समलिंगी विवाहाबाबत कायदा करण्याचा अधिकार संसदेचा
समलिंगी विवाहाच्या निमित्ताने..
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत समलिंगी विवाहाबाबत कायदा करण्याचा अधिकार न्यायालयाचा नसून संसदेचा असल्याचा निर्वाळा दिला…
सर्वोच्च न्यायालयाने विवाहाचे पावित्र्य राखले.तत्पूर्वी समलिंगी विवाहाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने न्यायालयात दाखल केले होते. ‘समलिंगी विवाह प्रथेमुळे वैयक्तिक कायद्यांच्या नाजूक संतुलनाचा आणि स्वीकारलेल्या सामाजिक मूल्यांचा संपूर्ण विनाश होईल. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७नुसार समलिंगी विवाह हे गुन्हेगारीकरण असल्याने, समलिंगी विवाहाला कायद्याने मान्यता मिळण्याचा मूलभूत अधिकार असल्याचा दावा याचिकाकर्ते करू शकत नाहीत. दोन समलिंगी व्यक्तींमधील विवाहप्रथा कोणत्याही वैयक्तिक कायद्यांमध्ये किंवा कोणत्याही संहिताबद्ध वैधानिक कायद्यांमध्ये मान्यताप्राप्त किंवा स्वीकारली जात नाही.असे केन्द्र सरकारने स्पष्ट करत समलिंगी विवाहाला विरोध केला..
विवाहाची संकल्पना अपरिहार्यपणे दोन विरुद्धलिंगी व्यक्तींमधील मिलन असल्याचे गृहीत धरते. ही व्याख्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीररित्या विवाहाच्या संकल्पनेमध्ये अंतर्भूत आहे, ती न्यायिक व्याख्येने विस्कळीत होता कामा नये, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. ‘हे लक्षात ठेवले पाहिजे की, मानवी संबंधांना मान्यता देणे आणि अधिकार प्रदान करणे हे तत्त्वतः एक वैधानिक कार्य आहे. ते न्यायालयीन निर्णयाचा विषय कधीही होऊ शकत नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर केलेली विनंती पूर्णत: असमर्थनीय आणि चुकीची असल्याने या याचिका फेटाळून लावाव्यात असेही केन्द्र सरकारने म्हंटले. भारतीय समाजात विवाहाला एक पवित्र संस्कार मानले जाते. भारतीय संविधान देखील समलैंगिक विवाह ला मान्यता प्रदान करत नाही. अनेक भारतीय समलैंगिक विभागाला पाश्चात्य संस्कृती मानतात .मात्र इतिहासात डोकावून बघितलं तर भारतात अति प्राचीन काळापासून समलिंगी संबंधांना मान्यता असल्याचे स्पष्ट होईल.
समलैंगिकता ही पाश्चात्य संकल्पना आहे असे आपण म्हणत असलो तरी वाटते त्यांनी खजुराहो येथे जायलाच हवे. तेथील शिल्प कला काय दर्शविते? पण आपल्याला खरच १०० टक्के सांगता येईल का, भारतात समलैंगिक संस्कृती अस्तित्वातच नव्हती? आपण प्रामाणिकपणे अस म्हणू शकतो का गे आणि लेस्बियन्स यांचं पुराणकाळात ‘अस्तित्वच’ नव्हत? थोडासा इतिहास खरच जाणून घ्यायची गरज आहे. अमारा दास विल्यम यांनी आपल्या ‘तृतीय – प्रकृति पीपल ऑफ द थर्ड सेक्स’ या पुस्तकात मध्ययुगीन व प्राचीन भारतातील संस्कृत ग्रंथांचे व्यापक संशोधन संकलित केल आहे. या पुस्तकाच्या आधारे असं म्हणता येईल कि, समलिंगी आणि तृतीय पंथी तेव्हाच्या भारतीय समाजात अस्तित्वात होते. पुढे जाऊन आपण असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही ते म्हणजे, समलिंगी ही ओळख त्यावेळच्या समाजात मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली होती.
दुसर्या शतकातील प्राचीन हिंदू ग्रंथ कामसूत्रातील पुरुषायिता या अध्यायाचा संदर्भ देत, पुस्तकात असे नमूद केले आहे की त्यावेळी लेस्बियन स्त्रियांना ‘स्वारिनि’ म्हंटल जाई. या स्वारीनी इतर स्त्रियांशी लग्न करून आपली मुलं वाढवू शकत होत्या. त्यांना तृतीयपंथी समुदाय आणि सामान्य समाजाने सहज स्वीकारले होते . या पुस्तकात समलिंगी पुरुषांचा ‘क्लीबास’ असा उल्लेख केला आहे. पुरुषांच्यात असलेल्या समलैंगिक प्रवृत्तीमुळे नपुंसक ठरलेल्या पुरुषांचा इथं उल्लेख करण्यात आला आहे. समलिंगी पुरुषांचा संदर्भ कामसूत्रातील औपरिष्टका या अध्यायात करण्यात आला आहे. त्या अध्यायात मुखमैथुनाबद्दल ही सखोल मार्गदर्शन केले आहे.
मुखमैथुनात निष्क्रीय भूमिका घेणार्या समलैंगिक पुरुषांना ‘मुखेभाग’ किंवा ‘असेक्य’ असे नाव आहे. कामसूत्रातील समलिंगी माणूस एकतर नामर्द (बायल्या) किंवा मर्दानी अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. असे समलिंगी लोक त्याकाळी एकमेकांशी विवाह करू शकत होते.
पुस्तकात वैदिक व्यवस्थेअंतर्गत आठ वेगवेगळ्या प्रकारचे विवाह सांगितले आहेत. त्यापैकी दोन समलिंगी पुरुष किंवा दोन समलिंगी स्त्रिया यांच्यातील झालेला विवाह गंधर्व विवाह म्हणून ओळखला जाई. इथपर्यंत तरी आपण आपल्या पोथ्या पुराणांमध्ये असलेले संदर्भ बघितले… कदाचित लोकांना ते ही खोटे वाटतील पण..प्राचीन भारतातल्या समलैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी आपल्याला व्हिज्युअल असे पुरावे बघितले पाहिजेत.
ऋग्वेद या प्राचीन भारतीय वेदात ही समलिंगी जोडीचा संदर्भ आहे.वरुण आणि मित्रा असे या जोडीचे नाव आहे. वैदिक विधी, इतिहास आणि पौराणिक कथा सांगणाऱ्या शतपथ ब्राह्मण ग्रंथानुसार वरुण आणि मित्रा हे दोघे अर्धचंद्रांचे प्रतिनिधी आहेत. अमावस्येच्या रात्री मित्रा आपले बीज वरुणात रोपण करतो. यामुळे चंद्र अदृष्य होतो. जेव्हा ते बीज वाढू लागते तेव्हा चंद्र वाढू लागतो आणि पौर्णिमा येते. भविष्यकाळातील सुरक्षिततेच्या दृष्टीने वरुण पौर्णिमेच्या रात्री मित्रा मध्ये आपल्या बीजाचे रोपण करतो.
भागवत पुराणानुसार वरुण आणि मित्रा यांना मुले होती. जेव्हा वीर्य (सीमेन) वाळवीच्या मातीवर पडले तेव्हा वरुणाने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. उर्वशीच्या उपस्थितीत जेव्हा मित्रा आणि वरुण यांनी मातीच्या भांड्यावर आपले वीर्य सोडले त्यातून अगस्त्य आणि वसिष्ठ या दोन मुलांचा जन्म झाला.
अगदी रामायणातले राक्षससुद्धा समलिंगी होते. आता रामायणवर तर आजच्या भारतातला कोणीही व्यक्ती डोळे झाकून विश्वास ठेवतो. वाल्मिकींच्या या प्रसिद्ध महाकाव्यात देखील समलैंगिकतेचा उल्लेख आहे. बरेच उजव्या विचारसरणीचे लोक रामायणाची पूजा करतात आणि त्यांच्या मते रामायण महाकाव्य नसून ऐतिहासिक दस्तऐवज आहेत.या लोकांच्या म्हणण्यानुसार ती कपोकल्पित कथा नाही. मग तर त्यात दिलेला समलैंगिकतेचा दाखला ही नाकारता येणार नाही. वाल्मीकींच्या रामायणात असे म्हंटले आहे कि,ज्या स्त्री राक्षसी होत्या, त्या रावणाने चुंबन घेतलेल्या आणि मिठी मारलेल्या स्त्रियांचे चुंबन घेत आणि त्यांना मिठी मारत. यासाठी वाल्मिकींनी आपल्या हनुमानांना या घटनेचे साक्षीदार केले आहे.
जर साक्षात हनुमानजी साक्षीदार आहेत तर हे स्पष्ट आहे कि, प्राचीन भारतात समलैंगिकता मान्यता पावली होती. त्यामुळे, समलैंगिकता ही भारतीय परंपरेचा भाग आहे हे नाकारणे केवळ खुळचटपणाचे आहे. असं आम्ही नाही आपले प्राचीन ग्रंथ म्हणतात.
साधारणत: मोघल काळात भारतातल्या सैन्य वसाहतींमध्ये लादलेली युद्ध आणि सेनेतलं डिप्रेशन अशामध्ये मोगल काळात समलैंगिक संबंध मोठ्या प्रमाणात पसरले. जगभरात यापूर्वीच अनेक वर्षांपूर्वी या संबंधांना तसा कुणाचा मोठा विरोध नव्हता. कदाचित म्हणूनच समलैंगिक विवाह पर्यंत अनेक देशात कायदे झाले. काही राष्ट्रांचे शासक, वरिष्ठ नेते, अधिकारी यांचे समलैंगिक संबंध उघड होते आणि त्यातूनच समलिंगी विवाहांना जाहीर पाठिंबे जगभरात सुरू झाले. त्यामानाने भारता सारख्या देशांची प्रकृती हा इतका बदल स्वीकारण्यालायक कालही नव्हती आणि आजही नाही, हे देखील खरे आहे. मात्र याचा अर्थ त्या जीवांचे, कम्युनिटीचं किंवा एक समाज होऊ पाहणाऱ्या संख्येचे या देशात काही स्थानच नाही, त्यांच्यासाठी ह्या देशात कायद्याचं पान नाही, असेही म्हणता येणार नाही.
-प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६
ReplyForward |