कविताच माझी कबर-मुक्तछंद कवितेचा मैलाचा दगड
‘ज्यावेळी मी एखादी कलाकृती वाचतो त्यावेळी एक मित्र मिळाल्याचा आनंद होतो. आणि तेच पुस्तक मी जेव्हा पुन्हा वाचतो त्यावेळी जुन्या मित्राला भेटण्याचा आनंद मला होतो’ असे सुप्रसिद्ध लेखक ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांनी म्हटल्याचे माझ्या वाचनात आले, योगायोग म्हणजे त्याचवेळी मी सद्या मराठी कवितेतील मुक्तछंद कवितेतील मानाचे नाव अर्थात कवी संजय चौधरी यांचा ‘कविताच माझी कबर’ हा कवितासंग्रह वाचत होतो. साहित्यिक म्हणून जडणघडण होतांना आपण काय लिहतो, वाचतो, कुणाचं मार्गदर्शन आपल्याला लाभतं हे फार महत्वाचे ठरते. मला जर मुक्तछंदात कविता कशी लिहावी ? किंवा मुक्तछंद म्हणून एखादी रचना वाचायला मिळाली आणि मला जर ती खटकली तर मी ‘कवी संजय चौधरी यांच्या कविता वाचा म्हणजे मुक्तछंद कविता कशी असते, ती कशी लिहावी हे समजेल’ असे नेहमीच सुचवीत असतो.
हा सारा उहापोह करण्याचे कारण म्हणजे नाशिकमधील मुक्तछंद कविता लिहणारे, साहित्य क्षेत्रातील मोठं नाव कवी संजय चौधरी यांचा मुंबई येथील नावाजलेल्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘कविताच माझी कबर’ हा कवितासंग्रह होय. २०१८ साली संपन्न झालेल्या प्रकाशन समारंभांवेळी आवर्जून कवितासंग्रह विकत घेवून मी एका दमात सर्व कविता वाचल्या होत्या. त्याहीनंतर संदर्भ म्हणून वेळोवेळी हा संग्रह हाताळणे हा माझा छंदच झालेला आहे.
वाचक म्हणून कथा, कविता वगैरे वाचतांना वाचक त्यात रममाण होत अडकत जातो. त्यातील भावविश्वाशी एकरूप होतो, त्याचबरोबर सबंधित कलाकृतीच्या लेखकाशी कळत न कळत एक वेगळाच अनोखा असा अतूट बंध निर्माण होतो. कधी कधी वाचक लेखकाशी इतका जोडला जातो कि लेखकाशी मित्रत्वाचे नाते निर्माण व्हावे, मुख्य म्हणजे याची लेखकाला यत्किंचितही कल्पना नसते. ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांच्या म्हणण्याप्रमाणे वाचक त्या कलाकृतीच्या लेखकाला अप्रत्यक्षपणे मित्र म्हणून स्वीकारतो. मित्रत्वाचे हे नाते निर्माण झाल्याने ती कलाकृती परत वाचल्यावर जुन्या मित्राला भेटल्यासारखे वाटले तर यात नवल काय ? हेच मी सद्या अनुभवतो आहे …
अक्षरे, गण, यती, यमक यांचे बंधन न पाळता कवी आपल्या भावना किंवा विचार वेगळ्या पद्धतीने मांडतो. छंदोरचनेच्या बंधनातून मुक्त असा हा मुक्तछंद रचनेचा प्रकार असतो. असे जरी असले तरी अशा रचनांना एक प्रकारची लय असते शिवाय आशयगर्भ तसेच वाचकाला अंतर्मुख करायला लावणाऱ्या या रचना असतात. वानगी दाखल खालील रचना पाहू,
माझं नाव
उद्या कधीतरी
एखाद्या रस्त्याला
द्यायचं झालंच तर …
स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्याला द्या
माझे सगळे जिवलग याच रस्त्याने गेलेले
माझ्यानंतर येणारे ही
येतील याच रस्त्यावरून शेवटचे
दुसरा रस्ता आहे कुठे ? (पृष्ठ क्र.९६, आयाम : आठ)
ढीगभर पाने चाळूनही जे समजणार, उमगणार नाही असे काही या बोटावर मोजण्याइतपत ओळी वाचून मनाला भावून, स्पर्शून जाते. वरील रचनेत कवीने कमी शब्दात जीवनाचं अंतिम सत्य चित्रित केले आहे. वाचकाला अशा रचनेतील आशय आपला स्वतःचाच वाटायला लागून जातो आणि सहजच त्यात स्वतःला वाचक पडताळून पाहतो. माणूस जीवनभर धावधाव, हव्यास करतो. शेवटी राख होऊन अनंतात विलीन होतो. त्यामुळे कवीने शेवटी जर सारेजण याच मार्गाने जाणार असतील तर माझे नाव स्मशानात जाणाऱ्या रस्याला दिले तर मृत्युनंतर सारे जिवलग याच वाटेने जातांना मला भेटतील. किती गहन अर्थ या ओळींमध्ये दडलेला आहे ?
‘कविताच माझी कबर’ असे आगळेवेगळे नाव या कवितासंग्रहाला देण्यात आले आहे. शिक्षण, नोकरी किंवा शिक्षणासाठी आजकाल सर्रास तरुण शहराच्या दिशेने प्रयाण करतात मात्र या प्रक्रियेत ते आतून बाहेरून बदलून जातात. शहरी व ग्रामीण भागातील संस्कार, संस्कृती, वातावरण यात फारच तफावत असली तरी आत काळजात आपला गाव व गावाच्या आठवणी पाठलाग करत राहतात.
हरवलेल्या माणसाला नाहीये इच्छा
परत सापडण्याची
तो स्वतःहूनच निघून आलाय आपल्याच (!) माणसांमधून
परतीचे सारे दोर कापून टाकलेत त्याने
… स्वतःच्या हातांनी
भिरभिरतोय या अनोळखी परमुलखात (पृष्ठ क्र. ५, आयाम एक, कविता क्र. ३)
पोटापाण्यासाठी एकदा माणसाने शहर गाठले कि गावाकडे परतण्याचे त्याच्यासाठी दरवाजे अपोआप बंद होतात कायमचे. सगळीकडे माणसांची गर्दी असली तरी सारेच चेहरे अनोळखी असतात. जर चुकून कोणी ओळखीचे भेटलेच तर आपली आपबिती कुणाला कळू नये म्हणून तो तोंड लपवत असतो. असं असलं तरी परत गावाकडे कुणी गेल्याचे ऐकिवात नाही. शहरातील झगमगाट, मॉल्स, बिगबझार, थियटर्स वगैरेमुळे मेंदूतून गावाकडची पाखरं, शेत, विहीर, नदी हद्दपार होऊन जातात.
कविता लिहण्याची कला कवीला जन्मताच लाभलेली असते. कल्पनेच्या वापर करून कवी आपल्या अनुभवांना शब्दरूप देऊन सजीव करतो. सामान्य माणसाला कल्पनाही नसते असे विचारचक्र कवीच्या मनात अव्याहतपणे सुरु असते. साहित्य क्षेत्रातील अनेक साहित्यिक समाजातील घडामोडीचा उहापोह आपल्या लेखणीद्वारे करत भूत, भविष्य आणि वर्तमानाच्या नोंदी ते रेखाटून आपले साहित्य जगासाठी निर्माण करत असतात,
कुणाशी हसावं ?
चेहरे बहुरूपी
डोळे दरवेशी …
आपला वंश
करतो आपल्यालाच दंश
भरवसा तरी कुणावर ठेवावा ? (पृष्ठ क्र. २४, आयाम दोन, कविता क्र. ६)
आजकालच्या गॅसच्या जमान्यात पूर्वी आई करायची तशी पोपडा आलेली खरपूस भाकर भाजली जात नाही कि पाहुणे येणार म्हणून कावळेसुद्धा काव काव करत नाही कारण इथे माणूस माणसापासून दुरावला आहे. कुणावर विश्वास ठेवावा हाही यक्ष प्रश्न आहेच कारण जीवाभावाचं डोकावण्यासारखे घर घावत नाही कि कुणाला घरात घ्यावे असा विश्वासू माणूस भेटत नाही. ही खंत कवी मनाला बोचते आहे.
एकूण बारा आयाम असलेल्या या कवितासंग्रहात हरवलेल्या माणसांच्या कविता (तेरा कविता), प्रत्येकाच्या छातीत दुःखाचंच बाड (सोळा कविता), जमत नाही माझे … माझ्याशीच (अकरा कविता), आम्ही सारे जण एकाच अनाथाश्रमात (चार कविता), आतल्या तगमगीच्या कविता (बारा कविता), हे ईश्वरा ! माझे मुके दिवस मला परत कर (दहा कविता), उडत चाललाय माझा विश्वास … श्वास घेण्यावरचा (पाच कविता), फक्त बातमी गेली वाऱ्यावर (सहा कविता), माझ्या आतल्या इवल्या भिक्खुची कविता (आठ कविता), कुठे असतील माझ्या बकऱ्या ? (सात कविता), कविता येते मला शोधात (आठ कविता), कवितेचे पसायदान (दोन कविता) अशा एकूण १०२ आशयगर्भ, अनेक विशेषणे, अलंकार, उपमा, दृष्टांत योजून समृद्ध झालेल्या कविता वाचकाच्या मनाला अत्यानंद देवून तृप्त करतात. ‘कविताच माझी कबर’ या कवितासंग्रहात अतिशय वाचनीय, आशयगर्भ कविता वाचायला मिळतात. हा संग्रह वाचकांनी आवर्जून वाचावा, असे मला वाटते.
कविता तसा सान-थोरांना आवडणारा, भावणारा काव्य प्रकार. दैनदिन बोलीभाषेपेक्षा कवितेची भाषा चमत्कारिक व निराळी मात्र वाचकांना आवडणारी असते. वाचत असतांना वाचक वेगळ्याच प्रतिमा व कल्पना विचार करू लागतो. आजकाल बरेच लिहते हात लिहत असले तरी दर्जेदार लिखाण करणारे साहित्यिक बोटावर मोजण्या इतपत आहेत. अशाच लिह्त्या हातांपैकी एक नाव म्हणजे कवी संजय चौधरी होय. कवी संजय चौधरी यांच्या कविता म्हणजे मुक्तछंदातील प्रमाण असा अलिखित नियम अलीकडच्या काळात साहित्य विश्वात रूढ झाल्याचे निदर्शनास येत असून ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.
संजय चौधरी हे साहित्यिक क्षेत्रातलं मुक्तछंदात कविता लिखाणासाठी एक उत्तम कवी म्हणून परिचित असलेलं नाव. हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह असून यापूर्वी ‘माझं इवलं हस्ताक्षर’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह पुणे येथील राजहंस प्रकाशनाने २००५ साली प्रकाशित केला आहे. त्यांनी साहित्य, कला, मनोरंजन क्षेत्रात एक उत्तम कवी म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. अशा या साहित्यिकाचे त्यांच्या दर्जेदार मुक्तछंदातील कवितांमुळे वाचकांनी भरभरून स्वागत केले आहे. प्रतिभासंपन्न अशा या कवीने आजवर अनेक कविसंमेलनं तसेच काव्यस्पर्धा गाजवल्याचे रसिकांना ज्ञात आहेच.
कवी कविता लिहून आपल्या विचारांचं तसेच अनुभवाचं आभाळ वाचकांना मुक्त करत वाचकांच्या जीवनात अनुभव समृद्धता आणण्याचे कार्य करत असतो. कवी सतत विचार प्रवण असतो. भवताली घडणाऱ्या घटनाक्रम त्याला अस्वस्थ करत असतात. आपल्या बऱ्यावाईट अनुभवांचा फायदा अवघ्या विश्वाला व्हावा हीच आशा कवी बाळगून असतो. यातून आपल्या सोबत असणाऱ्यांना काहीतरी सांगावं, त्यांचं मनोरंजन करावं, त्यांना शिकवावं हाच त्याचा हेतू असतो. हे नक्की. अशावेळी कविता माध्यम बनून येते. आयाम पाच मधील पहिलीच कविता पाहू,
कशाला
एवढी सजवतात
मिठाईची दुकानं
हे लोकं ?
या
रस्त्यानं
गरीबाची मुलंही
शाळेत जातात
हे त्यांना ठाऊक नाही का ?
सामाजिक असमानता, भीषणता कमी शब्दात वास्तवादी कल्पक विचारातून वाचकांच्या पुढ्यात ठेवत आत्मपरीक्षण करायला कवी भाग पडत असल्याचे सहज लक्षात आल्यावाचून राहत नाही. अत्याधुनिक युगातल्या माणसाची द्विधा-वेदना या कवितांमधून व्युक्त झाली असल्याचे रास्त मत आपल्या पाठराखणीतून ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी नोंदवलेले आहे.
या कवितासंग्रहास चित्रकार सुभाष अवचट यांनी रेखाटलेले उत्कृष्ट आणि बोलके मुखपृष्ठ तसेच आतील रेखाटने वाचकाला पाने पालटून कविता वाचायला प्रेरित करतात. तसेच ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या समर्पक प्रस्तावनेमुळे कवितासंग्रहाचा एकूण आवाका सहज लक्षात येतो. तसेच ‘मला पोटाशी धरणाऱ्या साऱ्या जिवलगांना’ अशी कृतज्ञता व्यक्त करणारे अर्पण पत्र या संग्रहात वाचावयास मिळते. आशयगर्भ मुक्तछंद रचनांनी हा संग्रह बहरलेला आहे. कवितेवर निस्सीम प्रेम असलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. पुन:पुन्हा वाचाव्या अशा त्यांच्या कविता आहेत.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे शुक्रवार, दि. २० ऑगस्ट, २०२४ रोजी हुतात्मा स्मारक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणूसमित्र सुरेश पवार यांनी आयोजित केलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही…’ या सदरात कवी संजय चौधरी यांच्या ‘कविताच माझी कबर’ या कवितासंग्रहावर आधारित ऐसपैस गप्पांच्या कार्यक्रमाची मेजवानी नाशिकमधील रसिकवाचक तसेच साहित्यिकांसाठी उपलब्ध झाली आहे. दि. ५ मार्च, २०२४ ते दि.२८ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान दर मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. अशा प्रकारचा बहुधा हा साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव उपक्रम असावा. यामध्ये नवोदित तसेच प्रस्थापित साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
याहीपुढे, त्यांची लेखणी अशीच तळपत रहावी. त्यांच्या हातून सर्व प्रकारचे साहित्यिक लिखाण व्हावे, हीच सदिच्छा! कवी संजय चौधरी सरांना गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या सदरात संपन्न होणाऱ्या व्याख्यानास आभाळभर शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव :- कविताच माझी कबर
ISBN :- 978-81-936935-2-0
कवी :- संजय चौधरी, संवाद क्र. ९३७०१ १६६६५
प्रकाशक :- ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पाठराखण :- वसंत आबाजी डहाके
स्वागत मूल्य :- ₹ १५०/- मात्र (सवलतमूल्य, टपाल खर्च आणि अधिक माहितीसाठी कृपया, संबंधितांशी संपर्क साधावा.)
आस्वादक :
सोमनाथ आवडाजी पगार (सॅप)
(महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक)
संपर्क क्र.:- ९२७३३५७१५९, Email:- somnathpagar@yahoo.co.in
(गीतकार/ कवी, कथा, पटकथा, संवाद लेखक, समीक्षक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर.)