल इत्यादिंचा प्रभाव वाढत असलेला दिसून येतो. त्यातून त्यांची स्वैराचारी- स्वेच्छाचारी मनं घडून ती परिपक्व होतात.पूर्वी मुलां/मुलींचे मित्रःमैत्रिणीसोबतचे कौटुंबिक नातं प्रस्थापित व्हायचे.अलिकडे मुला-मुलींचे मित्र परिवाराची आई-वडिलांना कल्पना नसते. बॉय फ्रेंडस् / गर्ल्स फ्रेंडस्च्या अतिरेकातून अनेक समस्या निर्माण होतात पण लक्षात कोण घेतय?
युवतींनो ! विचारपूर्वक निर्णय घ्या :
अलिकडे दहावी-बारावीची परीक्षा संपली की,‘अनेक मुली प्रियकरांसोबत पळून जातात,ही त्यांची वयाची पौंगडावस्था असते. त्यांचे विचार पूर्णपणे परिपक्व झालेले नसतात, ह्या वयाला ‘कुंपणावरती’ स्थिती असं म्हणतात.म्हणजेच कुंपणावरच्या सरड्याला ‘शेतात उडी घ्यायची की, रस्त्यावर’, याचा विवेक नसतो.तद्वतच ‘ह्या वयातील ’ मुलांमध्ये सद्सद्विवेकानुसार निर्णय घेण्याची क्षमता आलेली नसते. ‘योग्य-अयोग्य, सत्-असत्य, ह्यातील सुक्ष्म सिमारेषांची त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण झालेली नसते. त्या भावनेच्या आहारी गेल्यामुळेच ह्या वयोगटातील मुलींची प्रियकरांसोबत पळून जाण्याची संख्या जास्त असते.’
मित्रांनो ! प्रेम करणे हा गुन्हा नाही. ‘प्रेम हे प्रेम असते. तुमचे आमचे सेम असते’ पण ही काव्याची भाषा जीवन जगण्यासाठी पुरेसी नाही. जीवन जगण्यासाठी ‘अन्न-वस्त्र-निवारा’ पाहिजे असतो. पैसा पाहिजे असतो. प्रियकर हा कलेक्टर, इंजिनिअर किंवा चांगला उद्योजक असेल, त्याचे घराणे सुसंस्कृत असेल, तर अवश्य पळून जावून संसार थाटा ! पण प्रियकराचे नाव, घराणे, नोकरी, समाजातील स्थान कशाचीही शहानिशा न करता, पळून जावून स्वाभिमानशुन्य रखेलीसारखे लाचारीने जगणे, दुःख-यातना सहन करणे आणि सहनशिलता संपली की, आत्महत्या करणे, हा अविचार नव्हे तर काय?
युवा मित्रांनो, प्रेम व प्रेमविवाह करणे हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यातून जेव्हा सामाजिक समस्या निर्माण होतात. तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घेणे भाग पडते. प्रेम करा, प्रेम विवाह करा, पण ‘ तो योग्य व लायक’असलेला पहा? जोडीदार हा क्षणाचा सोबती नसून तो आयुष्याचा सारथी-साथीदार असतो. तो तुमच्या विचाराचा सन्मान करणारा, विशाल मनाचा असावा. आयुष्यभर संगत-सोबत व सुख-दुःखात साथ देणारा ‘सांगाती’असावा. म्हणून जोडीदार निवडतांना विवेकपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे.
जोडीदार कसा असावा ?
प्रत्येक उपवर तरूणीला आपला जोडीदार निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य व अधिकार आहेत. परजातीय व अन्य धर्मिय देखिल निवडू शकते. पण त्याचे शिक्षण, स्वभाव, नोकरी, व्यवसाय, घरदार, सांपत्तिक स्थिती, कौंटुंबिक संस्कार, सामाजिक चालीरीती इत्यादी पारखून घेणे व योग्य शहानिशा करणे गरजेचे आहे. स्वजातीय जोडीदार असल्यास कौटुंबिक आधार, सामाजिक पाठबळ, संकटात सहकार्य व मानसिक मनोबल मिळू शकते. उभयंतामधील गैरसमज सामंजस्याने सोडविण्यास मदत होवू शकते. समाजातील मुलांसोबत लग्न ठरविण्यापूर्वी त्याची, त्याच्या संपूर्ण घराण्याची जन्मकुंडली पाहिली जाते. स्वकियांकडून त्याचा पूर्ण इतिहास शोधला जातो. परजातीतील मुलांसोबत प्रेम करण्यापूर्वी व त्याचेसोबत पळून जाण्यापूर्वी त्याचे चारित्र्य तपासण्याची गरज युवतींना वाटायला नको का? त्याच्या पोकळ भुलथापांना बळी पडून शरीराच्या प्रगल्भतेपूर्वीच शरीरावर अत्याचार करवून घेणे योग्य आहे का? यशस्वी आयुष्यासाठी सेक्सशिवाय इतरही घटक महत्त्वाचे आहेत हे युवा पिढीला समजावून सांगण्याची गरज आहे.
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह हे म. फुलेंच्या समताधिष्ठित समाज रचनेसाठी अनिवार्य आहेत पण अशा विवाहातून फायद्यापेक्षा तोटेच अधिक असल्याचे दिसून येतात. दुसर्या जातीतील मुलीला सून म्हणून न स्वीकारणे,माहेर व सासर यांच्यात सामंजस्य व आपलेपणाची भावना नसणे, उभयंताच्या ताण-तणावात व संघर्षात वरिष्ठांचे मार्गदर्शन न निमळणे, एकमेकाच्या कार्यप्रसंगात न मिळणे, कौटुंबिक सामाजिक दर्जा प्राप्त न होणे यासारख्या इतरही समस्यांना तोंड द्यावे लागते व स्वाभीमानशुन्य जीवन जगावे लागते.
जोडीदार निवडतांना घाई करू नका.एकदा नव्हे, हजारदा विचार करा.मनाची चंचलता व स्वैरपणाने निर्णय घेवू नका. जोडीदाराची नोकरी,नोकरीचे ठिकाण,स्वरूप,कामाच्या वेळा, मासिक उत्पन्न इत्यादी माहिती कामाच्या ठिकाणी जावून मिळवा.जोडीदार व्यवसाय करीत असल्यास व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायातील जबाबदार्या, कर्ज घेतले असल्यास ते फेडण्याचे स्त्रोत इत्यादी सविस्तर माहिती मिळवा.शिक्षण,आर्थिक स्थिती, राहते घर,शेती इत्यादी कागदपत्रं तपासून पहा. विवाहापूर्वी एकमेकांचे स्वभाव, आवडी- निवडी,छंद जाणून घ्या. शाकाहार-मांसाहार व्यसन इत्यादिबाबत चर्चा करूनच विवेकाने निर्णय घ्या.
जोडीदाराचा दुसरा विवाह असल्यास पहिला विवाह संपुष्टात येण्याची कारणे समजावून घ्या.एकमेकांच्या पूर्वायुष्यातील घटना, आजार वगैरे बद्दल मोकळ्या मनाने चर्चा करा.विवाहापूर्वी आणि विवाहबाह्य लैगिंक संबंध अनेक रोगांना जन्म देतात.विवाह हा एक संस्कार आहे. संसार रथाची दोन चाक असून ती समसमान व सारख्या दर्जाची असावी. जोडीदाराची निवड चुकली तर आयुष्याच खोबरं झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी दोघांची मन जुळणं महत्त्वाचे असतं. संसारात यशस्वी होण्यासाइी उभयतामध्ये ‘अॅडजेस्ट’ची भावना असली पाहिजे.एखादा प्रसंग जास्त ताणून न धरता,दोघांनीही प्रसंगी दोन पावलं मागे येण्याची तयारी ठेवावी. माणूस हा अवगुणाचा- दोषाचा पुतळा आहे. चुकीबद्दल पत्नीची माफी मागण्यात मोठेपणा आहे, हे लक्षात घेवून वागले तरच संसार सुखाचा होऊ शकतो.
जोडीदाराची निवड केल्यानंतर त्याच्या/तिच्या मताचा-विचाराचा आदर करा.आली मतं-निर्णय जबरदस्तीने लादण्याचे प्रयत्न करु नका. मुंगी होवून साखर खाणे शिका, डोक्यावर बर्फ ठेवा. तोंडात साखर ठेवा. इतरांसोबत प्रेमाने वागा. संसार हा आनंद घेण्यासाठी, इतरांना आनंद देण्यासाठी आहे. हे लक्ष्यात ठेवा.
उपवर तरुणींनो ज्या आईवडिलांनी तुम्हाला बालपणी तळहातावरील फोडाप्रमाणे जपले, तुम्हाला ठेच लागली तर त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, तुम्ही वयात येताच त्यांना वैरी समजून अनोळखी,लोफर तरुण हा हवाहवासा वाटू लागतो.तुमचे जन्मदाते आपल्या मुलीने जीवाचे बरेवाईट करू नये म्हणून छातीवर दगड ठेवून आंतरजातीय विवाहाला मूकसंमती देतात. तुमच्या भवितव्यासंदर्भात त्यांचे मन तीळ-तीळ तुटत असते. नाक दाबून बुक्क्यांचा मार आणि समाजाची निंदानालस्ती ते सहन करीत असतात म्हणून आयुष्याचा जोडीदार निवडताना विवेकपूर्ण निर्णय घेण्याची गरत आहे.
तात्पर्य – आजच्या युगातील विवाहोत्सूक युवक-युवतींना आपल्या वैवाहिक जीवनाचा जोडीदार विवेकपूर्वक निवडण्यासाठी आधुनिक वैज्ञानिक विचार आणि बदलत्या जीवन प्रणालीचे कालसुसंगत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी समाजातील संस्था,संघटना व विचारवंतांनी स्वीकारण्याची गरज आहे. विवाहपूर्व व विवाहोत्तर कौटुंबिक समुपदेशनाच्या कार्यात निःस्पृहपणे सहकार्य करु इच्छिणार्यांनी संपर्क करावा.
-प्रा.श्रीकृष्ण बनसोड
समाजभूषण पुरस्कार प्राप्त
किशोर नगर,अमरावती
मो. 9763403748