गरिब नाही हटला
नाही गरिबी हटली
स्वार्थी भ्रष्ट वृत्ती पाई
लोकशाहिच फिटली !!
गावं झालं दीन माह्य
शहर झालं अमीर
नागलो लुटलो आम्ही
सारे झालोत फकीर !!
हाती देऊन वखर
लेखणं पाटी लुटली
गरिब नाही हटला
नाही गरिबी हटली !!
शिक्षणच आहे गड्या
सारं अज्ञानाच मूळ
खरं अज्ञानच आहे
आमच्या गरिबीचं कूळ !!
अक्षर आकड्या संग
नाळ आमची तुटली
गरिब नाही हटला
नाही गरिबी हटली !!
घाम गायता गायता
अख्खी जिन्दगी फिटली
घामाची आमाले खरी
किंमत नाही भेटली !!
शासकाले शासनाले
लाजच नाही वाटली
गरिब नाही हटला
नाही गरिबी हटली !!
फुक्काचं नसते देतं
गड्या कोणालेच कोणी
पाण्याची बनते वाफ
वाफेचच होते पाणी !!
देण्या घेण्या पाई गड्या
ईमानदारी ईकली
गरिब नाही हटला
नाही गरिबी हटली !!
गरिबी हा शाप आहे
उ:शाप आहे रे वोट
दोन चार पैशांसाठी
नकोस ईकू रे वोट !!
तुह्या गरिबीची गंगा
तुह्याच हाती आटली
गरिब नाही हटला
नाही गरिबी हटली !!
-वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक ( सेनि )
अकोला
9923488556